जिहादीं’चे आव्हान-- प्रभाकर पवार
गेल्या महिन्यात मुंबईच्या सत्र न्यायालयातून पळालेला बॉम्बस्फोट आरोपी अफजल उस्मानी यास पुन्हा पकडण्यात राकेश मारिया यांच्या ‘एटीएस’ला यश मिळाले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एटीएसचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. २० सप्टेंबर रोजी पळालेला अफजल उस्मानी उत्तर प्रदेशातील एका गावखेड्यात जेथे साधी विजेचीही व्यवस्था नव्हती अशा ठिकाणी आपल्या बहिणीच्या मुलीच्या घरी रहात होता. सोबत त्याने आपल्या भाच्यालाही नेले होते. त्या ठिकाणी हे दोन्ही मामा-भाचे दिवसातून पाच वेळा मशिदीत नमाज पढायचे. आपल्याप्रमाणे अफजलने आपल्या भाच्यालाही त्याचे ब्रेन वॉशिंग करून जिहादी बनवले होते; परंतु तोच जावेद नावाचा त्याचा भाचा कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरला.
जावेद मुंबईत आला असल्याची खबर एटीएसच्या खबर्याने दिल्यानंतर एटीएसच्या पथकाने धाड घालून जावेदला पकडले. त्यानेच अफजल कुठे लपला आहे याची माहिती दिली. जावेद जर एटीएसच्या हाती लागला नसता तर मात्र अफजल उस्मानी नेपाळमार्गे पुन्हा पाकिस्तानात जाणार होता. सोबत तो घातपाती कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी जावेदलाही पाकिस्तानात नेणार होता, परंतु अफजल व जावेद या मामा-भाच्यांचे पाकिस्तानात जाण्याचे स्वप्न भंगले. आत्मघातकी पथकात सामील होण्यापूर्वीच एटीएसने त्याची नसबंदी केली.
बरेच अतिरेकी व गुंड पोलीस मागे लागले की नमाजाच्या नावाखाली मशिदींचा सहारा घेतात. तेथे तासन्तास नमाज पढत बसतात. अफजल उस्मानी सत्र न्यायालयातून पळाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसच्या अधिकार्यांनी बर्याच मशिदींच्या व्यवस्थापकांना, मुल्लामौलवींना अफजलबद्दल माहिती दिली होती.
संशयित आरोपीने मशिदीत नमाजाच्या नावाखाली आश्रय घेतल्यास पोलिसांना कळवावे, असेही सांगितले होते; परंतु अफजल उस्मानी हा फारच हुशार व चलाख निघाला. त्याने महाराष्ट्राबाहेरील अत्यंत दुर्गम भागातील मशिदीचा आश्रय घेतला. तेथे तो कुणाशीही बोलायचा नाही, मोबाईल वापरायचा नाही. मोबाईल वापरल्यास पोलिसांना आपले लोकेशन कळते, संभाषण टॅप होते याची त्याला पुरेपूर माहिती होती. म्हणून त्याने आपल्या भाच्यालाही सावध केले होते. त्यालाही तो मोबाईल वापरू देत नव्हता. परंतु या सार्या दक्षतेचा काही उपयोग झाला नाही. धडाडीचे पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या पथकाने अखेर त्याला व त्याच्या भाच्याला उत्तर प्रदेशात जाऊन पकडले आणि मुंबईत मुसक्या बांधून आणले. त्यामुळे एटीएसची सर्वत्र वाहवा केली जात आहे.
अफजल उस्मानी हा रियाज भटकळचा पूर्वीचा वर्गमित्र आहे. मुंबईच्या कुर्ला भागात हे दोघे शिकले. त्यामुळे उस्मानीचा पाकिस्तानात जाऊन तेथून रियाज भटकळसोबत घातपाती कारवायांची सूत्रे हलविण्याचा जो प्रयत्न होता तो फसला गेला हे महाराष्ट्र जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल. पाकिस्तानच्या आयएसआयने आपल्या देशातील तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकावून त्यांना जिहादी बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याला देशभरातील अफजल उस्मानीसारख्या माथेफिरूंकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा बॉम्बस्फोट मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. हे बिहार येथील पाटणा येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांवरून दिसून येत आहे. एका तपापूर्वी गुजरातमध्ये घडलेल्या जातीय दंगलीत मुसलमानांच्या झालेल्या मोठ्या जीवित व आर्थिक हानीचे आजही निमित्त पुढे करून सर्वत्र बॉम्बस्फोट घडविले जात आहेत; परंतु गोध्रा येथे रेल्वे डब्यांना आगी लावून रामसेवकांना प्रथम जिवंत कुणी जाळले याचा कुणीही विचार करीत नाही. गुजरात दंगलीचे कारण पुढे करून आजही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले जात आहे. यामागे राजकीय खेळी तर आहेच, परंतु पाकिस्तानही छुप्या रीतीने आपला हा सारा देश पोखरत आहे. जिहादी बनविण्यासाठी मुसलमान माथेफिरूंना अर्थसहाय्य करीत आहेत. मुल्लामौलवींमार्फत मुस्लिम तरुणांना भडकविणारे ‘दर्ज कुराण’चे मेळावे घेतले जात आहेत. एकदा का कोणताही तरुण जिहादी बनला की तो घरदार सोडतो व भाड्याच्या घरात आपल्या सहकार्यांसोबत टोपण नावाने राहतो. मोबाईल फोन वापरायचा असेल तर तो खोट्या व हिंदू व्यक्तीच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून मोबाईलचे सीम कार्ड विकत घेतो. महत्त्वाचे असेल तरच मोबाईल सुरू करतो नाहीतर मोबाईल कायम बंदच ठेवतो. परंतु मोबाईलवर बोलण्याचे कितीही टाळले तरी अफजल उस्मानीसारखे आरोपी सापडतातच हे लक्षात ठेवा. बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर पाकिस्तानात बसलेले रियाज भटकळ किंवा फय्याज कागजीसारखे कुणीही अतिरेकी या जिहादींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्या जिहादींची दयनीय अवस्था होते. खाण्यापिण्याचे वांदे होतात. ते संपतात. हे पकडलेल्या आरोपींच्या कबुलीजबाबातून दिसून येते. पाकिस्तानची आयएसआय आपल्या देशातील तरुणांचा आपल्याचविरुद्ध वापर करून घेत आहे. धर्माधर्मामध्ये आगी लावून देत आहे; परंतु पाकिस्तानपेक्षा आपल्या देशातील अल्पसंख्याक अधिक सुखी आहेत. आपल्या देशात त्यांना अधिक सन्मान मिळत आहे हे माथेफिरू मुसलमानांना कोण सांगणार?
अन्याय व गरिबीचा बाऊ करायचा, धर्माच्या नावाखाली धुमाकूळ घालायचा हे किती काळ चालणार आहे? या देशाला खरे आव्हान इस्लामी ‘जिहादीं’चे आहे. परंतु ते मोडून काढण्यासाठी आपल्याकडे दुर्दैवाने कोणतीच उपाययोजना नाही याचे दु:ख वाटते. मुझफ्फरनगरच्या दंगलीचे कारण सांगून रविवारी पाटण्यात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. बॉम्बस्फोटांचे हेच लोण उद्या दिल्ली, त्यानंतर मुंबईतही येईल तेव्हा नागरिकांनो, गर्दी व षंढ जिहादींपासून सावधान. बेवारस वस्तूंना हात लावू नका. संशयास्पद वस्तूंची पोलिसांना माहिती द्या आणि निरपराधांचे प्राण वाचवा!
No comments:
Post a Comment