Total Pageviews

Wednesday, 1 June 2011

INCREASING CRIME IN MUMBAI

वाढती लुटमार
मुंबई शहरातील कोणतीही महिला आज आपल्या अंगावर दागिने घालून फिरू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. ज्या मुंबई पोलिसांची एकेकाळी जरब होती, दरारा होता तो पूर्णपणे मातीमोल झाला आहे. मुंबईचा ताबा आता यूपी, बिहार आदी परप्रांतातील नामचीन गुन्हेगारांनी घेतला आहे. या मुंबईवर आज चोर-लुटारूंचेच अधिक राज्य आहे, असे रोजच्या चैन स्नॅचिंग, घरफोड्या पाहता दिसून येत आहे. मुंबई शहरात पोलीस कमी आणि गुन्हेगार जास्त झाले आहेत. महिलेच्या अंगावर दागिने दिसले की हात घातला जातो आणि हिसका देऊन दागिने पळविले जातात. प्रसंगी महिलेवर प्राणघातक हल्लाही केला जातो. परंतु अशा कठीणप्रसंगी कुणीही पुढे येत नाही. तीच महिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. तिचे नशीब बलवत्तर असेल तरच चोराचा प्रयत्न फसतो. प्रतिकार करणार्‍या धाडसी महिला फारच कमी असतात. त्यामुळेच महिलांवर हात टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परंतु प्रतिबंधात्मक कारवाई मात्र काही नाही. कामाच्या व्यापाने थकलेले पोलीस काय प्रतिबंधात्मक बंदोबस्त करणार? मुळात पोलीस ठाण्यात पुरेसा पोलीस फौजफाटा नाही. पेट्रोलिंग करण्यासाठी एक-दोन बीटमार्शल असतात. ते चार-पाच किलोमीटरच्या पोलीस हद्दीत मोटारसायकलवरून काय गस्त घालणार? गणवेषधारी पोलीस ज्या दिशेला गस्त घालीत असतात त्याच्याविरुद्ध दिशेला महिलांना लुटले जाते. लूटमार करणार्‍यांना आता पूर्वीसारखे कुणीही अडवत नाही. उतारवयातील पोलीसही धडधाकट तरुण आरोपींचा पाठलाग करायला घाबरतात. आपला निष्कारण जीव जाईल म्हणून अलीकडे पब्लिकही बघ्याची भूमिका घेत आहे. बर्‍याच वेळेला भांडण सोडविणार्‍याचाच जीव जातो. तसेच चोराचा पाठलाग करणारेच जीवानिशी जातात, असा आजवरचा अनुभव आहे. लूटमार करताना कुणी पुढे येत नाही हे लक्षात आल्यामुळेच लुटारूंनी सर्व शहरी भागांत हैदोस घातला आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने दागिन्यांची सर्वत्र तुफान लूटमार सुरू आहे. बरं, एकदा तुमच्या घरातील, अंगावरील दागिने चोरीला गेले की ते परत मिळण्याची अपवाद वगळता सुतराम शक्यता नाही. एकदा दागिने गेले की ते आपण विसरून जायचे. बर्‍याच लोकांचा आपणास आपले चोरीला गेलेेले दागिने परत मिळतील, असा एक भाबडा विश्‍वास असतो. पोलीस तपास जोरात करीत आहेत असे त्यांना वाटत असतेे. काही पोलीस मन लावून, जोर लावून तपास करतातही. परंतु पकडलेले चोर काही सर्व गुन्ह्यांची पोलिसांना कबुली देत नाहीत आणि दिली तरी त्यांच्याकडून दागिन्यांची रिकव्हरी होत नाही. ज्या सोनाराला, मारवाड्याला दागिने विकले आहेत त्यांचे नाव आरोपी सांगत नाहीत. पोलीस आरोपीला अलीकडे ‘हात’ लावायला घाबरतात. चुकून ‘डेथ कस्टडी’ झाली तर त्या तपास अधिकार्‍याचे बाराच वाजतात. थेट जेल कस्टडी होते. त्यामुळे आरोपींकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी अलीकडे कुणीही पोलीस अधिकारी ‘थर्ड डिग्री’चा वापर करीत नाही. याचाच फायदा आज गुन्हेगारांनी घेतला आहे. त्यामुळेच आरोपी वारंवार लुटमार करतात. महिन्यातच जामिनावर बाहेर येतात आणि चैन स्नॅचिंग, घरफोडीचे गुन्हे पुन:पुन्हा सुरू करतात. आपल्या देशातील कायदेही आरोपींच्या बाजूचे आहेत. त्यामुळेही गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शहरी भागात रोज महिलांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांचे दागिने पळविले जातात आणि त्याची विक्री मारवाड्यांना केली जाते. परंतु ज्यांना चोरीचे दागिने विकले जातात, जे रिसिव्हर आहेत त्यांना मात्र हात लावला जात नाही याचे आश्‍चर्य वाटते. चोरीचा माल विकत घेणे हा गुन्हा आहे. आपण चोरांना बळ देत आहोत हे माहीत असतानाही जर चोरीचा माल विकत घेणार्‍या प्रवृत्तींवर कोणतीही कारवाई होत नसेल तर मग कशी काय लुटमार व चैन स्नॅचिंगचे प्रकार थांबणार? वास्तविक, चोरीचा माल विकत घेणारेच खरे गुन्हेगार आहेत. या ‘रिसिव्हर’ना जोपर्यंत ठोकणार नाहीत, त्यांची ‘वरात’ पोलीस काढणार नाहीत तोपर्यंत महिलांना लुटण्याचे, घर फोडण्याचे प्रकार थांबणार नाहीत. रिसिव्हरना अटक करून त्यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु याची कुणी गांभीर्याने दखल घेत नाही. आपल्याकडे आज फक्त ‘हायप्रोफाईल’ केसेस प्रामुख्याने सोडविल्या जातात. गरीब, मध्यमवर्गीयांचे दागिने लुटणार्‍या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुणी पोलीस अधिकारी झटताना दिसत नाहीत. मुंबईत रोज येणारे लोंढे, वाढत्या झोपड्या, अतिक्रमणे हीच मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या आज मुळावर येत आहेत. जोपर्यंत रस्त्यावरील बेकायदेशीर फेरीवाले, झोपड्या हटविल्या जाणार नाहीत, तोपर्यंत ‘करदात्या’ मुंबईकरांना स्वास्थ्य लाभणार नाही

No comments:

Post a Comment