परदेशप्रवास करून परतताना आणलेल्या वस्तूंवर कस्टम्स ड्युटी भरावी लागते, हे नीट माहीत असूनही अनेक मंडळी दागिने आणि वस्तूंच्या मोहात पडून ती चुकवण्याचा प्रयत्न करतात आणि अडकतात. बड्या मंडळींनाही हा मोह आवरत नाही. नियम माहीत नसल्यामुळेही अडचणीत येणारेही लोक आहेत...कस्टम्स ड्युटीचा हा फंडा नेमका काय आहे, यावर टाकलेला प्रकाश...
.............
टोरॅन्टोमधील चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आटोपून मुंबईत परतताना बॅन्ड बाजा बरातफेम अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला विमानतळावर कस्टम्सवाल्यांनी रोखलं आणि तिच्या सामानातील अघोषित मूल्याच्या दागदागिन्यांबद्दल तिची कसून चौकशी करण्यात आली. नऊ तासांनी अनुष्का तिथून सुटली खरी, पण दागदागिने आणि नऊ लाख रुपयांची किमती घड्याळं नेमकी कस्टम्स ड्युटी चुकवून आणली की कसं, याचा निक्काल अजून लागायचाय. अनुष्का ही काही अशा प्रकारे कस्टम्सच्या जाळ्यात आलेली एकमेव अभिनेत्री नव्हे. खरं तर अभिनेत्रीच कशाला, ती काही अशी एकमेव प्रवासीच नव्हे, असं म्हटलं तर त्यातून बरंच काही स्पष्ट होईल.
वर्षभरात साडेआठशे प्रकरणे
मुंबई विमानतळावर परदेशातून उतरल्यावर प्रावाशाकडे असलेल्या वस्तूंवर कस्टम्स ड्युटी भरावी लागते. या ड्युटीवर काही सवलती असतात. या नियमांना बगल देऊन ड्युटी चुकवून सवलतीच्या मर्यादेपेक्षा अधिक मूल्याचं बॅगेज आणणाऱ्या प्रवाशांची कस्टम्सकडून चौकशी होते. अनुष्का, बिपाशा यांच्यासारखीच. मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात एकट्या मुंबई विमानतळावर अशी तब्बल साडेआठशे प्रकरणे झाली.
६० टक्के 'कॅरिअर्स'
वर्षाकाठी पकडल्या जाणाऱ्या या प्रकरणांपैकी किमान ६० टक्के जण हे 'कॅरिअर' असतात, अशी माहिती हाती आली आहे. याचाच अर्थ हे ६० टक्के जण केवळ स्वत: किंवा कुटुंबासाठी नव्हे, तर इतर कुणासाठी तरी व्यवसाय म्हणून त्या वस्तू आणत असतात. कस्टम्सची कारवाई ही त्यासाठी सुरू असते. गेल्या काही वर्षात मोबाइल तसंच इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये लागणारी मेमरी कार्ड ड्युटी चुकवून आणण्याचं प्रमाण वाढल्याचं लक्षात आलंय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणेच केशराचंही प्रमाण लक्षणीय आहे.
साधारण १९७०-८० च्या दशकात भारतातून अनेक जण दुबई, मस्कत, अबुधाबी इथे नोकरीनिमित्ताने जायला लागले. ते भारतात परतायचे, तेव्हा सुट्टीच्या काळात वरकमाई म्हणून येताना टेपरेकॉर्डरच्या कॅसेटपासून सेन्ट परफ्युमपर्यंत अनेक वस्तू इथे विकायला आणायचे. त्यावेळीही बॅगेजचे नियम होतेच. पण लोक या ना त्या मार्गाने आपली सुटका करून घ्यायचे. (अजूनही त्या क्लृप्त्या लोक वापरत असतातच.) अलीकडे अनेक वस्तू भारतातल्याच मॉल्समध्ये मिळू लागल्या. तुलनेने अशा भाराभर वस्तू विकायला आणण्याचं प्रमाण थोडं कमी झालंय. पण गेल्या दहा वर्षात भारतीयांचं परदेशगमनाचं प्रामाणही वाढलं, सुबत्ता वाढली आणि त्यानुसार शॉपिंगची सवयही. त्यामुळेच ड्युटी फ्रीच्या सवलतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी, असाही एक सूर पर्यटकप्रवाशांमध्ये असतो.
नेपाळ, भूतान, म्यानमार, हाँगकाँग व चीन या व्यतिरिक्त कोणत्या देशांतून येत असल्यास बॅगेजचे नियम वेगळे आहेत. त्यासाठी परदेशातील वास्तव्य तीन दिवसांपेक्षा अधिक असल्यास दहा वर्षांपवरील व्यक्तीला २५ हजार रुपये मूल्यापर्यंतचं सामान कोणतीही ड्युटी न भरता आणता येतं. दहा वर्षांखालील व्यक्तीस ही मर्यादा सहा हजारांपर्यंत असते. परदेशवास्तव्य तीन दिवसांपर्यंत असेल, तर हीच किंमत अनुक्रमे १२ हजार आणि तीन हजार रुपयांपर्यंत होते. २५ हजार रुपयांवरील मूल्याच्या वस्तूंवर मात्र एकूण ३६.०५ टक्के इतकी कस्टम्स ड्युटी भरावी लागते.
दोन लिटरपर्यंतचं मद्य ड्युटी न भरता आणण्याची परवानगी असते. त्यावरील मद्य किंवा वाइन असल्यास ती २५ हजारांच्या ड्युटीफ्री मूल्यामध्ये गणली जाऊ शकत नाही. नव्या नियमांनुसार १८ वर्षांवरील व्यक्तीस एक लॅपटॉप ड्युटीफ्री स्वरुपात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. २५ हजारांच्या ड्युटीफ्री मूल्यामध्ये अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर, इत्यादी), शस्त्रांच्या गोळ्या, २०० हून अधिक सिगारेट्स, सोने-चांदी किंवा अन्य दागदागिने यांचा समावेश नाही.
वरील सर्व नियम हे वानगीदाखलच होते आणि प्रवाशांनी वेळोवेळी बदलणाऱ्या नियमांची साद्यंत माहिती करून घ्यावी. सांगायचा मुद्दा असा आहे की, या प्रत्येक नियमांमध्ये सवलती देण्यात आल्या असल्या, तरी त्या सरसकट नसतात. ज्या काही सवलती देण्यात आल्या आहेत, त्याबाबतही कस्टम्स नियमांमध्ये बोनाफाइडी बॅगेज असा एक शब्दप्रयोग करण्यात आला आहे. प्रवाशाने दिलेल्या मर्यादेत सामान आणलंय, पण त्याचा हेतू मात्र व्यवसाय करण्याचा असेल, तर ते बोनाफाइडी बॅगेज ठरेलच, असं सांगता येणार नाही. शिवाय व्यक्तिगत वापरासाठी असलेल्या वस्तूंना ड्युटीमधून सवलत देण्यात येते. पण म्हणून एखाद्याने अंगावरच कित्येक तोळे सोन्याचे दागिने स्वत:च्या वापरासाठी असल्याचं दाखवून भारतात प्रवेश करायचं ठरवलं, तर ते चालणार नाही. कारण त्याचा हेतू हा वस्तू विकण्याचा असल्याने तो ड्युटीला पात्र ठरू शकेल. परदेशवारीला जाण्यापूवीर् आपल्याकडील मौल्यवान वस्तू घोषित करण्याचीही तरतूद नियमांमध्ये आहे. अनुष्काच्या बाबतीत तोच प्रश्न उभा राहिला आहे. या सर्वच नियमांमध्ये काही गोष्टी या सापेक्ष आहेत.
यातूनच शंकांनाही वाव राहतोच. पण काही गोष्टींच्या तंतोतंत व्याख्या शक्य नसतात. त्यामुळेच पर्यटक आणि प्रवाशांनो, आपणही अलीकडे कधी ना कधी परदेशवारीला जात असतोच. तेव्हा बॅगेजच्या नियमांची माहिती करून घेतल्यास आपल्यावरही बिपाशा किंवा अनुष्का होण्याची वेळ येणार नाही.
...........
गेल्या काही महिन्यांमध्ये अनुष्काप्रामाणेच बिपाशा बासू, मिनिषा लांबा, मल्लिका शेरावतचा भाऊ असे सेलिब्रेटी वर्गातले विविध चेहरे विमानतळावर कस्टम्सच्या जाळ्यात अडकले. सेलिब्रेटी असल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं जाणं स्वाभाविक होतं. किंबहुना, सेलिब्रेटी चेहरे असल्यामुळेच तर त्याला बातमीचं मूल्य होतं. पण याच कारणांसाठी कस्टम्सच्या चौकशीला सामोरे गेलेले शेकडो प्रवासी एकट्या मुंबई विमानतळावर सापडतात. देशभरातली संख्या तर त्याहून जास्तच.
बॅगेज नियमांनुसार काय आणि किती आणता येतं...
भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कस्टम्सच्या तपासणीला सामोरं जाणं बंधनकारक आहे. भारतात उतरल्यावर प्रवाशाला आपल्याकडील वस्तू जाहीर कराव्या लागतात. इमिग्रेशन ऑफिसरकडे फॉर्म भरल्यानंतर आपल्या बॅगेजसह कस्टम्स चेकसाठी प्रवासी जातो. त्याच्याकडील सामानाचं स्वरुप आणि प्रमाण यानुसार त्याला ग्रीन किंवा रेड चॅनेलमधून पुढे जाण्याचा पर्याय असतो. ड्युटीयोग्य सामान नसल्यास प्रवासी ग्रीन चॅनेलमधून जाऊ शकतो. आता ड्युटी कशाकशावर बसते, सवलतींच्या यादीत कोणत्या वस्तू आहेत, हे बॅगेज नियमांमध्ये स्पष्ट केलेलं असतं. पाच हजार डॉलर्सपर्यंत परकीय चलनाच्या नोटा किंवा नोटांसह दहा हजार वा तत्सम मूल्याचं परकीय चलन यापेक्षा अधिक जवळ बाळगल्यास कस्टम्सपुढे ते घोषित करावं लागतं.
केवळ सेलिब्रेटी टार्गेट, हा आरोप चुकीचा
- कस्टम्स आयुक्त
मुंबई विमानतळावरील कस्टम्सचे आयुक्त प्रमोद गोवंडे यांनी सध्याच्या चर्चेविषयी सांगितलं की, पब्लिसिटीसाठी आम्ही सेलिब्रेटींना टार्गेट करतो आहोत, या आरोपात अजिबात तथ्य नाही. प्रवाशाला नाहक त्रास देण्याची आमची अजिबात भूमिका नसते. आकलनाअभावी चूक घडल्याचे दिसले, तर त्यांना ड्युटी भरून सामानसुमान घेण्याची संधी असतेच. बिपाशा बासू यांनी २५ हजारांचं ड्युटीफ्री बॅगेज वगळता उरलेल्या मूल्याच्या बॅगेजवर साडेबारा हजार रुपये ड्युटी भरली. एखाद्या व्यक्तीने पाच हॅन्डिकॅम आणले, तर ते स्वत:साठी नक्की नसणार, हे स्पष्ट होते. पण एखाद्या उच्च उत्पन्न गटातील व्यक्तीने लाख रुपयांचा टीव्ही आणला, तरी तो स्वत:च्या वापरासाठी असू शकतो. पण त्यावर २५ हजारांची सवलत देऊन उरलेल्या रकमेवर त्याला ड्युटी भरावी लागते, असे प्रकार घडतात.
ड्युटीयोग्य वस्तू असूनही ते घोषित न करता ग्रीन चॅनेलमधून येण्याचा प्रयत्न करणं, यातून मात्र संशय बळावतो. बॅगेज ड्युटी व दंड मिळून गेल्या वर्षी ७.६१ कोटी रुपये महसूल मुंबई विमानतळावर मिळाला. तर कुरिअरच्या ड्युटीमार्फत २७४ कोटी आणि इतर मौल्यवान कागोर्वर १६ कोटी व इतर ड्युटी मिळून गेल्यावर्षी एकूण ३२५ कोटी रुपये महसूल विमानतळावर ड्युटीद्वारे मिळाला, असं गोवंडे यांनी सांगितलं
No comments:
Post a Comment