Total Pageviews

Tuesday, 2 January 2024

चीनची सागरी दादागिरी-चीनी शत्रु आपले मित्र त्यांना मदत करण्याची भारताला ...

चीनची सागरी दादागिरी-हेमंत महाजन, ब्रिगेडियर 
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीत तैवानच्या एकीकरणाविषयीची महत्त्वाकांक्षा स्पष्ट करणार्‍या चीनने अलीकडेच तटरक्षकांच्या जहाजांनी लागोपाठ दुसर्‍या दिवशी फिलिपाईन्सच्या जहाजांवर पाण्याच्या तोफांनी हल्ला केला. फिलिपाईन्सच्या नौका आणि एस्कॉर्ट जहाज दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त शोलजवळ सैन्याला अन्न पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असताना, हा सामना झाला.

गेल्या काही महिन्यांत चीनच्या अर्थव्यवस्थेविषयी नकारात्मक बातम्या सातत्याने समोर येत असल्या, तरी दुसर्‍या बाजूला चीनचा आक्रमकतावाद वाढत चालल्याचेही दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वादग्रस्त बेटावर स्थित फिलिपाईन्सच्या नागरिकांना आणि त्या बेटाला चिनी जहाजांनी वेढा दिलेला आहे. त्यांना अन्नधान्य पोहोचविण्याचा प्रयत्न फिलिपाईन्सकडून सुरूच असतो. चिनी तटरक्षकांनी दक्षिण चीन समुद्रात तीन फिलिपाईन्स जहाजांवर जलतोफांनी हल्ला केला. त्यापैकी एकाला धडक दिली, ज्यामुळे इंजिनचे गंभीर नुकसान झाले. फिलिपाईन नौका आणि फिलिपाईन कोस्ट गार्ड फिलिपिनो सैन्याला अन्न आणि अन्य पुरवठा करण्यासाठी जात होत्या. चिनी कोस्ट गार्ड जहाजांनी एक लांब पल्ल्याच्या ध्वनिक यंत्राचा वापर केला. या यंत्रामुळे श्रवणशक्ती बिघडते, सैनिकांच्या कानाचे पडदे फाटतात. फिलिपिनो क्रूला गंभीर दुखापती होऊन त्यांची लढण्याची क्षमता कमी होते व ते सदैव घाबरतात. यावर्षी समुद्रातील चकमकींत चिनी तटरक्षक जहाजांनी लष्करी दर्जाच्या लेसरचा वापर केला असून यामुळे फिलिपिनो क्रूमॅनला तात्पुरते अंधत्व आले आणि धोकादायक ब्लॉकिंगमुळे जहाजांनी टक्कर मारल्यामुळे जहाजांचे नुकसान झाले.

‘युनायटेड नेशन्स कन्व्हेंशन ऑन लॉज ऑफ सी’मध्ये समुद्रकिनार्‍यापासून 12 किलोमीटरपर्यंत असलेल्या समुद्राला त्या देशाची टेरिटोरियल हद्द समजली जाते. त्यामध्ये त्या देशाचे कायदे लागू असतात. मात्र, इतर सगळ्या समुद्रांमध्ये जगातल्या जहाजांना हालचाल करायची परवानगी असते. मात्र, चीन त्या समुद्रामध्ये आपला हक्क गाजवण्यासाठी सतत आक्रमक कारवाया करत असतो. वास्तविक, अन्य देश या दाव्याला मान्यता देत नाहीत. सागरी मिलिशिया ज्याला फिशिंग मिलिशिया असेही म्हणतात, हे चिनी सागरी सैन्यांपैकी एक आहे, जे चायना कोस्ट गार्ड आणि पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचे साहायक म्हणून काम करतात.

सागरी ऑपरेशन्समध्ये त्यांचा वापर केला जातो. दक्षिण चीन समुद्रातील अनेक आक्रमक घटनांमागे सागरी मिलिशियाचा हात आहे. या जहाजातून विमानांच्या कॉकपिटस्वर उच्च शक्तीचे लेझर निर्देशित केले गेले होते. यात रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही हेलिकॉप्टरवर हल्ला समाविष्ट आहे. दक्षिण चीन समुद्रात दररोज शंभरहून अधिक मिलिशिया जहाजे कार्यरत आहेत. 2022 मध्ये जहाजांची संख्या शिगेला पोहोचली, जेव्हा दक्षिण चीन समुद्रात सुमारे 400 मिलिशिया जहाजे तैनात केली होती. मिलिशिया जहाजांची हालचाल आणि वर्तन वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण राहिले आहे. चीनच्या मिलिशियामध्ये सागरी मिलिशिया फिशिंग व्हेसल्स तसेच स्प्रेटली बॅकबोन फिशिंग व्हेसल्स नावाच्या मासेमारी नौकांचे मिशन असते. बहुतेक नौका 45 ते 65 मीटर लांबीच्या असतात. सागरी मिलिशिया चीनच्या 10 बंदरांवरून कार्यरत आहे. सागरी मिलिशियाने भाड्याने घेतलेली मासेमारी जहाजे आणि तयार केलेली जहाजे या दोन्हींचा वापर त्याच्या कार्यात केला आहे.

सागरी मिलिशिया पीआरसीच्या सशस्त्र दलाचा भाग असला, तरी 2018 मध्ये ते नि:शस्त्र होते. मिलिशियाद्वारे वापरली जाणारी हिंसा ही मुख्यतः धोकादायक हालचाली आणि प्रसंगी टक्कर मारणे यापुरती मर्यादित होती. आता मिलिशिया जहाजे मोठ्या पाण्याच्या तोफांनी सुसज्ज असू शकतात, तर काहींना लहान शस्त्रेदेखील दिली जातात. काही सागरी मिलिशिया युनिटस् नौदलाच्या माईन्स आणि विमानविरोधी शस्त्रांनी सुसज्ज आहेत. सागरी मिलिशियाच्या मुख्य तुकड्यादेखील असून त्या मिलिशियाच्या कामासाठी सज्ज असतात. या जहाजांची रॅमिंगसाठी तयारी असते. सागरी मिलिशिया पश्चिम पॅसिफिकच्या भागात इतर देशांच्या क्षेत्रात घुसण्याच्या मोहिमांमध्ये भाग घेते. चिनी पारंपरिक नौदल, मासेमारी जहाजांचा वापर करून लष्करी संघर्ष टाळून, त्याचे सागरी दाव्यांचे रक्षण करीत आहे. चिनी कोस्ट गार्ड जहाजांवर पाणबुडी, तोफखाना किंवा इतर शस्त्रास्त्रांनी हल्ला करू शकते. होणार्‍या नुकसानीमध्ये चिनी कोस्ट गार्ड इतर देशांच्या जहाजांचे इंजिन, दिवे किंवा इतर उपकरणे खराब करते.

चिनी कोस्ट गार्डच्या आक्रमक कारवाया फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, जपान आणि थायलंड यांच्या विरुद्ध केल्या जातात. या देशांचेही दक्षिण चीन समुद्रात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन्स किंवा विशेष सागरी आर्थिक परिक्षेत्र आहेत. अमेरिकेच्या जहाजांनाही चिनी कोस्ट गार्डने अनेक वेळा अडवले आहे. चीनच्या या आक्रमक कारवायांमुळे दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी आणि चीनच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अन्य देशांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय समुदायाला या कारवायांबद्दल जागरूक केले पाहिजे. चीनच्या आक्रमक कारवायांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध नोंदवला गेला पाहिजे. चीनला दक्षिण चीन समुद्रातून मागे हटण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणणे अत्यंत गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment