Total Pageviews

Friday, 8 November 2013

1971 GENOCIDE OF HINDUS IN BANGLADESH

१९७१ मधील नरसंहार आणी आपल्या देशहिताचे रक्षण गेल्या आठवड्यात देशात सुरक्षेवर आघात करणार्या अनेक घटणा घडल्या. पाकिस्तान ,चीन पुरुस्क्रुत हिसांचार वाढतच चालला आहे.श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या पथकावर दहशतवाद्यांनी ०६/११/२०१३ ला केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. २०१३ मध्ये आपले १६० जवान दहशतवाद्यांशी लढतांना शहिद झाले आहेत त्यापैकी ७३ जवान काश्मीर मध्ये शहिद झाले आहेत. जमिनीवर भारताच्यासाठी आव्हाने उभी करणार्याक चीनने आता आकाशाचीही मदत घ्यायला सुरुवात केली आहे. भारताच्याच्या ताब्यात असलेल्या जलसाठ्यांची आणि सीमांची ‘रेकी’ करण्यासाठी आता चीनने १८ उपग्रह आकाशात पाठविले आहेत. आर्थिक धोरणांच्या माध्यमातून चीनने भारताला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर पकड मिळवणार्याा चीनने जगभरातील आपल्या व्यापारी मार्गांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याची तयारी चालवली आहे. यासाठी चीनने भारताच्या जलसाठ्यांची आणि सागरी सीमांची सगळी माहिती गोळा करायचा सपाटा लावला आहे. आपल्याच हद्दीत घडलेल्या घटनांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याची माहिती डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदेर यांनी समोर आणली आहे. भारताला आपल्या सागरी सीमांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी किमान ८० उपग्रह हवे आहेत. त्यांच्या माध्यमातून छायाचित्रे आणि घटनांची इतर माहिती गुप्तचर संस्थाना मिळणे सोपे होईल. बांगलादेश कोर्टाचा ऐतिहासिक निकाल बांगलादेशमध्ये 2009 मध्ये झालेल्या उठावादरम्यान 57 लष्करी अधिकाऱ्यांसह 74 लोकांची हत्या केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने ०४/११/२०१३ला (मंगळवारी) निमलष्करी दलातील 152 माजी सैनिकांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. "या सर्व दोषींना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी,'' असा निर्णय न्यायाधीश महम्मद अख्तरूझ्झमान यांनी दिला. जगातील गुन्हेगारी खटल्यांसाठी दिल्या गेलेल्या निकालापैकी हा निकाल सर्वांत मोठा असल्याचे मानले जात आहे. या सैनिकांची क्रूरता अतिशय भयंकर होती, असे न्यायाधीशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेल्या न्यायालयात सांगितले. बीएनपी या पक्षाचे माजी विरोधी नेते नसिरूद्दीन अहमद पिंटू आणि बांगलादेश रायफल्सचे माजी अधिकारी तोराब अली या दोघांसह काही नागरिकांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात 1300 जणांच्या साक्षी झाल्या. यामध्ये 655 साक्षीदार सरकारी पक्षाचे आणि 27 बचाव पक्षाचे होते. या खटल्याची सुनावणी ३ वर्षात संपली. 25 आणि 26 फेब्रुवारी 2009 रोजी बांगलादेश रायफल्सच्या एका युनिटने बांगलादेश रायफल्सच्या मुख्यालयावर हल्ला चढवून तेथील महासंचालकांसह इतर लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली होती. 33 तासांच्या या उठावात बंडखोर सैनिकांनी मालमत्तेचेही नुकसान करून मौल्यवान वस्तूंची लूट केली होती. बंडखोर सैनिकांनी त्यांच्या पैशांच्या मागणीसह इतर काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. एकूण 846 संशयित होते,त्यात 26 नागरिकांचा समावेश होता.152 सैनिकांना फाशीची शिक्षा ,158 सैनिकांना जन्मठेपेची शिक्षा ,251 जणांना 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणी 242 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिकांना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा हा निकाल ऐतिहासिक आहे. या बंडखोर सैनिकांनी निष्पाप नागरिकांवर अतिशय अमानूष अत्याचार केले आहेत. महिलांवरील अत्याचारांनी तर सीमा गाठली आहे. इतके भीषण कृत्य करणारे हे बंडखोर सैनिक दयेस पात्र नाहीत. असे मोहम्मद अख्तरुझामन यांनी आपल्या या निकालात म्हटले आहे. १९७०-७१ मधील २० लाख हिंदूचा नरसंहार १९७१च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला हरवले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धात जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांनी पाकिस्तानला मदत केली .जमातचे कार्यकर्ते आणि नेते यांनी अनन्वित हिंसाचार घडवून आणला. बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार या युद्धात ३० लाखांचे शिरकाण झाले. ९० लाख लोकांना स्थलांतर करावे लागले .महिलांना अनन्वित हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. १९७१च्या स्वातंत्र्य आंदोलनात महिलांशी दुर्व्यवहार, हत्या आणि नरसंहार केल्याचा आरोप जमात-ए-इस्लामीचे सहायक महासचिव अब्दुल मुल्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याला व अनेक कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा मागच्याच महिन्यात सुनावली. अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार गैरी बास यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक पाहता हेच पुस्तक भारताच्याच एखाद्या लेखकाने लिहायला हवे होते. एका विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचाराला जगापुढे मांडले आहेच, त्यावर भारत सरकारकडूनच अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही .भारतातील एकाही संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया दिली नाही. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजागर झाली असतानाही, भारताने या नरसंहाराची संभावना, बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला. गैरी बासच्या या पुस्तकाने भारतातील हिंदूच स्वधर्मी बांधवांच्या दुख: आणि वेदनांप्रती किती उदासीन आणि कसे आपल्या उपेक्षेच्या स्वभावालाच जोपासतात, हेच अधोरेखित केले . आम्हाला आमचा गौरव किंवा दु:ख आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्य करवून घेण्यासाठी कुणा भारतीयाची नव्हे, तर पाश्चििमात्य इंग्रजांची गरज भासत असते. हिटलरचे नाझी अत्याचार आणि स्टालिन, माओ-त्से-तुंग यांच्या नरसंहारासारखाच पाकिस्तानी सेनेने पूर्व पाकिस्तानातील हिंदूंचा केलेला नरसंहार कुणा भारतीयाने चव्हाट्यावर आणला नाही . या विषयावर हिंमत दाखवून, सर्व तथ्ये गोळा करून लेखणी चालविली असेल, तर एका अमेरिकन लेखकाने. गैरी बासनी म्हटले की, पाकिस्तानी सैनिकांना हे जेव्हा लक्षात आले की, आपला पराजय निश्चिरत आहे तेव्हा त्यांनी जमाते इस्लामीला हाताशी धरून हिंदूच्या घरासमोर पिवळे निशान लावले, जेणेकरून हिंदू घरांची ओळख तत्काळ व्हावी. त्यानंतर अंगावर शहारे आणणारे हल्ले केले गेले, ज्यात हिंदू महिलांवर बलात्कार, घरांची लुटालूट, जाळपोळ, पुरुष, वृद्ध आणि बालकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बांगलादेशातील स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार सुमारे २० लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले. दुर्दैवाने भारतात कोणत्याही विचारधारेचे सरकार असो, कधीही बांगलादेशात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या बाबतीत सहानुभूती अथवा दु:ख प्रकट करणारा चकार शब्दही काढला नाही. आमचीही नैतिक जबाबदारी? भारतात मानवाधिकार संघटना आहेत, त्या जर्मनीतील यहुदी समुदायावरील अत्याचारांचा प्रश्न् उपस्थित करीत असतात किंवा पोलपॉट (कंबोडिया)ने केलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर अजूनही गळा काढतात. त्यांच्यापैकी एकानेही आपल्या शेजारी देशातील रक्तबांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचारावर एकही शब्द काढला नाही. परिसंवाद, चर्चासत्रे तर फार दूरची गोष्ट.ही झाली भारताच्या मनावर झालेल्या आघाताप्रती आमची उदासीनता . कोणताही भारतीय, जगाच्या कोणत्याही कोपर्यादत भारतीयावर होणार्या आघातांप्रती गप्प कसा काय बसू शकतो? जगामधील भारतीयाचे दु:ख, वेदना, अन्यायाबाबत आमचीही नैतिक जबाबदारी आहेच. भारताच्या सीमांवर सातत्याने घुसखोरी सुरू आहे. चीन आणि पाकिस्तानी सैनिक सातत्याने एकीकडे भारतीय सीमांच्या आत घुसत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांचे पूर्वांचलात लोकसंख्येवर आक्रमण सुरू आहे. आज भारताचे मन आणि तन या दोहोंवर आघात होत आहेत.हे मनाला प्रचंड वेदना देणारे आहे. आम्ही आपल्या देशहिताचे रक्षण करायला केंव्हा शिकणार.?

No comments:

Post a Comment