Total Pageviews

Sunday 19 June 2011

OSAMA BIN LADEN GOVT & MUNNI

लादेन-मुन्नी आणि कॉंग्रेस ऐक्य समूह Friday, June 17, 2011 AT 01:02 AM (IST) अल्‌ कायदाचा म्होरक्या ओस्मा बिन लादेन, सलमान खान याच्या "दबंग' चित्रपटातल्या मलाईका अरोरानं "मुन्नी बदनाम हुई', केलेल्या - गाजलेल्या ऍटम सॉंगचा आणि कॉंग्रेस पक्षाचा तसा काहीही संबंध नाही. लावताही येणार नाही. पण, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मात्र हा संबंध जोडून, राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर हल्ले चढवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, प्रणव मुखर्जी या मुलूख मैदान तोफाही गडकरींच्या माऱ्यानं थंड पडल्या. विरोधी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खालच्या थराला जावून निंदा नालस्ती करायला सोकावलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या भाटांना, गडकरींनी थेट त्यांच्याच भाषेत उत्तर देत, त्यांची हवेत उडणारी विमानं जमिनीवर आणली. कोलकात्त्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गडकरींनी सत्ताधारी कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवताना, कॉंग्रेसचा संबंध अत्यंत चलाखीनं थेट लादेनशी जोडूनही टाकला. कॉंग्रेसनं भ्रष्टाचाराच्या विरोधाची भाषणं करणं म्हणजे, पाकिस्ताननं दहशतवाद्यांशी लढाई करण्या-सारखंच आहे. लादेनला जसं पाकिस्तान्यांनी सांभाळलं होतं, पोसलं होतं, तसंच कॉंग्रेसनं भ्रष्टाचाराला पोसल्याचंही त्यांनी सांगून टाकलं. कॉंग्रेस पक्षात सोनिया गांधी हे हिटलर आहेत. हा मायलेकांचा म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा पक्ष आहे. पक्षातले बाकीचे सारे नेते नोकर आहेत, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्यामुळं गडकरींचा रथ आणखीनच उधळला. कॉंग्रेस पक्ष मुन्नीपेक्षाही बदनाम झाल्यानं, या पक्षाची आणखी काय बदनामी करायची? आणि कोण करणार? असा रोकडा सवालही त्यांनी केला. कार्यकर्त्यांचा मेळावा गाजला तो, गडकरींच्या या तुफान भाषणानं! बुधवारी झालेल्या या भाषणाचं वृत्त प्रसिध्द होताच कॉंग्रेसमधल्या सोनिया निष्ठांचा नक्कीच जळफळाट झाला असावा. दिग्विजय सिंह यांनीही हे भाषण नक्कीच वाचलं असावं. पण, गडकरींच्या या जहरी टिकेला उत्तर देणं म्हणजे, पुन्हा आपल्या अंगावर चिखल उडवून घेणं, असा अनुभव असल्यानंच, त्यांच्या नादाला लागणंच बरं, असं त्यांनी ठरवलेलं दिसतं. कॉंग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी गेले पंधरा दिवस जोशातच आहेत. रोज संध्याकाळी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर टिकास्त्र सोडतात. देशातल्या कुठल्याही घटनेमागं संघ आणि भाजपचाच हात असतोच, असं त्यांना वाटतं. आईसलॅंडमधला ज्वाला-मुखीचा स्फोट, त्या स्फोटामुळं आकाशात पसरलेल्या राखेनं युरोपातली हवाई वाहतूक विस्कळीत होणं, दोन महिन्यांपूर्वी जपानला बसलेला भूकंपाचा हादरा यासह जगातल्या घडामोडीही संघ आणि भाजपच घडवतो, असं सांगायलाही ते कमी करणार नाहीत. कारण, कॉंग्रेस पक्षाची तशी वैचारिक परंपरा आहेच. 1970 ते 1975 या काळात विरोधी पक्षांनी काढलेले मोर्चे, जयप्रकाश नारायण यांचं संपूर्ण क्रांतीचं आंदोलन यासह देशातल्या घटनांमागं अमेरिकेच्या सी. आय. . या गुप्तहेर संघटनांचाच हात असल्याचा सवंग आरोप इंदिरा गांधीसह कॉंग्रेसचे नेते सातत्यानं करीत असत. त्यामुळंच या वेळच्या पावसाळ्यात गंगा, यमुनेला आलेल्या महापुराचं खापरही द्विवेदींना संघावर सहज फोडता येईल. पण, संघ म्हणजे गडकरी नव्हेत आणि हजारेही नव्हेत. गडकरी संघाच्या मुशीतून घडले असले तरी, कॉंग्रेसच्याच भाषेत उत्तरं द्यायला ते घाबरत नाहीत. त्याच भाषेत ते एकदाच उत्तर देतात आणि मग राजकीय वादळ उठतं. ते पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या भाषणांनी पाच- सहा वेळा राजकीय वादळं उठली. बंगालमधलं त्यांचं हे मुन्नी आणि कॉंग्रेसचा संबंध जोडणारं भाषणही नक्कीच राजकीय वावटळ उठवणारच! पण, गडकरींना प्रत्युत्तर द्यायचं धाडस कॉंग्रेसच्या मुखंडात नसल्यानंच, जयंती नटराजन यांनी या भाषणाचा समाचार घेतला. गडकरींची ही भाषा अत्यंत अशोभनीय असल्याची टीका करुन त्या थांबल्या नाहीत. अशी भंपक वक्तव्य करणारा नेता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा झाला, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पक्ष हे सहन करणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. पण पक्ष म्हणजे नेमकं कोण? हे काही त्यांनी सांगितलेलं नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्यावर टीका करायची वाटच गडकरी पहात आहेत. कारण, आता त्यांनी भाषणात मुन्नी आणली, उद्या आणखी काय काय विशेषणं कॉंग्रेसला लावायसाठी त्यांना काही उदाहरणं कमी पडणारी नाहीत.
-
वासुदेव कुलकर्णी

 

No comments:

Post a Comment