Total Pageviews

Saturday 4 June 2011

BUILDER KING DOM

प्रत्येक शाहीला कोणीतरी व्यक्ती जन्माला घालत असतो. परंतु या बिल्डरशाहीला मात्र कॉंग्रेस पक्षानेच जन्म दिला असून त्याची सुरुवात अर्बन लॅण्ड सिलींग अधिनियमाने झाली. अतिरिक्त जमिनी शासकीय ताब्यात घेऊन त्याचा उपयोग सार्वजनिक कार्यासाठी करण्यासाठी आणल्या गेलेल्या या कायद्याचा कॉंग्रेस शासनाने अक्षरश: बट्ट्याबोळ केला. उद्योगपतींकडे असलेली अतिरिक्त जमीन शासनाने पूर्णपणे ताब्यात घेतली नाहीच. शिवाय १९८०च्या दशकापर्यंत शासन स्वत:च्या जमिनी सहकारी गृहनिर्माण सोसायटींना देत असे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात सहकारी गृहनिर्माण प्रकल्पाचे जाळे पसरले होते. त्यावेळी आजचे विकासक हे contractor होते. पण त्यानंतरच्या दशकांत शासनाने सहकारी गृहनिर्माण सोसायटींजना भूखंड देण्यास टाळाटाळ सुरू केली. तसेच विकासकांनी स्थापन केलेल्या सहकारी सोसायट्यांना भूखंड देण्यास सुरुवात करून या बिल्डरशाहीला जन्म दिला. विकासकांकडे पैशांचा ओघ सुरू झाला. त्यातून नवीन मोकळ्या जागा, ट्रस्टकडील जागा झपाट्याने विविध कराराच्या माध्यमातून या विकासकांनी आपल्या ताब्यात घेऊन स्वत:च्या जागेची बँक तयार केली. यातूनच या विकासकांनी राजकीय पुढार्‍यांना, महापालिकेतील अभियंते, अधिकारी यांना आपल्या छत्राखाली आणले. याच पैशातून लाचलुचपतीच्या अनेक नवीन वाटा/ तर्‍हा या विकासकांनी शोधून त्या अमलात आणल्या. निवासी हॉटेल्स, रुग्णालय, थंड हवेच्या ठिकाणी बंगले, मॉल, शिक्षण संस्था या विकासकांनी निर्माण केल्या. तसेच या सुखसोयींचा उपयोग राजकीय पुढारी, अभियंते, नोकरशहा, पोलीस अधिकारी यांना करू देऊन त्यांनाही वेळोवेळी आपल्या प्रभावाखाली आणले. या विकासकांनी सरळ माणसाला, लाचखोर, लाचखोराला पूर्ण लाचखोर, पूर्ण लाचखोराला जनावर बनविले आणि मूल्य, नीतिमत्ता या शब्दांना शब्दकोशातून हद्दपार केले.
यानंतर ही बाब राजकीय पुढार्‍यांच्या ध्यानात आली. या व्यवसायात असलेला अमाप पैसा राजकारण्यांनी पाहिला. पुढे या पैशाच्या मोहापायी सर्वपक्षीय राजकीय पुढारी या ना त्या मार्गाने विकासक बनले. पुढे सामान्यातल्या सामान्य माणसाचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक हितसंबंध हळूहळू मागे पडले. आर्थिक प्रगतीच्या नावाखाली नीतिमत्ता, मूल्य यांची होळी झाली. शेतमजूर, असंघटित कामगार, महिला, लहान बालक यांच्या संदर्भातील कल्याणकारी योजना शासनाला डोईजड वाटू लागल्या. शासकीय धोरण ठरविताना या उपरोक्त घटकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या प्रयत्नांना खो देण्यात आला. रुग्णालय, आरोग्य सेवा, शिक्षण या सर्वांसाठी उपरोक्त सामाजिक वर्ग शासनावर अवलंबून होता, पण शासनाने यातून हळूहळू काढता पाय घेतल्यामुळे या घटकांना शारीरिक व्याधींसाठी दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग बंद झाल्यातच जमा आहे. खाजगी विकासकांनी चौफेर तारांकित रुग्णालयांची साखळी सुरू करून जनतेला लुटण्याचा नवीन मार्ग सुरू केला.
या आर्थिक विकासाचा नारा सर्व जण वाजवीत असताना आर्थिक विकास म्हणजे राहण्यासाठी उंच उंच इमारती, मॉल, मल्टीप्लेक्स बांधणे असाच घेण्यात आला. परंतु या घरांचे दर मात्र कामगार, सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर वाढविण्याची तत्परता शासनानेरेडी रेकनर’मध्ये दरवर्षी दर वाढवून केली आहे. सामान्य माणसाचा नरडीचा घोट ही बिल्डरशाही घेत आहे. पण सामान्य माणसाच आक्रोश ऐकायला कोणाला वेळ आहे? आम्ही सारेआदर्श’वादी आहोत आणि काय? कॉंग्रेसने भ्रष्टाचार मोकाटपणे करून उभं समाजजीवनच उद्ध्वस्त केलंय.
- सद्गुरू कामत

No comments:

Post a Comment