Total Pageviews

Thursday, 21 March 2013

 

सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे राहिले नसून कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे झाले आहे. राज्य कॉंग्रेस आघाडीचे नसून सीबीआयचे आहे.
सीबीआयचे राज्य!
केंद्रातील ‘सोनिया’ सरकारने सीबीआयचा जो दुरुपयोग चालवला आहे त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. द्रमुक पक्षाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली. या घोषणेस चोवीस तास होत नाहीत तोच सीबीआयचे कर्तबगार पथक चेन्नईस पोहोचले व द्रमुकचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांच्या घरावर धाडी घातल्या. स्टॅलिन यांनी परदेशी गाड्यांचे कर चुकवल्याचे एक जुने प्रकरण बाहेर काढले व धडाधड छापे घातले. सीबीआयचा हा गैरवापर आहे, राजकीय दहशतवाद आहे. स्टॅलिन यांनी गुन्हा केला होता. मग त्यांच्या मुसक्या आधीच का नाही आवळल्या? म्हणजे जोपर्यंत केंद्रातील सत्तेला त्यांचा टेकू होता तोपर्यंत सरकारला या करचुकवेगिरीशी काहीच देणेघेणे नव्हते आणि सीबीआयसुद्धा ही फाइल बंद कपाटात ठेवून झोपी गेले होते. द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढून घेताच सीबीआयमधला कर्तव्यदक्ष फौजदार जागा झाला. सोनिया-मनमोहन यांचे ‘यूपीए २’ सरकार म्हणजे अनेक पक्षांचे कडबोळे आहे, पण या आघाडीतला प्रमुख घटक पक्ष म्हणजे सीबीआय आहे. केंद्रातील सोनिया सरकार टिकले आहे ते सीबीआयच्या धाकावर. म्हणूनच सरकार टिकण्याचे सर्व श्रेय सीबीआयलाच द्यावे लागेल. द्रमुकने पाठिंबा काढून घेताच मुलायमसिंग यादव हे शरद पवारांना जाऊन भेटले. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावरील धाडी हा मुलायम आणि मायावतीसारख्यांना इशारा आहे. इकडे तिकडे वळाल, वाकडे पाऊल टाकाल तर सीबीआयचे पथक तुमच्या घरी पोहोचेल अशी ही धमकी आहे. सीबीआयची बंदुकीची नळी कानशिलावर ठेवून मुलायम आणि मायावतींचा पाठिंबा केंद्र सरकारने मिळविला आहे. हे अनैतिक आहे असे कुणाला वाटत नाही. नितीन गडकरी हे भाजप अध्यक्षपदासाठी दुसर्‍यांदा तयारी करीत होते व उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार तोच सीबीआय व इन्कम टॅक्सवाले जागे झाले व त्यांनी ‘पूर्ती’ प्रकरणात धाडी वगैरे घालण्याचे नाटक केले. त्यामुळे गडकरी यांना मागे हटावे लागले व त्यांना पुन्हा अध्यक्ष होता आले नाही. गडकरी यांनी माघार घेताच ते सीबीआय आणि इन्कम टॅक्सवालेही बर्फाच्या गोळ्यासारखे थंडगार पडले. त्या ‘पूर्ती’ प्रकरणाचे काय झाले हे आता कोणीच सांगू शकणार नाही. कारण गडकरींना अध्यक्षपदाच्या रिंगणातून हटवण्यासाठीच या धाडी होत्या, पण या धाडी ना रॉबर्ट वढेरावर पडतात, ना सोनियांच्या इटालियन नातेवाईकांवर. त्यांना मात्र ‘क्लीन चिट’ देण्यातच हे सीबीआयवाले धन्यता मानत असतात. हेलिकॉप्टर घोटाळ्यात माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांना सुळावर चढवले जात आहे, पण त्यातले खरे लाभार्थी कॉंग्रेसचे उच्चपदस्थ आहेत. कोळसा घोटाळ्याचा इतका गाजावाजा झाला, पण सीबीआयची कुंभकर्णी झोप काही मोडली नाही. सीबीआयची जबाबदारी भ्रष्टाचार खणून काढणे नसून सोनियांचे भ्रष्ट सरकार जे पाडू इच्छितात त्यांना धाक दाखविणे ही आहे. सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे राहिले नसून कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे झाले आहे. गडकरी व स्टॅलिन यांच्यावरील धाडींमुळे ते सिद्धच झाले आहे. राज्य कॉंग्रेस आघाडीचे नसून सीबीआयचे आहे. हे थांबवायला हवे

No comments:

Post a Comment