तरुण तेजपाल या ‘तहलका’च्या संपादकाने त्याच्या गोव्यातील मुक्कामात आपल्या एका सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची स्वत:च दिलेली कबुली जेवढी संतापजनक व निराशादायी, तेवढीच त्या अपराधासाठी त्याने स्वत:ला दिलेली सहा महिन्यांच्या सेवानवृत्तीची शिक्षाही हास्यास्पद व स्त्रियांएवढाच देशाच्या कायद्याचा अपमान करणारी आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’च्या तंत्राने स्वत:ला आणि स्वत:च्या नियतकालिकाला देशाच्या कुतुहलाचा व भीतीचा विषय बनविणार्या या संपादकाने आपण स्वत:देखील फारसे स्वच्छ नसल्याचे सांगून साधुत्वाचा आव आणला असला तरी तो खरा मानण्याचे कारण नाही. ‘मी गुन्हेगार, मीच वकील आणि मीच न्यायाधीश’ असे सांगणारा हा फसवा आणि जाणकारांच्या डोळ्यांत धूळ फेकणारा पवित्रा आहे. ज्या महिला सहकार्याचे गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलात त्याने दोन दिवस लैंगिक शोषण केले, तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली नसली तरी त्याविषयीचा आपला इरादा तिने लपवून ठेवला नाही, हेही तरुण तेजपालच्या जबानीतून स्पष्ट झाले आहे. त्या प्रकाराने घाबरून जाऊन स्वत:च सारे काही सांगून टाकण्याचा व आपण आपल्याही बाबतीत भरपूर प्रामाणिक असल्याचा त्याने केलेला हा देखावा आहे. असल्या देखाव्याला भुलणारे आणि ‘अहाहा! काय हा प्रामाणिकपणा’ असे म्हणणारे बावळट लोक आपल्यात काही कमी नाहीत. तसे ते या तेजपालाची बाजू घेताना दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यांवर दिसलेही आहेत. तेजपालने आजवर उजेडात आणलेल्या राजकारणी माणसांच्या भ्रष्टाचाराच्या कथा फार असल्याने त्याच्या बाजूने व त्याच्या विरोधात अशा वेळी उतरणारे राजकारणीही बरेच आहेत. अशांचे आताचे पवित्रेही त्यांच्या राजकारणांच्या सोयींच्या संदर्भात नीट तपासून व पारखून घेणे आवश्यक आहे. ‘आमच्या पक्षाने अवैधरीत्या पैसे जमविण्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आम्हीच आमच्या तीन सदस्यांची एक समिती नेमली आहे’, हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा ताजा पवित्राही अशाच ढोंगाचा आहे. विनयभंग वा त्याचा प्रयत्न हा स्त्रीच्या मूलभूत अधिकाराविरुद्धचा अपराध आहे आणि त्याविषयीच्या कायद्यातील तरतुदींची जाणीव सगळ्या सुशिक्षितांना असणे अपेक्षित आहे. समाज आणि देश यांचे राजकीय पर्यावरण शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करून प्रसिद्धी माध्यमांच्या क्षेत्रात उतरलेल्या तेजपालला या दोन्ही बाजू चांगल्या ठाऊकही आहेत. तरीही त्याला अशा गुन्ह्याचा मोह आवरता आला नसेल, तर ती त्याची मूलभूत प्रकृती व मानसिक समस्या आहे हे लक्षात घेऊन त्याचा निकाल करणे गरजेचे आहे. सार्वजनिक जीवनात व व्यवसायात स्त्रियांचा वावर आता मोठा व पुरुषांच्या बरोबरीचा झाला आहे. या वावरामुळे वाढायला हवी असलेली सभ्यतेची जाणीव मात्र अजूनही अनेक क्षेत्रांत पूर्वीएवढीच लहान व क्षुद्र राहिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका नवृत्त न्यायमूतर्र्ींनी त्यांच्या नियुक्तीपूर्वी आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका शिकाऊ वकील स्त्रीने नुकतीच केली आहे. न्यायमूर्तीच्या पदावर राहिलेला आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला कायदेशीर इसम एवढा बेकायदेशीर, बेपर्वा व अनैतिक वर्तन करणारा असेल तर तरुण तेजपाल या सर्व तर्हेची ख्याती पावलेल्या इसमाकडून कशाची अपेक्षा करायची असते? त्याच्या नावाची शिफारस प्रसार भारतीच्या संचालक पदाच्या नेमणुकीसाठी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी केल्याचे व या ‘बातमी’नंतर त्यांनी ती मागे घेतल्याचे वृत्तही आताच प्रकाशित झाले आहे. विधिमंडळ, प्रशासन आणि न्यायासन या लोकशाहीच्या तीन स्तंभांएवढीच ‘प्रसिद्धीमाध्यम’ या चौथ्या स्तंभानेही आपली बेअब्रू स्वत:च करून घेतल्याचे सांगणारी ही तरुण कहाणी आहे. ती अडचणीच्या बातमीसारखी दडपली जाणार नाही आणि तिची योग्य ती कायदेशीर शहानिशा होऊन संबंधिताची सुटका होणार नाही याची काळजी घेणे हेच आता कायद्याच्या यंत्रणांचे काम आहे
No comments:
Post a Comment