Total Pageviews

Monday, 18 November 2013

BHARAT RATNA TO SACHIN & DR RAO

राजकारण्यांना सरसकट ‘इडियट’ म्हणणे हे पूर्ण असत्य नाही आणि पूर्ण सत्यदेखील नाही. ते फार तर ‘पाव सत्य’ असू शकते. मात्र भारतरत्न राव यांनी विज्ञानविषयक धोरणाची केलेली चिरफाड ही ‘शंभर टक्के सत्य’ आहे. तेव्हा राव यांनी सांगितलेल्या ‘पाऊण सत्या’चा विचार करणेच फायद्याचे ठरू शकेल. राव यांचे ‘पाऊण सत्य’ ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीएनआर राव यांनी देशातील राजकारणी, सत्ताधारी आणि विकासाची धोरणे याबाबत अत्यंत परखड मते व्यक्त केली आहेत. तीन दिवसांपूर्वीच राव यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासह भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर रविवारी या दोघांनीही पत्रकार परिषदा घेऊन भावना व्यक्त केल्या. सचिनने त्याच्या स्वभावानुसार त्याची मते सौम्यपणे व्यक्त केली. सीएनआर राव यांनी मात्र अत्यंत परखड शब्दांत टीकास्त्र सोडत देशाच्या विज्ञानविषयक धोरणाची लक्तरेच काढली. राज्यकर्ते आणि समस्त राजकारणी मंडळींची ‘इडियटस्’ अशी थेट संभावना केली. राव यांनी राजकारण्यांना सरसकट ‘इडियट’ किंवा अक्कलशून्य म्हणणे खचितच आक्षेपार्ह आहे. कारण राजकारणी ‘इडियट’ असते तर तेंडुलकरच्या जोडीने राव यांचाही देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी अक्कल किंवा शहाणपणा त्यांना सुचला नसता. ‘मिशन मंगळ’ किंवा ‘मिशन मून’सारख्या अवकाश मोहिमा राबविल्याच गेल्या नसत्या. ‘इडियट’ हा शब्दप्रयोग राव यांच्याकडून कदाचित बोलण्याच्या ओघात झाला असेल; पण तरीही तो झाला नसता तर बरे झाले असते. सर्वच राजकारण्यांना एकाच तागडीत तोलणे कुठल्याच निकषावर समर्थनीय ठरत नाही. मात्र, राव यांनी ज्या भूमिकेतून आणि तळमळीने ही परखड टीका केली ती भूमिका आणि तळमळही लक्षात घ्यायला हवी. राव हे केजरीवाल आणि कंपनीप्रमाणे भंपक गृहस्थ नाहीत. ते एक सच्चे शास्त्रज्ञ आणि पंतप्रधानांच्या विज्ञानविषयक सल्लागार समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे देशाची वैज्ञानिक प्रगती इतर देशांप्रमाणेच वेगाने व्हावी, हिंदुस्थानदेखील अन्य प्रगत राष्ट्रांप्रमाणेच विज्ञानदृष्ट्या सक्षम व्हावा, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. दुर्दैवाने आज आपल्या देशात फक्त सेन्सेक्स उसळला म्हणजे प्रगती व तो गडगडला म्हणजे अधोगती असे विकासाचे एक फसवे समीकरण तयार झाले आहे. त्याच दृष्टिकोनातून राव यांनी राज्यकर्त्यांना अक्कलशून्य म्हटले असावे. प्रखर विज्ञाननिष्ठ भूमिका घेणे आणि ती राबविणे हे आपल्या देशातील ‘लोकानुनयी’ राजकारणात सोपी गोष्ट नाही हे खरे असले तरी विज्ञानविषयक धोरण आणि पायाभूत विज्ञान विकास यावर जेवढ्या प्रमाणात जोर द्यायला हवा होता तेवढा गेल्या तीन-चार दशकांत दिला गेलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. फक्त संगणक क्रांती आणि मोबाईल क्रांती म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. दुर्दैवाने राज्यकर्त्यांपासून सामान्य माणसापर्यंत आपल्या देशात या ‘आभासी प्रगती’लाच विज्ञान विकास समजला जात आहे. राव यांनी हल्ला केला आहे तो याच अदूरदर्शी धोरणकर्त्यांवर आणि समाजमनावर. चिनी राज्यकर्ते आणि तेथील सामान्य माणूस यांची कठोर परिश्रमाची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमालीचे देशप्रेम यांची तुलना राव यांनी हिंदुस्थानी मानसिकतेशी केली ती याच भूमिकेतून. त्यात काही चुकले असे म्हणता येणार नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच उद्याचेही जग आहे. जो देश या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभा राहतो तो जगावर सत्ता गाजवतो हा इतिहास आहे. आमचे धोरणकर्ते हे समजतील तो सुदिन. हिंदुस्थानने आज विज्ञानात जी प्रगती साध्य केली आहे त्यात सरकारपेक्षाही शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या परिश्रमांचा वाटा अधिक आहे हेही खरेच. मात्र निदान यापुढे तरी भविष्याचा आणि जागतिक बदलांचा विचार करता देशाच्या विज्ञानविषयक धोरणात आणि राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल व्हायला हवा ही राव यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीची म्हणता येणार नाही. त्यांनी सर्वच राजकारण्यांना सरसकट ‘इडियट’ म्हणणे हे पूर्ण असत्य नाही आणि पूर्ण सत्यदेखील नाही. ते फार तर ‘पाव सत्य’ असू शकते. मात्र त्यांनी विज्ञानविषयक धोरणाची केलेली चिरफाड ही ‘शंभर टक्के सत्य’ आहे. तेव्हा भारतरत्न राव यांनी सांगितलेल्या ‘पाऊण सत्या’चा विचार करणेच देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकेल.

No comments:

Post a Comment