नीच-दगाबाजांचा खेळ-vasudeo kulkarni
भारतात क्रिकेटचा खेळ सभ्य माणसांचा राहिलेला नाही. तो पैशाला सोकावलेल्या नीच, दगाबाज क्रिकेटपटूंचा आणि प्रेक्षकांशी दगाबाजी करून हजारो कोटी रुपये मिळवणाऱ्या क्रिकेट नियामक संघाचा झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंनी देश-विदेशात जे दिवे लावले, त्याचा जाहीर पंचनामा वारंवार झाला. देशाची आणि क्रिकेटची प्रचंड बदनामी झाली. तरीही, हा फक्त पैशाचा खेळ काही थांबलेला नसल्याचेच इंडियन प्रीमियर लीगच्या तीन सामन्यांमध्ये एस. श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनी स्पॉट फिक्सिंसाठी लाखो रुपयांची लाच खाल्ल्याची घटना पोलिसांनीच उघडकीस आणल्याने पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्याशिवाय या साऱ्या प्रकरणात एकूण 40 हजार कोटी रुपयांची सट्टेबाजी आणि खेळाडू व बुकींमध्ये पैशांची देवघेव झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. इंडियन प्रीमियर लीग ही संघ विकत घेतलेल्या पैसेवाल्या उद्योगपतींमुळे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांमुळे इंडियन पैसा लीग झाली आहे. आयपीएलच्या साखळी सामन्यांच्या गोंडस नावाखाली देश आणि विदेशातल्या क्रिकेटपटूंची जाहीर लिलावाद्वारे कोट्यवधी रुपयांना खरेदी-विक्री सुरू झाली. खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि या संघांचे मालक प्रेक्षकांना लुबाडून मालामाल झाले. प्रेक्षकांशी दगाबाजी करून, काही भारतीय खेळाडूंनीच सट्टेबाजांच्याकडून तीन सामन्यांतल्या प्रत्येकी एका षटकासाठी बेशरमपणे पन्नास-साठ लाख रुपये घेतल्याचे प्रकरण दिल्ली पोलिसांनी उघडकीला आणल्यामुळे, भारतीय क्रिकेटच्या उरल्यासुरल्या अब्रूची होळी झाली आहे. या तीन खेळाडूंनी सट्टेबाजांशी कसा संपर्क साधला, त्यांच्याशी काय बोलणे केले? स्पॉट फिक्सिंग कसे केली? लक्षावधी रुपये कसे कमावले? याचा तपशील दिल्ली पोलिसांनी या तीनही खेळाडूंना दहा बुकींसह अटक केल्यानंतर जनतेला दिला आहेच. पण त्यापेक्षाही अतिभयंकर आणि लाजिरवाणी बाब म्हणजे श्रीसंत आणि चंडिला या नतद्रष्ट-नालायक खेळाडूंनी सट्टेबाजांच्याकडून निर्लज्जपणे ललना पुरवायचीही मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. श्रीसंतला दिल्ली पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली, तेव्हा तो सट्टेबाजांनी पाठवलेल्या ललनांच्या गराड्यातच होता. न्यायाधीशांच्यासमोर हजर करायसाठी नेताना या तीनही खेळाडूंनी आपली काळी तोंडे लपवायचा प्रयत्न केला. वास्तविक या तिघांनाही भर चौकात उभे करून जोड्यांनी मारायला हवे. त्यांचे कृत्य हे भयंकर तर आहेच, पण भारतीय क्रिकेट हे आता रसातळाला गेल्याचेही जगासमोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे कडक शिस्तीचे आहे आणि ते असली बेशिस्त (!) मुळीच खपवून घेणार नाही. संबंधित खेळाडूंवर कडक कारवाई करेल, अशी पोकळ दमबाजी करणाऱ्या क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना, आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेत भ्रष्टाचार-लाचखोरी झाली नसावी, असे वाटते. मुळातच या क्रिकेट नियामक मंडळानेच, भारतीय क्रिकेटची वाट लावली, पुरते वाटोळे केले आणि आता तर त्याला आगच लागली आहे.
पैसा हेच सर्वस्व
भारतातल्या क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट हा धर्म राहिलेला नाही. मिळेल त्या मार्गाने प्रचंड पैसा कमवायचा हा त्यांचा धर्म आणि उद्योग झाला आहे. क्रिकेटपटू म्हणून त्यांना सरकारी व खाजगी कंपन्या आणि सरकारी खात्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपयांचा तोबरा क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या तोंडात भरते. संघात निवड झाल्यावर, प्रत्यक्ष सामन्यात राखीव ठेवलेल्या क्रिकेटपटूंना क्रीडांगणात न उतरताही प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपये मिळतात. आता जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच बाळसे धरलेल्या ट्वेंटी-20 प्रकाराच्या जगभरात होणाऱ्या स्पर्धा आणि आयपीएलमुळे क्रिेक्रेटपटूंना पैसा मिळवायची खाणच सापडली. आयपीएलमुळे क्रिकेटचा आणि खेळाडूंचा जाहीर लिलाव सुरू झाला. संघांच्या मालकांनी कोट्यवधी रुपयांची बोली बोलून देशी व परदेशी खेळाडूंना विकत घेतले. शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आणि संपत्ती मिळवूनही राजकारण्यांच्याप्रमाणेच या खेळाडूंनाही पैसा मिळवायचा भस्म्या रोग लागला आहे. कोणतीही स्पर्धा सुरू नसताना किंवा स्पर्धा सुरू असतानाही जाहिरातींद्वारे शेकडो कोटी रुपयांची माया मिळवूनही त्यांचे समाधान होत नाही. क्रिकेट नियामक मंडळावर बड्या राजकारण्यांचेच वर्चस्व असल्यानेच, आपल्या या मालकांचाच झटपट पैसे मिळवायचा आदर्श या नादान खेळाडूंनी घेतला. पैसा मिळवायला सोकावलेल्या या खेळाडूंची राष्ट्राचा आणि राष्ट्रपतींचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मश्री उपाधीचा स्वीकार करायला दोन खेळाडू राष्ट्रपती भवनातल्या सोहळ्याला गेलेच नाहीत. त्या दिवशी ते जाहिरातीसाठी चित्रिकरण करत होते. तरीही नियामक मंडळाने त्यांच्यावर कारवाई तर सोडाच, पण साधा जाबही विचारला नाही. बेलगाम आणि उन्मत्त झालेल्या या खेळाडूंनी नियामक मंडळाने केलेल्या नियमावलीवर सह्या करतानाही थयथयाट केला होता. त्यात अगदी सचिन तेंडुलकरही होताच. स्वार्थासाठी हे सारे एक होतात. नियामक मंडळालाच आव्हान देतात. यापूर्वीही सामना निश्चितीच्या घटना उजेडात आल्यावरही नियामक मंडळाने या असल्या नालायक खेळाडूंवर काहीही कारवाई केली नाही. त्यांना फक्त संघातून काही काळापुरते हाकलले, फार तर एखाद्यावर आजन्म बंदीची शिक्षा लादली; पण त्यामुळे क्रिकेटपटूंचे फारसे नुकसान झाले नाही. आधीच त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली होतीच. माजी कर्णधार अझरउद्दीन हा सामना निश्चितीच्या प्रकरणातच संघाबाहेर गेला आणि नंतर चक्क कॉंग्रेसचा खासदार झाला. क्रिेकेट खेळताना कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या खेळाडूंना ते निवृत्त झाल्यावर पुन्हा लक्षावधी रुपयांची पेन्शन देणाऱ्या या नियामक मंडळाला देशातल्या गोरगरीब जनतेची कसलीही जाणीव नाही. जनतेच्या सुख-दु:खाशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. क्रिकेटमधून दरवर्षी हजारो कोटी रुपये मिळवायचे आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांची सोय करुन ठेवायची एवढा एककलमी धंदा या मंडळाने सुरू ठेवल्यानेच क्रिकेटपटूही मोकाट सुटले. त्यांना कुणाचीही भीती वाटेनाशी झाल्यामुळेच आयपीएलच्या सामन्यात अर्धनग्न ललना "चिअरगर्ल्स' नाचवणाऱ्या मंडळाच्या या खेळाडूंनी आता रात्रीच्या मौजमजेसाठी थेट ललनाच मागायला सुरुवात केली. क्रिकेटची इतकी अधोगती यापूर्वी कधीच झाली नव्हती. ती या घटनेने झाली असली तरी, भारतीय क्रिकेटला यापूर्वीच भ्रष्टाचाराचे-सामना निश्चितीच्या किळसवाण्या विश्वासघातकी प्रकाराचे खग्रास ग्रहण लागले होतेच. "बुकी, गॅम्बलर, फिक्सर स्पाय-अ जर्नी टू द हार्ट ऑफ क्रिकेटस् अंडरवर्ल्ड' या पुस्तकात पत्रकार ऍड हॉकिन्स यांनी भारतीय व जागतिक क्रिकेटमधल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा केला आहे. आता आयपीएल ट्वेंटी-20 स्पर्धेवर केंद्र सरकारनेच कायमची बंदी घालून, क्रिकेटचा खेळ बदमाशांच्या तावडीतून सोडवायला हवा. हाच या घटनेतून मिळालेला धडा होय.
No comments:
Post a Comment