जॉर्डन-सीरिया सीमेवर
अमेरिकी ठाण्यावर ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकी
सैनिकांचा मृत्यू-
संघर्ष व्याप्ती वाढणार
हमास आणि इस्रायल
यांच्यात गाझा पट्टीत उडालेल्या धुमश्चक्रीचे पडसाद संपूर्ण टापूमध्ये उमटतील, असा
अंदाज हा संघर्ष सुरू झाला त्या वेळीच व्यक्त करण्यात आला होता. या संघर्षामध्ये
इराण ओढला गेल्यानंतर त्याची व्याप्ती आणखी वाढणार होती. कारण इस्रायल आणि त्याचा
कट्टर पाठीराखा अमेरिका या दोन देशांना इराण अनुक्रमे शत्रू क्रमांक एक आणि दोन
मानतो. इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादच्या इराकमधील कार्यालयावर मध्यंतरी इराणने
थेट हल्ला केला होता. आता जॉर्डन-सीरिया सीमेवरील एका अमेरिकी ठाण्यावर झालेल्या
ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला असून, हा
हल्ला इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने घडवला अशी अमेरिकेची धारणा आहे.
गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमास-इस्रायल संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर या टापूत
प्रथमच अमेरिकी सैनिकांची प्राणहानी झाली आहे. या प्राणहानीचा मूळ संघर्षाशी थेट
नसला, तरी अप्रत्यक्ष संबंध आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्यास
प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. हे तसे स्वाभाविकच. बायडेन यांच्या
दृष्टीने हे वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीचे आहे. अध्यक्षीय निवडणूक या वर्षीच
होत आहे. शिवाय इराणबाबत ते म्हणावे तितके आक्रमक नाहीत, असा
प्रचार त्यांचे विरोधक करत आहेतच. अमेरिकेचे संभाव्य प्रत्युत्तर किती तीव्र असेल, यावर
पश्चिम आशियातील परिस्थिती कितपत चिघळणार हे ठरेल. एकीकडे इस्रायल आणि हमास
यांच्यातील शस्त्रविरामाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना, नव्याच
संघर्षाला तोंड फुटणे भारतासह अनेक देशांसाठी नवी डोकेदुखी ठरू शकते.
अमेरिकेच्या सैनिकांना थेट लक्ष्य करण्याची ही
पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इराकच्या पश्चिमेकडील अल असाद या हवाई तळावर
इराण-समर्थित गटांनी केलेल्या अग्निबाण हल्ल्यामध्ये काही सैनिक जखमी झाले होते.
इराण समर्थक किंवा इराणने गेल्या काही काळात सीरिया, इराक, पाकिस्तान, लाल
समुद्र अशा भागांत हल्ले केले आहेत. इस्रायलच्या भूमीवर थेट हल्ला केलेला नाही, मात्र
तसे झाल्यास त्यातून उद्भवणारा युद्धजन्य आगडोंब अकल्पित विध्वंसक ठरू शकतो. आता
ताज्या हल्ल्यामध्ये अमेरिकी सैनिक मारले गेल्यामुळे अमेरिकेचा प्रतिहल्ला व्यापक
आणि तीव्र असू शकतो. अतिरेकी संघटना पदरी बाळगून त्यांच्यामार्फत इस्रायल, अमेरिकेच्या
आणि कधी अरब देशांच्या कुरापती काढण्याचा इराणचा उद्याोग आगीशी खेळण्यासारखा
होताच. त्याच वेळी दुसरीकडे,
इस्रायली वसाहती पश्चिम किनारपट्टी आणि
गाझामध्ये अवैधरीत्या विस्तारण्याचा बेन्यामिन नेतान्याहूंचा उद्याोगही कमी
आक्षेपार्ह नव्हता. तितकेच आक्षेपार्ह ठरले, या अवैध विस्तारवादाकडे कधी
दुर्लक्ष करण्याचे किंवा डोनाल्ड ट्रम्प अमदानीत त्याचे समर्थन करण्याचे अमेरिकेचे
धोरण. या सगळ्यांच्या संघर्षवादी धोरण आणि स्वभावाचा फटका मोठ्या प्रमाणात
बाह्यजगताला बसत आहे. कारण जगातील खनिज तेलाची जवळपास ७० टक्के वाहतूक आणि युरोप
ते आशिया अशी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक या टापूतून होते. या तेल आणि
मालवाहतुकीला हुथी बंडखोरांनी लक्ष्य केले आहे आणि त्यांना इराणचे समर्थन आहे.
खुद्द इराणमध्ये इतर देशांशी सातत्याने संघर्ष करत राहण्याची क्षमता नाही. आर्थिक
निर्बंध आणि अंतर्गत राजकीय असंतोषामुळे हा देश जर्जर झाला आहे. परंतु तेथील
धर्मसत्तेची
युद्ध खुमखुमी जिरलेली नाही. इस्रायल-हमास
संघर्ष सुरू झाल्यापासून अमेरिकेने दोन उद्दिष्टे निर्धारित केली होती.
इस्रायलच्या सोयीने आणि इच्छेनुसार संघर्ष थांबवणे आणि त्याची व्याप्ती मर्यादित
ठेवणे. दोन्ही उद्दिष्टे सफल होऊ शकलेली नाहीत. इस्रायल आता शस्त्रविरामाच्या
सशर्त शक्यता वर्तवू लागला असला,
तरी तोपर्यंत २६ हजार पॅलेस्टिनींना प्राण
गमवावे लागले. आता तर इस्रायलपेक्षा अमेरिकेलाच इराण आणि समर्थित संघटना लक्ष्य
करू लागल्या आहेत. या दुहेरी अपयशाचे दूरगामी परिणाम संभवतात. अमेरिकेने इराणवर
किंवा इतरत्र इराण समर्थित संघटनांवर बेबंद हल्ले सुरू केल्यास मोठी जीवितहानी
संभवते. यातून आखातातील अमेरिकेची मित्र असलेली अरब राष्ट्रे दुखावली आणि दुरावली
जाऊ शकतात. पण प्रत्युत्तर दिले नाही, तर अध्यक्ष बायडेन अडचणीत येऊ
शकतात. ताजी घटना ही त्यामुळेच अमेरिकी संयमाची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरते.
No comments:
Post a Comment