कानून के हाथ छॊटे होते है,
असा प्रसिद्ध टाळीबाज संवाद हिंदी चित्रपटांत वर्षानुवर्षे ऐकू येत होता. तर "आम्ही न्यायालयात करतो तो कागदावरचा न्याय असतो; खरा न्याय देवच करतो', असे अनुभवाचे बोल अनेक न्यायाधीश ऐकवितात. मुंबई-महाराष्ट्रात किंबहुना भारतात 1993 पासून झालेल्या भीषण हिंसाचाराच्या घटनांमधील कोणाही आरोपीला अद्याप फासावर लटकविण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोपींना "कानून के लंबे हाथ' नको; तर देवाचाच न्याय लावावा, अशी मनोमन मागणी बळी पडलेल्यांचे नातलग करीत आहेत.
मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या 10 अतिरेक्यांपैकी वाचलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला न्यायाधीश या आठवड्यात शिक्षा देतील.
विशेष म्हणजे या मोठ्या हल्ल्यांमधील कनिष्ठ न्यायालयात चाललेला हा सर्वांत वेगवान खटला. नोव्हेंबर 2008 मध्ये हा हल्ला झाल्यावर सुमारे दीड वर्षात खटल्याचा निकालही लागतो आहे; मात्र वेगवान निकालाचे हे सातत्य यापुढे राखले जाईल का, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
मुंबईतील 1993 च्या भीषण बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल विशेष टाडा न्यायालयात लागण्यास सन 2007 उजाडले. अर्थात 13 ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट, त्यातील 100 पेक्षा जास्त आरोपी, त्याचे शेकडो साक्षीदार या सर्व पसाऱ्यामुळे या खटल्यास असा वेळ लागणे अपरिहार्य होते; मात्र आरोपींच्या वकिलांनी सरकारपक्षाला सहकार्य केले असते आणि सर्व साक्षीदारांऐवजी मोजक्याच साक्षीदारांची उलटतपासणी घेतली असती, तर खटला अजूनही लवकर संपला असता, असे ज्येष्ठ पोलिस अधिकारी सांगतात.
गाड्यांमध्ये स्फोटके भरणाऱ्या, तसेच स्फोटकांनी भरलेल्या गाड्या जागेवर नेऊन ठेवणाऱ्या 10-12 जणांना टाडा न्यायालयाने फाशी दिली. अन्य 30-40 आरोपींना जन्मठेपेच्या वेगवेगळ्या कालावधीच्या शिक्षा झाल्या. अभिनेता संजय दत्त याला बॉम्बस्फोटाचा कट माहीत नसल्याने त्याच्यावरचा टाडा काढण्यात आला; पण त्याने आपल्या घरी एके-47, हातबॉम्ब हाताळल्याने त्याच्यावर भारतीय दंडसंहितेनुसारचे आरोप सिद्ध झाले. त्यासाठी त्याने आतापर्यंत दीड वर्षाची शिक्षाही भोगली आहे.
खटल्याचा निकाल लागल्यावर फरारी आरोपी अबू सालेम यास भारतात आणण्यात आले; मात्र त्याला फाशी देणार नाही, ही पोर्तुगाल सरकारची अट मान्य केल्याने त्यालाही देहदंड मिळणार नाही, हे निश्चित. या खटल्यात सर्वच छोटे आरोपी अडकले; मात्र मुख्य कट रचणारा दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आदींना पाकिस्तानातून भारतीय न्यायालयासमोर आणण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही. सुदैवाने हा खटला टाडा कायद्यानुसारचा असल्याने त्याचे अपील उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात गेले; मात्र तेथेही तीन वर्षे हे अपील प्रलंबितच राहिले आहे. एक-दोन वर्षांत आता हे प्रकरण संपले पाहिजे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
मुंबईतील रेल्वेत सन 2006 मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून आणणारे सर्व आरोपी सुखरूप पाकिस्तानात पळून गेले. स्फोटके ठेवणारा केवळ एकच आरोपी या स्फोटात ठार झाला. त्यामुळे आता या मुख्य आरोपींना फुटकळ साह्य करणाऱ्या नऊ आरोपींवर येथे खटला भरण्यात आला आहे. या आरोपींवर मोका लावण्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हा मोका योग्य असल्याचे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्याने आता हा खटला सुरू होईल. अर्थात, त्या आरोपींवर हे आरोप सिद्ध होतील का, त्यांची अपिले उच्च व सर्वोच्च न्यायालयात किती वेळ चालतील, त्यांच्या दयेच्या अर्जावर निकाल देण्यास माननीय राष्ट्रपती किती वेळ लावतील, हे कोणालाच माहीत नाही.
कंदाहार विमान अपहरण खटल्याचीही काहीशी अशीच अवस्था आहे; त्यातील सर्व आरोपी सुखरूप अफगाणिस्तानात गेले. आणि तो आता पाकिस्तानात बसून भारताला वाकुल्या दाखवितो आहे. मालेगावात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांचे खटलेही मोका की आयपीसी या प्रश्नात अडकले असून, हे स्फोट तसे कमी तीव्रतेचे असल्याने ते आता "बॅकस्टेज'ला गेले आहेत. मुंबईत मुलुंड, घाटकोपर आदी ठिकाणी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटांचेही खटले असेच अडथळ्यांच्या शर्यतीत धावत आहेत. गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या तीन आरोपींना (एका महिलेसह) कनिष्ठ न्यायालयाने फाशी दिली असली तरी उच्च व सर्वोच्च न्यायालयात खटला चालल्यानंतरच त्यांच्या फाशीचा अंतिम निर्णय होईल.
संसदेवर हल्ला करणारे सर्व अतिरेकी आपल्या सुरक्षा दलांच्या प्रतिकारामुळे ठार झाले; मात्र त्यातील आरोपी अफझलगुरू याच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करूनही त्याच्या दयेच्या अर्जावर अद्याप राष्ट्रपतींनी निर्णय घेतला नसल्याने तो करदात्यांच्या पैशांमधून पाहुणचार झोडतो आहे. मुळात अशा आरोपींना दया का दाखवावी, असा प्रश्न नागरिक विचारतात. कानून के लंबे हाथ या आरोपींना काहीही करू शकत नाहीत, अशीच लोकांची भावना होत चालली आहे; तर दुसरीकडे मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या अन्य नऊ अतिरेक्यांना एनएसजी कमांडो व मुंबई पोलिसांनी डोळ्यात-डोक्यात-तोंडात गोळ्या मारून ठार मारले. देवाचा न्याय कसा असतो, हे सर्वांनाच त्यातून दिसून आले अन् कसाबलाही देवानेच न्याय का दिला नाही, असा प्रश्नही लोक आता विचारू लागले आहेत.थोडक्यात काय, न्यायाचा खेळखंडोबा देशात चालूच आहे. सगळे व्यवस्थित आहे यात व्यवस्थेपेक्षा दैवाचाच / नशिबाचाच भाग मोठा आहे असे म्हटले तर काही चूक होणार नाही. पोलीस अधिकारीच जेंव्हा असे म्हणतात तेंव्हा स्वसंरक्षणासाठी प्रत्येकाने सिद्ध राहावे हेच काय ते आपल्या हातात आहे. ते राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय हा तर अजूनच एक मोठा विनोदाचा भाग आहे. वास्तवापासून लाखो मैल दूर असलेल्या या व्यवस्थेपासून आणखी काय अपेक्षित असणार?
No comments:
Post a Comment