एक भारतीय नागरिक म्हणून २०१७ ने आपल्याला काय दिले, असा विचार केल्यावर देशाचा सार्थ अभिमान वाटावा, अशा अनेक गोष्टी या वर्षात घडल्या, असे लक्षात येते. त्यातील काही गोष्टी इतक्या मूलभूत आहेत की, त्यात देशाच्या भावी विकासाची मजबूत इमारत उभी करण्याची क्षमता आहे.
काळ अनंत असला तरी माणसाला आपल्या समजेसाठी तो मोजावाच लागतो. त्यालाच आपण भूत, वर्तमान आणि भविष्य म्हणतो. तर अवकाशही असेच अनंत असून त्याचेही माणसाने आपल्या समजासाठी पृथ्वी, अंतराळ असे विभाजन केले आहे. सरते २०१७ हे वर्ष आणि आपण राहतो तो भारत देश, हे असेच आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक आहेत. काळ आणि अवकाशाच्या या विभाजनात आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, आपण सदैव पुढेच गेले पाहिजे, असे वाटणे अगदी नैसर्गिक आहे. आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला असावा आणि शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठी आपला प्रवास चाललेला असतो. अशा या व्यापक पार्श्वभूमीवर २०१७ नावाचे एक वर्ष १३० कोटी भारतीय नागरिकांना कसे गेले, हे पाहूयात.
आपण भारतीय नागरिक आहोत, असे म्हणतो तेव्हा १३० कोटींतील आपण एक आहोत आणि या मोठ्या कुटुंबाचे भाग आहोत, हे आपण मान्य करतो. त्यामुळे या कुटुंबात जे चांगले-वाईट घडत असते, त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. अशा या विशाल कुटुंबाला २०१७ ने काय दिले, त्याचे आपल्यावर काय परिणाम झाले आणि यापुढे होणार आहेत, हे नव्या वर्षाच्या निमित्ताने जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
सुरुवातीसच एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, आपल्यातीलच काही जणांचे अतिशय कष्टप्रद आयुष्य सोडले तर आपण भारतीय अतिशय भाग्यवान नागरिक आहोत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आणि एका चौरस किलोमीटरला ४०० इतकी प्रचंड घनता असलेला हा देश (अमेरिका - ३३, कॅनडा – ४, ऑस्ट्रेलिया – ३, रशिया – ९) आज अन्नधान्याची आणि संपत्तीची प्रचंड निर्मिती करतो आहे. भौतिक सुख हाही आनंदी जीवनाचा आणि प्रगतीच्या दिशेने जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यात भारत नावाचे कुटुंब कोठेही कमी पडत नाही. अर्थात ते समाधान मिळवण्यासाठी त्याला लोकसंख्येची घनता कमी असलेल्या देशांशी तुलना करण्याचा मोह सोडून द्यावा लागेल. सर्वांना भेदभावमुक्त व्यवस्थेत राहून वैयक्तिक विकास करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. मात्र, संपत्ती वितरणाचा आदर्श किंवा व्यवहार्य मार्ग सापडला नसल्याने त्यात आपण अडलो आहोत, हेही मान्य केले पाहिजे.
अशा या भौतिक संपत्तीच्या तसेच साधनसामग्रीच्या वाढीत आपण एक भारतीय नागरिक म्हणून २०१७ मध्ये आपण काय मिळवले, हे आता पाहू यात.
(१) नोटाबंदी आणि जीएसटीसारखे बदल हे पायाभूत बदल असल्यामुळे त्याचा त्रास झाला, पण या वर्षात तो बदल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारला. नव्या बदलाची आव्हाने स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, हेच त्यातून दिसले.
(२) पतसंवर्धन आणि पतवितरण याला देश उभारणीत अतिशय महत्त्व आहे. बँकांत आलेला प्रचंड पैसा, बँकांचे वाढते जाळे आणि स्वच्छ आर्थिक व्यवहार वाढण्यासाठी काम करत असलेल्या आर्थिक संस्था, यामुळे पतसंवर्धनात आपण दोन पावले पुढे आलो आहोत. जनधनने आतापर्यंत ३०.६७ कोटी नागरिकांना बँकिंगमध्ये आणले असून त्यांनी आपल्या नावावर आज ६९ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यातूनच त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जीवन विमा मिळाला आहे तर त्यातील २३ कोटी नागरिक रूपे डेबिट कार्ड वापरू लागले आहेत. आर्थिक समावेशनाचा जागतिक विक्रम आपण यातून केला आहे.
(३) आपली अर्थव्यवस्था आजही शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाने नेहमीच आपल्यावर कृपा केली आहे. चांगला पाऊस, चांगली थंडी या चक्रातून त्याने भरभरून दिले आहे. पाणी आणि अन्नधान्याची सुरक्षितता त्यामुळेच यावर्षी मिळू शकली.
(४) आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो, याचा आपल्याला अभिमान आहे. यावर्षी अनेक निवडणुका झाल्या, ज्यातून लोकशाही व्यवस्था आणखी मजबूत झाली. मतदान यंत्रांमधील दोष किंवा हस्तक्षेपाविषयी भरपूर चर्चा झाली, पण हे तंत्र निरपेक्ष आहे, हा निष्कर्ष याच वर्षाने आपल्याला दिला.
(५) इझ ऑफ डुइंग बिझनेसमध्ये आपण मारलेली ३० अंकांची झेप आणि मूडीजसारख्या जागतिक आर्थिक संस्थांनी सुधारलेले मानांकन, अशा घटनांनी काही अडथळे दूर केले. साधनसामग्रीची निर्मिती करण्यास भांडवलाची सतत टंचाई अनुभवत असणाऱ्या आपल्या देशाला हा मोठाच दिलासा आहे. शिवाय देशातील व्याजदर कमी झाल्यामुळे देशी भांडवल काही प्रमाणात स्वस्त झाले आहे.
(६) सोने, जमीन आणि घर विकत घेणे, हेच आपले खात्रीचे गुंतवणुकीचे मार्ग होते. पण या माध्यमातून आपल्या कुटुंबात पैसा फिरत नव्हता. आता आपल्यातील अनेक जण शेअर बाजार, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पेन्शन योजनांत पैसे गुंतवत असल्याने तो फिरू लागला आहे. आपला शेअर बाजार आता (१५० लाख कोटी) हा जगात आठव्या क्रमांकाचा ठरला आहे. त्याने यावर्षी अतिशय चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडात (२२ लाख कोटी) गुंतवणुकीचा तर यावर्षी विक्रमच झाला आहे.
(७) परकीय चलनाचा साठा हा आर्थिक प्रगतीचा एक निकष मानला जातो. त्यासाठी आयात निर्यात व्यापारात संतुलन ठेवावे लागते. आपली निर्यात म्हणावी तेवढी अजूनही वाढत नसताना परकीय चलनाचा साठा विक्रमी ४०० अब्ज डॉलरवर गेला आहे.
(८) देशातील दळणवळणाच्या सोयी-सुविधा या देश पुढे जाण्यासाठी पुरेशा आणि दर्जेदार हव्यात. या वर्षांत हवाई वाहतूक करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या तब्बल १० कोटींवर गेली असून नवनव्या शहरांत हवाई सेवा उपलब्ध होते आहे. हवाई सेवा सर्वाधिक वेगाने वाढणारा देश हा मान यावर्षी आपण पुन्हा मिळवला आहे. रेल्वेने कोट्यवधी रुपयांचा सुधारणा कार्यक्रम हाती घेतला असून रेल्वे प्रवासाचा अनुभव चांगला होतो आहे, तर रस्त्याचे जाळे वेगाने पूर्ण होऊ लागले आहे. शिवाय वाहतुकीसाठी नद्या आणि समुद्राचा वापर करण्याच्या अनेक कल्पनांवर काम सुरू झाले आहे.
(९) अमेरिकेसारख्या महासत्तेला आपली केवळ दखलच घ्यावी लागली नाही, तर तिच्यासह अनेक देश सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
(१०) राजकीय स्थैर्य आणि शांतता याला अतिशय महत्त्व आहे. २०१७ ने या दोन्ही गोष्टी आपल्याला दिल्या, त्यामुळे संपत्ती आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यास देशाला अधिक वेळ मिळू लागला आहे.
तरुण पिढी आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते, त्यामुळे तिला भविष्यातील अधिक गोष्टी दिसत असतात. देशातील २०१७ चे हे सकारात्मक बदल लक्षात घेता २०१८ हे वर्ष असेच २०१७ च्या खांद्यावर उभे राहून भारतीय नागरिक म्हणून देशाला चार पावले पुढे नेण्यास मदत करणारे ठरले आहे. संपत्तीच्या निर्मितीसोबत तिच्या वितरणाचा न्याय मार्ग आता २०१८ ला शोधावा लागेल.