क्रिकेटच्या जुगारातील कौरव एका पिढीस विनाशाच्या कड्यावरून ढकलत आहेत-
हे कसले क्रिकेट?आयपीएलने अनेक नव्या व उपेक्षित खेळाडूंना नाव आणि पैसा मिळवून दिला हे खरे असेलही, पण देशात हवाला, जुगार व सेक्स रॅकेटचे नवे दालनही उघडून दिले हेसुद्धा नाकारता येणार नाही. क्रिकेटच्या जुगारातील कौरव एका पिढीस विनाशाच्या कड्यावरून ढकलत आहेत.इंग्रज गेले, पण त्यांनी क्रिकेटचा वारसा आपल्यासाठी मागे ठेवला आहे. क्रिकेट हा ‘जण्टलमन’ म्हणजे सभ्य लोकांचा खेळ असल्याचे म्हटले जात होते, पण या सभ्य लोकांच्या खेळाचे कसे धिंडवडे निघाले आहेत ते पुन्हा एकदा दिसले. आय.पी.एल. क्रिकेटमध्ये ‘स्पॉट फिक्सिंग’ केल्याच्या आरोपाखाली श्रीशांत, अंकित चव्हाण व अजित चंडिला या तीन खेळाडूंना दिल्लीच्या पोलिसांनी अटक केली. सारे क्रिकेट विश्वच त्यामुळे हादरून गेले आहे. मैदानावर उतरणारे क्रिकेटपटू पूर्वी पांढर्याशुभ्र कपड्यात उतरत होते. हे सर्व क्रिकेटपटू फक्त देशासाठी खेळत होते. त्यांना ‘धन’ मिळत नव्हते तर फक्त मानसन्मान मिळत होता. त्यांच्या शुभ्र कपड्यांची जागा आता प्रायोजकांच्या निळ्या, पिवळ्या, गुलाबी ‘टी शर्टस्’ने घेतली. हे खेळाडू देशासाठी नव्हे तर त्या प्रायोजकांसाठी, बड्या औद्योगिक घराण्यांसाठीच खेळत असतात. खेळभावना व देशभावना लोप पावल्यामुळेच खेळाचा सट्टेबाजार झाला व या खेळाचे नियंत्रण पाकिस्तान, दुबई, मुंबई, दक्षिण आफ्रिकेतील सट्टेबाजांच्या हाती गेले. आधी सहा दिवसांचे कसोटी क्रिकेट होते. मग ‘वन डे’ आले. नंतर ‘२०-ट्वेण्टी’ आले. आता तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल आले व क्रिकेट म्हणजे एक फार मोठी आर्थिक उलाढाल असलेला उद्योग बनला. तसे नसते तर अंबानीपासून विजय मल्ल्यापर्यंत आणि शाहरुख खानपासून प्रीती झिंटापर्यंत सगळ्यांनी ‘आयपीएल’मध्ये गुंतवणूक केली नसती. आयपीएलमध्ये तर ‘दोन नंबरी’ व ‘दस नंबरी’ पैसाच खुळखुळ वाजतो आहे व त्यात अनेक राजकारण्यांनी हात धुऊन घेतले
आहेत. कसोटी असो की ‘आयपीएल’ प्रत्येक सामन्यावर, प्रत्येक चेंडूवर व प्रत्येक फटक्यावर फिक्सिंग होते व जुगार चालतो. हे क्रिकेट खेळाच्या बिघडलेल्या आरोग्याचे लक्षण आहे. क्रिकेट खेळातला जुगार हा शे-पाचशे कोटींचा नसून हजारो कोटींचा असतो. महाराष्ट्रासारख्या राज्यातील खेडेगावात हा जुगार पोहोचला आहे. कालच मुंबईत एका लहान मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे दोन्ही गुन्हेगार चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण आहेत. त्यांनी असे निर्घृण कृत्य का केले? तर आयपीएल क्रिकेटच्या ‘बेटिंग’मध्ये ते हरले. त्यांचे नुकसान झाले. ‘बुकी’ने तगादा लावल्यामुळे त्यांनी ३० लाखांसाठी त्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. आयपीएलमध्ये आता जुगार्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे व या जुगारात एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. क्रिकेट खेळाचा जुगार झाला आहे व त्यात भलेभले लोक अडकले आहेत. राजकारणी, बड्या क्रिकेटपटूंची नावे त्यात बदनाम झाली. हिंदुस्थानात अझरुद्दीन, अजय जडेजासारखे क्रिकेटपटू या जाळ्यात अडकले. कपिल देवसारख्या क्रिकेटपटूवरही शिंतोडे उडाले. हॅन्सी क्रोनिएचा विमान अपघातातला मृत्यू आजही संशयाच्या भोवर्यात आहे. चार वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बॉब वुल्मरच्या संशयास्पद मृत्यूभोवतीही ‘बेटिंग’ आणि ‘फिक्सिंग’च्या संशयाचेच जाळे होते. हे संपूर्ण ‘बेटिंग’ व ‘फिक्सिंग’ करणारे लोक अंडरवर्ल्डचे सरदार आहेत. आता कुणी शेअर बाजारात पैसा गुंतवताना दिसत नाही. क्रिकेटच्या सट्टेबाजारात पैसा गुंतवून झटपट श्रीमंत
होण्याकडे अनेकांचा कल आहे. करोडोंची उलाढाल तेथे होते व पोलीस फक्त इकडे तिकडे धाडी टाकत असतात. अशीच एक धाड आता राजस्थान रॉयलच्या तीन क्रिकेटपटूंवर पडली. श्रीशांत, अंकित चव्हाण व चंडोलियास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. काही बुकींनाही पकडले. श्रीशांतच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, श्रीशांतला अडकवण्यामागे महेंद्रसिंग धोनी व हरभजन सिंग आहेत. करीअर संपवून टाकण्याची धमकी धोनीने श्रीशांतला दिली होती. धोनीच्या अनेक वैयक्तिक गोष्टी श्रीशांतला माहीत होत्या व मैदानावरच एकदा श्रीशांतविरुद्ध हरभजनचा ‘फटकेबाज’ सामना झाला होता. त्यामुळे श्रीशांतचे वडील जे सांगत आहेत त्याचीही खोल चौकशी व्हायला हवी. हिंदुस्थानी क्रिकेटला टोळी युद्धाचे स्वरूप निर्माण झाले आहे व या टोळ्यांचे वेगवेगळे पोशिंदे आहेत. राजकारणातील शरद पवारांपासून राजीव शुक्लापर्यंत पुढार्यांनी क्रिकेट धंद्याचा ताबाच घेतला आहे. ज्या आयपीएलचा आता जुगार बाहेर आला त्याचे सध्याचे प्रमुख कॉंग्रेसचे राजीव शुक्ला आहेत. त्यामुळे या जुगाराची जबाबदारी राजीव शुक्ला यांना सहज झटकता येणार नाही. आयपीएलने अनेक नव्या व उपेक्षित खेळाडूंना नाव आणि पैसा मिळवून दिला हे शरद पवारांचे म्हणणे खरे असेलही, पण देशात हवाला, जुगार व सेक्स रॅकेटचे नवे दालनही उघडून दिले हेसुद्धा नाकारता येणार नाही. पांडव जुगारात हरले. त्यांनी राज्य गमावले व द्रौपदीसही गमावले. क्रिकेटच्या जुगारातील कौरव एका पिढीस विनाशाच्या कड्यावरून ढकलत आहेत. क्रिकेट हा आता सभ्य लोकांचा खेळ राहिलेला नाही व येथे आता देशप्रेमाचाही संबंध उरलेला नाही. आम्ही जेव्हा पाकिस्तानी क्रिकेटपटूंना देशप्रेमापोटी विरोध करतो तेव्हा ‘क्रिकेटमध्ये राजकारण किंवा धर्म आणू नये’ असे दात विचकत सांगणार्यांना क्रिकेटमधला जुगार, सेक्स व गुंडगिरी मान्य आहे काय?
No comments:
Post a Comment