निकाल झाला; न्याय नाही!
मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयातही लागला आहे. या खटल्यातील मुख्य आरोपींना फाशी होणार की जन्मठेप यापेक्षा संजय दत्तचे काय होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले होते. १२ मार्च १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबईच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि देश मुळापासून हादरला होता. विशेष न्यायालयाने, उच्च न्यायालयाने व आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यातील आरोपींना शिक्षा ठोठावल्या आहेत. संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली. बॉम्बस्फोटांतील एका आरोपीकडून ‘एके-५६’ बंदूक घेतल्याचा आरोप त्याच्यावर होता व त्यानुसार त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. संजय दत्तने १८ महिन्यांचा तुरुंगवास आधीच भोगला आहे. त्यामुळे आता उरलेली साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवावी लागतील. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मग तो नेता असो की अभिनेता. त्यामुळे संजूबाबापुढे आता ठोठावलेली शिक्षा भोगण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. याच खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. अन्य दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली आहे. हे दहाजण गरीब व अशिक्षित होते. त्यांना प्याद्यासारखे वापरण्यात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दया दाखविली. खरे तर या संपूर्ण कटकारस्थानात सगळीच प्यादी होती व दाऊद इब्राहिम हाच वजीर होता. पण वजीर पाकिस्तानात सुरक्षित आहे व प्यादी फासावर लटकली आहेत. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचू शकले नाहीत. हिंदुस्थान सरकार गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानकडे फक्त ‘दाऊद द्या, दाऊद द्या’ अशी मागणीच करीत बसले आहे. वास्तविक अशी मागणी करून दाऊदसारखा भयंकर गुन्हेगार पाकिस्तान आपल्या ताब्यात देईल हा विचारच मूर्खपणाचा आहे. अफझल गुरूच्या फाशीनंतर ज्या पाकिस्तानी संसदेने अफझलला श्रद्धांजली वाहिली व हिंदुस्थानचा निषेध केला त्यांच्याकडून दाऊद आपल्याला मिळेल तरी कसा? अमेरिकेने लादेनचा ज्याप्रमाणे पाकिस्तानात जाऊन खात्मा केला त्याप्रमाणे दाऊदचा खात्मा आपण पाकिस्तानात जाऊन करायला हवा होता. अमेरिकेने पाकिस्तानकडे लादेनची मागणी केलीच नाही. आपले कमांडोज पाकिस्तानात घुसवून सूड घेतला. हिंदुस्थानला अशी हिंमत दाखवता आली असती तर खर्या अर्थाने या बॉम्बस्फोट खटल्याचा न्याय झाला असता. अर्थात सीमेवरील हिंदुस्थानी जवानाचे शिर कापून पाकिस्तानात नेले तरी आपण गप्पच आहोत. त्यामुळे तब्बल २० वर्षांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना शिक्षा ठोठावल्या यावर काय बोलायचे! बॉम्बस्फोट कटाचे सूत्रधार मोकळेच आहेत व पालापाचोळा फासावर गेला. संजय दत्तचे काय होणार यातच सगळ्यांना रस होता. दाऊदला कधी खतम करताय, असे प्रश्न न्यायालयाच्या व मीडियाच्या मुखातून बाहेर पडले असते तर बरे झाले असते. त्यामुळे खटल्याचा फक्त निकाल लागला, पण न्याय झाला नाही. जे मृत झाले त्यांच्या परिवारांचे दु:ख तसेच आहे. जे जखमी झाले त्यांची वेदना व जखम भरलेली नाही. मग २० वर्षांनंतर झाले काय? बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. सगळ्यांसाठी हाच निकाल आहे.
No comments:
Post a Comment