दिल्लीसह कॉंग्रेजी राजवटीतील अनेक राज्यांत कॉंग्रेजी मंत्र्यांच्या तोंडास काळे फासले गेले आहे. या सर्व घटनांवरून लोकांचे लक्ष उडविण्याकरिता हे अचानक आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण गाजवले गेले काय? अशी शंका आता येऊ लागली आहे.
दिल्लीतील ‘स्पॉट फिक्सिंग’
सरकारचे थोबाड साफ
करण्यासाठी आयपीएल घोटाळा!
ईश्वर ज्याप्रमाणे चराचरात भरला असल्याचे म्हटले जाते त्याप्रमाणे हिंदुस्थानात भ्रष्टाचारही चराचरात ठासून भरला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खालून वर जातो की वरून खाली झिरपतो यावर वायफळ चर्चा करण्यात अर्थ नाही. भ्रष्टाचार धर्मातही आहे आणि खेळातही आहे. आयपीएल क्रिकेटमधील सट्टेबाजीचे जे प्रकरण सध्या गाजवले आणि सजवले जात आहे तो सर्व प्रकार धक्कादायक आहे हे खरेच, पण हा सर्व प्रकार अगदी ठरल्याप्रमाणे, ठरवलेल्या वेळकाळानुसार स्फोट घडवून समोर आणला आहे. दिल्लीसह कॉंग्रेजी राजवटीतील अनेक राज्यांत भ्रष्टाचार व लाचखोरीने थैमान घातले आहे व कॉंग्रेजी मंत्र्यांच्या तोंडास काळे फासले गेले आहे. खासकरून रेल्वे घोटाळा, कोळसा घोटाळाप्रकरणी तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच तथाकथित स्वच्छ प्रतिमेचा साफ कोळसा झाला आहे. या सर्व घटनांवरून लोकांचे लक्ष उडविण्याकरिता हे अचानक आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण गाजवले गेले काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. क्रिकेटमध्ये सट्टेबाजी चालते हे आता काही नवीन राहिलेले नाही आणि आपल्याच देशातील राजकारण्यांनी ‘मतभेद’ व ‘पक्षभेद’ विसरून आयपीएल क्रिकेट सुरू केले. तो एक सट्टेबाजीचा धांगडधिंगाच आहे. आयपीएलची सुरुवात काही नैतिक व उदात्त गोष्टींसाठी झालेली नाही. राजकारणी, उद्योगपती, सिने अभिनेते यांनी एकत्र येऊन हा जुगाराचा अड्डा सुरू केला. आता जुगाराच्या अड्ड्यांवर ‘सट्टा’ नाही लावणार तर काय ताक आणि लस्सी विकणार? आयपीएलमुळे काही नवोदित खेळाडूंना संधी मिळाली. पैसे मिळाले हे खरे, पण आज क्रिकेटच्या खेळात जितका पैसा व झगमगाट आहे तेवढा अन्य कुठेच दिसत नाही. कारण जगभरातल्या सट्टेबाजांची या खेळात मोठी गुंतवणूक आहे व हे लपून राहिलेले नाही. दिल्लीचे पोलीस आयुक्त श्रीमान नीरजकुमार यांनी आयपीएल खेळातील तीन-चार कोंबड्या पकडल्या व वाघ मारल्याचा आविर्भाव आणून ते मीडियासमोर आले. विनोद कांबळी याने चांगले सांगितले. ‘छोटे मासे पकडलेत. मगर केव्हा जाळ्यात येणार?’ क्रिकेटच्या दिल्लीतील ‘स्पॉट फिक्सिंग’
सरकारचे थोबाड साफ
करण्यासाठी आयपीएल घोटाळा!
आयपीएल सट्टेबाजीत अंडरवर्ल्ड आहेच. आताही नेहमीप्रमाणे दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांची नावे समोर आलीत. त्यांचे ‘हस्तक’ मुंबईसह देशभरात ही उलाढाल करीत आहेत. त्यापैकी कितीजणांपर्यंत दिल्ली पोलीस आयुक्तांचे हात पोहोचले आहेत? मुंबई, गुडगाव, चेन्नईसारख्या शहरांत छापेमारी करून काही मोबाईल्स, काही सीमकार्ड व थातूरमातूर ‘बुकी’ नामक लोकांना अटका करायच्या, गाजावाजा करून त्यांना मीडियासमोर उभे करायचे, फोटो काढायचे हेच धंदे सध्या सुरू आहेत. जणू काही सोनिया व मनमोहन सिंगांच्या सर्व सरकारी घोटाळ्यांना मागे टाकणारा हा घोटाळा आहे असेच ढोल पिटले जात आहेत. पुन्हा एकंदरीत मीडियाच्या अवताराकडे पाहिल्यावर सरकारचा हेतू सफल झाला असेच वाटते. सर्व घोटाळे, बलात्काराच्या घटना, दिल्ली पोलिसांची नपुंसकगिरी या फिक्सिंग प्रकरणाने मागे पडली आहे व देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली पोलिसांना खास शाबासकी देऊन जोरदार पाठ थोपटली आहे. खरे तर राजधानीत दोन नृशंस बलात्कार प्रकरणांत दिल्ली पोलीस आयुक्त व त्यांच्या दलाची इज्जत धुळीस मिळाली आहे. त्यांची अकार्यक्षमता उघड झाली. पोलीस आयुक्त नीरजकुमारांना हाकला, बडतर्फ करा अशी मागणी रस्त्यांवर उतरून लाखोंचा जमाव करीत होता, पण सरकारने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना अभय दिले व आता मनमोहन, सोनिया गांधींच्या यूपीए सरकारचा भ्रष्टाचार गाजत असतानाच त्यावर ‘मात’ करण्यासाठी दिल्ली पोलीस आयुक्तांनी आयपीएलच्या जुगाराचा उतारा समोर आणला. आयपीएल जुगारात जे क्रिकेटपटू अटकेत आहेत त्यांची चौकशी यथावकाश होईलच, पण या प्रकारामुळे पवन बन्सल यांच्या रेल्वे भरती घोटाळ्यावर पाणी पडले आहे. शिवाय पंतप्रधानांचा कोळसा घोटाळा दाबण्यासाठी कायदा मंत्र्यांनी सीबीआयचे प्रतिज्ञापत्र बदलण्याचा जो निर्लज्ज प्रयत्न केला होता त्या दडपेगिरीवरून लोकांचे लक्ष हटविण्यात सत्ताधार्यांना यश मिळाले आहे. अशा तर्हेने दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार हे संकटात सापडलेल्या मनमोहन सरकारच्या मदतीस धावून गेले. त्याबद्दल सोनिया सरकारचे फौजदार सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांची पाठ थोपटली आणि स्वत:चीही पाठ सोनियांकडून थोपटून घेण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे.
देशाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात कॉंग्रेसवाल्यांचा हात कोणीच धरणार नाही. केंद्रातील सध्याच्या राज्यकर्त्यांनी देश विकला आहे. रॉबर्ट वढेरासारख्यांनी तर जागोजाग देशाचा लिलाव मांडला आहे. कोळशापासून स्पेक्ट्रमपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार आहे व ही सरकारी तिजोरीची लूट आहे. पाकड्यांचा दहशतवाद देशाला रोज रक्तबंबाळ करीत आहे. अबलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत. सत्तेतील या दरोडेखोरांच्या टोळीचे नेतृत्व जणू मनमोहन सिंग करीत आहेत, पण आपल्या दरोडेखोरीवरचे लक्ष उडावे म्हणून आयपीएलच्या जुगारी अड्ड्यांवर धाडी घातल्या जात आहेत. सीबीआयने रेल्वे भरतीमधला सगळ्यात मोठा घोटाळा उघड केला. रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला ‘लाच’खोरी करताना पकडले. शेवटी रेल्वेमंत्री बन्सल यांना जनमताच्या रेट्यामुळे राजीनामा द्यावा लागला. मात्र चोवीस तासांत सीबीआयने पवन बन्सल यांना ‘क्लीन चिट’ देण्याचा भीमपराक्रम गाजवला. ही आमच्या देशाची शोकांतिकाच नाही काय? मोठा घोटाळा झाकण्यासाठी दुसरा घोटाळा समोर आणायचा ही एक विचित्र पद्धत सध्या सुरू झाली आहे. आयपीएल घोटाळ्यात एखाद्या बड्या कॉंग्रेसवाल्याचे ‘नाव’ आलेच तर त्यावरून लक्ष उडविण्यासाठी दुसर्या नव्या घोटाळ्याचा पत्ता फेकला जाईल व आमचे मीडियावाले हा नवा जुगारी पत्ता खेळत बसतील. आता शेवटी एक मुद्दा मांडतो व विषय संपवतो. ९ मे रोजी दिल्लीच्या विशेष शाखेचे इन्स्पेक्टर बद्रिश दत्त यांनी ‘स्पॉट फिक्सिंग’विरोधात पहिला गुन्हा दाखल केला. मात्र लगेच दुसर्या दिवशी याच बद्रिश दत्त यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहच आढळून आला. दिल्लीचे पोलीस आयुक्त या संशयास्पद मृत्यूवर बोलायला तयार नाहीत. बद्रिश दत्त यांचा संशयास्पद मृत्यू दडपण्यासाठीच नंतर क्रिकेटपटूंच्या अटकेचे प्रकरण करून गाजावाजा केला काय? तूर्त आम्ही इथेच थांबतो, पण पुन्हा एकदा याप्रकरणी मोठा स्फोट घडवून आम्ही खर्या गुन्हेगारांचे मुखवटे टराटरा फाडणार आहोत हे मात्र नक्की
No comments:
Post a Comment