Total Pageviews

Wednesday, 28 December 2016

बर्लिन घटनेचा अन्वयार्थ- tarun bharat


December 22, 2016047 अग्रलेख गेल्या नोव्हेंबर महिन्यातल्या, फ्रान्समधील ‘त्या’ थरारक दहशतवादी हल्ल्याला बरोबर एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल न असेल तोच, दहशतवाद्यांनी आपला मोर्चा जर्मनीकडे वळविलेला दिसतो आहे. बर्लिनच्या, माणसांनी गजबजलेल्या अशा ख्रिसमस मार्केटमध्ये अचानक एक अज्ञात ट्रकचालक भरधाव वेगात आपले वाहन घेऊन येतो. कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या गर्दीतील लोकांना बेमुर्वतखोरपणे चिरडत पुढे जातो. या प्रकारामुळे गर्दीत माजलेली अफरातफर. सर्वांची धावाधाव. बारा जणांचा जागीच मृत्यू. शेकडो जखमी. हृदयाचा थरकाप उडविणारे ते दृश्य. रस्त्यावर सर्वदूर रक्ताच्या चिरकांड्या उडालेल्या. क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रेतांचा खच… काळीज पिळवटून टाकणार्‍या किंकाळ्या… सारा समूह ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत आनंदमग्न असताना एका बेसावध क्षणी लोकांच्या आनंदावर विरजण घालत दहशत माजविण्याचा प्रयत्न होतो. ९/११ पासून तर २६/११ पर्यंत आणि पॅरिसपासून तर बर्लिनपर्यंत सर्वदूर दहशतवादाचा अर्थ एकच… रक्तपात. आणि त्यांचा उद्देशही एकच… मानवतेला काळिमा फासण्याचा. लष्कर- ए-तोयबा पासून तर अल् कायदापर्यंत, ज्या पद्धतीने गेली काही वर्षे दहशतवादी संघटनांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार होतो आहे, तो बघितल्यानंतर त्यांच्या अस्तित्वामागील उद्दिष्टं आता धर्माच्या पलीकडे विस्तारली असल्याची बाब स्पष्ट होते. कुण्या एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेत बंदिस्त करण्याइतक्या त्यांच्या कारवाया आता मर्यादित राहिलेल्या नाहीत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर कधीकाळी जन्माला आलेला अन् नंतरच्या काळात वाट्टेल तसा फोफावलेला अल कायदा नामक संघटनेचा विस्तार ज्या पद्धतीने अमेरिकेत दहशतवादी कृत्ये घडविण्यापर्यंत वाढला, तो बघितल्यानंतर जगातील तमाम दहशतवादी संघटनांची कामाची रीत एव्हाना ‘ग्लोबल’ झाली असल्याची वस्तुस्थिती लपून राहात नाही. जगभरात विखुरलेल्या झाडून सार्‍या दहशतवादी संघटना आपापल्या ठिकाणी एकाच पद्धतीने, एकाच उद्देशाने, ‘जग हादरवून सोडण्याच्या’ एकाच इराद्याने आपल्या कारवाया घडवतात, तेव्हा त्यांच्या इराद्यांमगील उद्दिष्टं, त्यांच्या षडयंत्रांमागील डोकी, त्यांना आकार देणारे हात आणि त्याच्या पाठीशी उभी राहिलेली धनशक्ती यांच्या तारा आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी जुळलेल्या असण्याची शक्यताही आपसूकच अधोरेखित होते. मुंबईत ताज हॉटेल ताब्यात घेऊन बेधुंद गोळीबार करण्याचा प्रकार असो की मग थेट विमाने हायजॅक करून न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेण्टरच्या इमारती जमीनदोस्त करण्याची थरारक घटना. फ्रान्सच्या सेण्ट डेनिस शहरात एका संपूर्ण फुटबॉल टीमला वेठीस धरत बेछूट गोळीबार करत माणसं टिपत निघण्याची असो की मग परवाची बर्लीनमधली, थेट गर्दीत ट्रक घुसवून बेदरकारपणे माणसं मारण्याची तर्‍हा… रक्तपात आणि दहशतीच्या मार्गाने समाजातल्या सर्वसामान्य माणसांच्या कत्तली करीत आपले ईप्सित साध्य करायला निघालेली ही मंडळी, नेमका कोणासाठी हा दहशतवाद उराशी धरून बसली आहेत? परवा बर्लीनमध्ये त्यांनी चिरडलेली निर्दोष माणसं वा मग ९/११च्या घटनेत मृत्युमुखी पडलेले शेकडो निरपराध लोक… ज्यांचा जराही कसूर नाही, ज्यांचा यांच्या कुठल्याही कृत्याशी संबंध नाही, ज्यांनी यांचे कधीच कुठलेच नुकसान केले नाही, जे कधीच यांच्या उद्दिष्टांच्या आड आले नाहीत, अशा बेकसूर लोकांच्या सांडलेल्या रक्तातून कसे साध्य व्हावे दहशतवाद्यांचे स्वप्न? आशियापासून तर युरोपापर्यंत सर्वदूर केवळ माणसं मारण्याचा धंदा करणारे दहशतवादी, ज्यांना धड लोकांसमोर उजळ माथ्याने समोरही येता येत नाही, प्रत्येकच देशाच्या सरकारी यंत्रणेपासून तोंड लपवत जीवन जगावे लागते, ती माणसं बंदुकीच्या जोरावर, आधुनिक शस्त्रांच्या बळावर स्वत:चे राज्य निर्माण करू इच्छितात! त्यासाठी देश बेचिराख करण्यात ज्यांना काही वाटत नाही, जिवंत माणसं मारताना ज्यांचे हृदय द्रवत नाही, आपण मारलेल्या माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त होताना बघून जे जराही अस्वस्थ होत नाहीत… त्या दहशतवाद्यांना आणि त्यांनी जोपासलेल्या दहशतवादाला चिरडण्याचीच योजना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होण्याची गरज निर्माण झाली आहे. नव्हे, बर्लिनच्या परवाच्या घटनेने ही गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मार्केल यांनी, ही घटना म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यांचे विधान आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभ्यतेला शोभून दिसणारे असले, त्यातून ध्वनित होणारे संकेत त्या देशाच्या भविष्यातील भूमिकेशी सांगड घालणारे असले तरी तिथल्या सामान्य माणसाच्या मनातल्या भावना मात्र, हे कृत्य करणार्‍यांना कुठलीही दयामाया न दाखवता चिरडून टाकण्याचीच आवश्यकता प्रतिपादित करते. तशीही दहशतवाद्यांना माणुसकीची भाषा कळत नाही. भारताने कसाबसाठी अनुसरलेल्या न्यायालयीन प्रक्रियेने जगभरातील दहशतवादी संघटना ताळ्यावर आल्याचेही चित्र नाही. उलट ओसामाला ओबामांनी ज्या पद्धतीने ठेचला, ती तर्‍हा बघितल्यानंतर मात्र त्या देशाकडे नजर वाकडी करण्याची अद्याप तरी कुण्या दहशतवादी संघटनेची हिंमत झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. दहशतवादाशी ‘याच पद्धतीने’ लढण्याची आवश्यकता बर्लीन येथील परवाच्या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. शिवाय अमेरिकेसह जगातील कुठलाच देश अतिरेक्यांच्या कचाट्यातून सुटलेला नसल्याची बाबही यानिमित्ताने नव्याने स्पष्ट झाली आहे. अगदी ज्यांनी दहशतवाद अंगाखांद्यावर खेळवला, जोपासला ते देशही यातून सुटलेले नाहीत. त्यामुळे दहशतवाद ही काही कुठल्याशा एखाद्या देशाची, त्याने एकट्याने सोडवावी अशी समस्या आता राहिलेली नाही. त्याचे स्वरूप जर जागतिक झाले असेल, तर मग त्याच्याशी लढाही जागतिक पातळीवरूनच द्यावा लागणार आहे. भारताविरुद्ध चालल्यात म्हणून पाकिस्तानी कुरघोड्यांनी अमेरिकेला गुदगुल्या होण्याचे दिवस केव्हाच सरलेत. ९/११ ची घटना घडल्यावर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढा उभारायचा अन् त्याविरुद्ध पेटून उठण्यासाठी जर्मनीत बर्लीनची घटना घडावी लागावी… असे आता चालणार नाही. संपूर्ण जगाने एकत्र येऊन आवाज उठवला, पावलं टाकली तरच, अन्यथा परवा फ्रान्स झाला, काल जर्मनी, उद्या जगाच्या नकाशावरचा अजून कुठला तरी देश… त्यांच्या कारवाया कधीच सरणार नाहीत. तो जर मुळासकट निखंदून काढायचा तर संपूर्ण जगाने एकत्र येऊन त्याविरुद्ध लढणे एवढा एकच उपाय उरतो. हा धडा हाच बर्लीनच्या परवाच्या घटनेचा अन्वयार्थ आहे

No comments:

Post a Comment