Total Pageviews

Saturday 18 June 2011

mismanage ment govt hospitals

रुग्णालयांना ‘बेशिस्तीचा आजार’!
मराठवाड्यात डॉक्टरांची मनमानी, वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, मुख्यालयी न राहणे या मुख्य कारणांमुळे शासकीय रुग्णालये ओस पडली आहेत. बहुसंख्य रुग्णालये ही बिचार्‍या परिचारिका किंवा कम्पाऊंडरच्या उपस्थितीत चालतात ही वस्तुस्थिती आहे.
सर्वेपि सुखीन: संतु। सर्वे संतु निरामय:॥ असे वैदिक वचन आहे. सर्व जण सुखी व्हावेत, सर्वांना आरोग्य लाभावे असे आशीर्वादपर वचन आहे. अर्थात ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे मानवाचे आरोग्य सुदृढ असावे ही यामागची मुख्य भावना आहे. या भावनेला जागून देशात आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांची संकल्पना साकारली. सुरुवातीला छोट्या खोलीतील दवाखाना बघता बघता भल्यामोठ्या इमारतीच्या रूपाने उभा राहिला. डॉक्टरांचा राबता... रुग्णांचा करुणामयी स्वर... सलाईनचे स्टॅण्ड लावणार्‍या परिचारिकेची धांदल.. नातेवाईकांचे प्रश्‍नांकित चेहरे... आणि सर्वत्र दरवळणारा डेटॉलचा किंवा यासम लिक्विडचा दर्प असा अनुभव सर्वांनीच घेतला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या तुलनेत आज रुग्णालयांची संख्या वाढली आहे. एका मर्यादेपर्यंत रुग्णालयांना वाव होता. आज अशी स्थिती नाही. अर्थात लहानसहान दुखण्यांसाठी दवाखान्यात न जाता घरच्या घरी उपचार केले जायचे. गंभीर आजारावर उपचारासाठी रुग्णालयाचे दार ओलांडले जायचे. आज तर केसांपासून पायापर्यंत वेगवेगळ्या अवयवांवरील रोगांचे तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी सज्ज आहेत. अवघड शस्त्रक्रियाही लेसर तंत्रज्ञानाने सोपी झाली आहे. किचकट आजारावर जसा उपचार आहे त्या प्रमाणात मात्र रुग्णांना पैसा मोजावा लागत आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांनी करायचे काय? असा सवाल उठतो. गंभीर आजारावरील उपचारासाठी दानशूर व्यक्तींना आवाहनाशिवाय पर्याय नसतो हे वास्तव आहे.
व्यक्तीपरत्वे रुग्णांच्या आजाराचे स्वरूप वेगवेगळे असू शकते, असते. अशा रुग्णांना गावातच तत्काळ उपचाराची सोय व्हावी यादृष्टीने रुग्णालयाची निर्मिती झाली, परंतु सर्वांनाच उपचार मिळतात का? डॉक्टर दवाखान्यात असतात का? रुग्णालयात मूलभूत सुविधा आहेत काय? औषधपाणी मोफत मिळते काय? असे एक ना अनेक प्रश्‍न रुग्णालयाच्या संदर्भात उपस्थित होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा व सत्र रुग्णालये, फिरती रुग्णालये आज त्या त्या गावात उभी आहेत. प्रत्यक्षात ती आता अडगळीची तसेच गैरसोयीचीच बनल्याचे चित्र मराठवाड्यातील बहुसंख्य गावांमध्ये आहे. डॉक्टर आहेत, पण परिचारिका नाही. महागडी यंत्रे चालविण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. रुग्णांच्या वाहतुकीसाठीची ऍम्ब्युलन्स धूळ खात पडणे, औषधपाण्याचा अभाव असे अनेक अनुभव रुग्ण नातेवाईकांना घ्यावे लागत आहेत. विशेषत: गरोदर मातांना योग्य मार्गदर्शन व उपचाराची सोय शासनाच्या रुग्णालयात कागदोपत्री आहे. परिणामी गर्भवतींना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असून तेथील सिझरीनचा व औषधांचा खर्च मिळून 10 ते 15 हजारांवर पोहोचतो. यावरून विभागात गंभीर आजारावरील रुग्णांची काय दशा असेल हे कळून येते.
मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ची ओळख आहे. मात्र नियोजनाअभावी या रुग्णालयात गैरसोयी वाढल्या आहेत. आठवडाभरापूर्वी येथे डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. येथीलच नवजात शिशू अतिदक्षता विभागात 40 नवजात बालकांवर उपचारांची सोय असली तरी येथे काचेच्या पेट्यांची कमतरता आहे, तर डॉक्टरचाही वानवा आहे. याच रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी दोन मृतदेहांच्या अदलाबदलीचा गंभीर प्रकार घडला. काही महिन्यांपूर्वी येथून नवजात बालकास एका महिलेने पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घाटी रुग्णालयानंतर विभागातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय हे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयातही प्रचंड अनागोंदी कारभार सुरू झाला आहे. येथील बालरोग विभागातील इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या दोन जुळ्या बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. ही मे महिन्यातील घटना असून गरीबांच्या या रुग्णालयात महामोलाच्या एक्सरे, इन्व्हर्टर आदी सुविधांचाही अभाव आहे. यंत्रे आहेत, पण तज्ज्ञ चालक नाहीत असा सगळा प्रकार येथे आहे. याशिवाय इतरही विभागांत असंख्य गैरसोयी आहेत.
माजलगाव येथे दोन महिन्यांपूर्वी खासगी रुग्णालयात शीतपेटीमध्ये ठेवलेल्या नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात सध्या सोनोग्राफी केंद्रांचे प्रमाण वाढले आहे. त्याद्वारे स्त्रीभ्रूणहत्येचे पातक खुलेआम होत आहे. बीडसोबतच परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये सोनोग्राफी केंद्रे बोकाळली आहेत. याप्रकरणी नांदेड येथे धडक मोहीम राबवून प्रशासनाने डॉक्टरांवर फौजदारी खटले भरून बर्‍याच केंद्रांना सील ठोकले. तथापि अशी कारवाई अन्य जिल्ह्यात थंडपणे राबवली गेली.
कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या लातूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाला प्रचंड अवकळा आली आहे. अंबाजोगाईतील रुग्णालयाप्रमाणे या सर्वोपचार रुग्णालयातील अत्याधुनिक महागडी यंत्रे धूळ खात पडलेली आहेत. स्त्रीरोग, हृदयविकार आदी विभागांतून तज्ज्ञ डॉक्टर मंडळींची वानवा आहे.
अर्थात मराठवाड्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांचा हा धावता आढावा आहे. डॉक्टरांची मनमानी, वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, मुख्यालयी न राहणे या मुख्य कारणांमुळे शासकीय रुग्णालये ओस पडली आहेत. बहुसंख्य रुग्णालये ही बिचार्‍या परिचारिका किंवा कम्पाऊंडरच्या उपस्थितीत चालतात ही वस्तुस्थिती आहे. ऋतुजन्य साथरोगांचा फैलाव झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य बिघडते.
आरोग्य विभागात बोकाळलेली ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ फेम नीती रुग्णांच्या पथ्यावर पडली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जसे इतर प्रश्‍न गंभीर आहेत तसाच आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. म्हणून रुग्णालयामधील या गंभीर आजाराला आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधांचा डोस पाजून बेशिस्तपणा घालवण्याची गरज आहे.
- ओमकार सोनार

No comments:

Post a Comment