Total Pageviews

Saturday 23 November 2013

SEPAI MAHESH DHYGUDE MARTYERED IN KASHMIR

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत पाडळीचा जवान शहीद ऐक्य समूह Wednesday, November 20, 2013 AT 11:10 AM (IST) Tags: mn2 खंडाळा तालुक्यातील चौथा जवान धारातीर्थी लोणंद, दि. 19 : जम्मू-काश्मीर येथील सांबा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत मराठा बटालियन, 856 राष्ट्रीय रायफलमधील महेश व्यंकटराव धायगुडे (वय 23, रा.पाडळी,ता.खंडाळा) हा जवान सोमवारी रात्री शहीद झाला. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी शहीद झालेला महेश धायगुडे हा खंडाळा तालुक्यातील चौथा जवान आहे. महेश धायगुडे शहीद झाल्याची वार्ता समजताच पाडळी पंचक्रोशीसह संपूर्ण खंडाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पाडळी या लोणंदपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या गावामध्ये शहीद जवान महेश धायगुडे याचे घर व कुटुंबीय असून सांबा सेक्टर, जम्मू कश्मीर येथे सीमा रक्षणात कार्यरत असलेला महेश धायगुडे शहीद झाल्याचा दूरध्वनी संदेश आज मंगळवार, दि. 19 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ हणमंत धायगुडे यांना आला. त्यानंतर खात्री करण्यासाठी सैन्य दलातच नोकरीस असणारा महेश धायगुडे याचा धाकटा भाऊ अविनाश धायगुडे याच्याशी संपर्क केला असता त्याने या वृत्तास दुजोरा दिल्यानंतर संपूर्ण खंडाळा तालुक्यात ही वार्ता पसरली. त्यानंतर महेश धायगुडे यांच्या पाडळी येथील निवासस्थानी ग्रामस्थ व महिलांनी मोठी गर्दी केली. शहीद जवान महेश धायगुडे याच्या पश्चात आई श्रीमती संगीता धायगुडे, धाकटा भाऊ जवान अविनाश धायगुडे (आर्मी मेडिकल कोअर लखनौ), दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. शहीद जवान महेश धायगुडे याचे वडील कै.व्यंकटराव धायगुडे व चुलते सर्जेराव धायगुडे हे सैन्यदलात कार्यरत होते. सर्जेराव धायगुडे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. महेश धायगुडे याचे प्राथमिक शिक्षण पाडळी येेथे, माध्यमिक शिक्षण पंचक्रोशी विद्यालय, बोरी व लोणंद येथे झाले. 2009 मध्ये बेळगाव येथे सैन्यदलात तो दाखल झाला. जम्मू येथे तो कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवा दरम्यान तो पाडळी येथे सुट्टीवर आला होता. पाडळी प्रमाणेच लोणंद येथील माउली नगरमध्ये जागा घेऊन त्याने घराचे बांधकाम सुरू केले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचा त्याचा मानस होता. परंतु काळाने त्यापूर्वीच त्याच्यावर घाला घातला. महेश धायगुडे हा जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, गटविकास अधिकारी नानासाहेब रणदिवे, सभापती सौ. दीपाली साळुंखे, खेड पंचायत समिती गणाचे सदस्य रमेश धायगुडे (पाटील) यांनी तातडीने भाडळी येथे जाऊन अंत्यदर्शन, अंत्ययात्रा, अंत्यविधी जागांची व मार्गाची पाहणी केली. अंत्यविधीच्या जागेचे सपाटीकरण व रस्ता दुरुस्तीचे काम शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांच्यावतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. शहीद जवान महेश धायगुडे याचे पार्थिव पाडळी येथे कधी आणण्यात येणार याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. तथापि बुधवार, दि. 20 रोजी पार्थिव येथे दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खंडाळा तालुक्यात यापूर्वी सुनील यादव (पारगाव), प्रकाश शेळके (निंबोडी), संतोष ठोंबरे हे जवान देशाच्या सीमा रक्षणासाठी कार्यरत असताना शहीद झाले आहेत. महेश धायगुडे हा खंडाळा तालुक्यातील चौथा शहीद जवान आहे.

No comments:

Post a Comment