आयपीएलचे प्रेक्षकही देशद्रोही
सुहास फडकेसध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेचा आनंद लुटणारे आपण सारे भारतीय देशद्रोही आहोत हे बहुधा आपल्या लक्षात आलेले नाही. आयपीएलच्या बहुतेक लढतींचा निकाल आधी ठरलेला असतो अशी चर्चा ही स्पर्धा सुरू झाल्यापासून सुरू होती. ही बाब कधीच सिध्द झाली नाही हेही खरे.मात्र एखाद्या षटकात किती धावा द्यायच्या, किती नो बॉल टाकायचे हे आधी ठरते ही बाब श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला ह्यांना अटक झाल्यानंतर उघडकीस आली आहे. ह्या पैकी चंडिलाचा स्थानिक स्पर्धांमधील कामगिरी इतकी टुकार आहे की त्याला राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी विकत घेतले ही बाबच संशयास्पद वाटते.
पोलिसांनी ह्या तिघांविरुध्द पुरावा म्हणून इतक्या बाबी पुढे आणल्या आहेत की, हे प्रकरण त्यांनी पुढे रेटले तर तिघेही तुरुंगात जातील. अर्थात माझा मुद्दा हा नाही. पोलिस सांगत आहेत की बुकींच्या कटात हे सामील होते आणि बुकींचा बोलाविता धनी भारताविरुध्द कटकारस्थाने करणारा दाऊद इब्राहीम आहेत ही बाब माझ्यासाठी धोकादायक वाटते.
मुंबईत १९९३ मध्ये झालेले बाँबस्फोट असोत किंवा कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत भारताशी पुकारलेले युध्द असो किंवा देशभरात अनेक ठिकाणी घडलेले बाँबस्फोट असोत, त्यात दाऊदचा हात असतो. भारतातल्या तरुणांना हाताशी धरून तो हे सारे घडवून आणतो हेही स्पष्ट झालेले आहे.
अशा वेळी आपण आयपीएलच्या सामन्यांना गर्दी करून किंवा ते उत्साहाने चॅनलवर बघून दाऊदला आर्थिक मदत करत असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण आपण आपल्या खिशात हात घालतो म्हणून आयपीएल चालते. ह्यातला काही भाग कराचीतून, दुबईतून भारताविरुध्द कट करणाऱ्यांकडे बुकींमार्फत जातो. बुकी हे अशांच्या इशा-यावर काम करत असतात हेही दिसून आले आहे.
अशा वेळी केवळ बॉलीवूडचे सितारे, राजकारणी आणि त्यांची मुले तेथे जातात म्हणून आपण त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही. किंबहुना अशा त-हेचे फिक्सिंग सुरू असेल तर आयपीएलमधील मैदानावर घडणाऱ्या अनेक बाबी संशयास्पद वाटू लागतात. एखाद्याचे शतक किंवा त्याने भोपळा न फोडणे अथवा एखाद्याने भरमसाठ नो बॉल टाकणे ह्या प्रत्येक घटनेबाबत आपण विचार करायला हवा.
आयपीएल हे मसाला सामने आहेत असे दिसते. इतके असताना आयपीएलमध्ये वेळ घालवणे हे शहाणपणाचा अभाव असण्याचे लक्षत आहे ह्यात शंका नाही
No comments:
Post a Comment