December 9, 2016041
Share on Facebook Tweet on Twitter
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यास आता बरोबर एक महिना झाला आहे. एका महिन्यात या निर्णयाने देशातील सर्वांच्या भूमिकांची जणू परीक्षा घेतली आहे. या देशातील जनतेची नाडी ओळखल्याचा दावा करत काम करणारे देशातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांची तर या निर्णयाने चांगलीच परीक्षा होऊन त्यांच्या मर्यादाच जणू उघड झाल्या आहेत. जनतेच्या मनातल्या भावनेपासून ही मंडळी किती दूर आहेत हे अगदी तीव्रतेने पुढे आले आहे. नोटाबंदीनंतर त्या क्षणापासून रोज प्रसारमाध्यमे या निर्णयाचे फायदे सांगण्याऐवजी देशात जणू अराजकच माजले असल्यासारखे चित्र जनतेसमोर उभे करत जनतेला अराजक निर्माण करण्यासाठी चिथावणी देत असल्यासारखे प्रयत्न करत होते. रांगाच दाखवायच्या, जनतेचा कैवार घेत असल्याचा आव आणत जनतेला प्रश्न विचारून नकारात्मक चित्र उभे करता येते काय याचा प्रयत्न केला जात होता. अनेकदा तर रांगेत उभे असलेले नागरिक म्हणायचे की, ‘पंतप्रधानांनी देशाच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्हाला त्रास होतो आहे. मात्र, आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत.’ मात्र, या शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करत मुलाखत घेणारा दर्शकांना उद्देशून म्हणायचा की, ‘एकूण काय तर मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने लोक परेशान आहेत आणि लोकांमध्ये असंतोष आहे.’ काही लोकांनी सोशल मीडियाचा उपयोग करून अफवा पसरविण्याचाही प्रयत्न केला. नोटांपासून ते सोन्यापर्यंत नाना कंड्या पिकवण्यात आल्या. मात्र, या देशातील सामान्य जनतेने आपला सुज्ञपणा दर्शवत ना माध्यमांच्या चिथावणीला बळी पडले ना अशा अफवांवर विश्वास ठेवला. देशातील सामान्य जनतेला अडचण आली नाही असे नाही. जवळ जवळ प्रत्येकजण अडचणीत आला. खात्यात असलेले स्वत:चे पैसे काढण्यात अडचण निर्माण झाली. पैशाअभावी अनेक समस्या आल्या. मात्र, लोकांनी तरीही हे सगळे त्रास सहन केले आणि देशाचे अंतिम हित असल्याने ‘एकदाचे सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या’ अशा अविर्भावात लोकांनी या निर्णयाच्या मागे आपले पाठबळ उभे केले. देशातील सामान्य जनतेच्या मनाचे एक स्पंदन सतत देशाच्या हितासाठी होत असते. बिकट प्रसंगी जनतेची ही भावना उफाळून येते. त्याचे प्रत्यंतर या महिनाभरात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची ही भावना बरोबर ओळखून भारतीय जनतेला सलाम केला आहे. भ्रष्टाचार आणि दहशतवाद तसेच काळा पैसा याच्या विरोधात जनतेने या यज्ञात मनापासून जो पाठिंबा दिला त्याबद्दल मोदी यांनी जनतेला सलाम केला आहे. जनतेचे आभार मानताना पंतप्रधानांनी एक पंचसूत्री मांडली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने व्यापारी, श्रमिक या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वर्गाचा फायदा होईल असे त्यांनी म्हटले आहे. अनेकांनी आपापल्या नेहमीच्या किराणा दुकानदाराकडे नोटाबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया मागितली तेव्हा दुकानदारांनी लोकांना या निर्णयाच्या बाजूनेच मत नोंदविले आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे जनतेची थोडी गैरसोय होणार हे मला ज्ञात आहे. मात्र, या निर्णयाचा दीर्घकाळ मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील समृद्धी आणि संपन्नता यावर भ्रष्टाचारामुळे ग्रहण लागले होते. काळ्या पैशामुळे अंधार दाटत चालला होता. पंतप्रधान म्हणतात की, आता समृद्धी आणि संपन्नता यात काही आडकाठी येणार नाही. पंतप्रधानांनी या नोटाबंदीला ऐतिहासिक प्रसंग असे म्हटले आहे. या निमित्ताने देशात अधिकाधिक कॅशलेस व्यवहार करावेत आणि त्यासाठी नवनवीन तंत्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी काळा पैसावाल्यांचा या निमित्ताने पराभव करा आणि गरीब, नवमध्यमवर्ग, मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करा असे म्हटले आहे. यामुळे भावी पिढीचे फायदे होतील असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. वास्तविक देशात अनेक लोक कॅशलेस सोसायटीचे, कॅशलेस व्यवहारांचा आग्रह अनेक दिवसांपासून धरत होते. मात्र, अशा व्यवहारात आपल्याकडील कर न भरता लपवून ठेवलेला काळा पैसा अधिकृत नोंदला जाईल आणि त्यावर कर बसेल या भीतीने मंडळी असे कॅशलेस व्यवहार करतच नव्हती. नोटाबंदीमुळे देशातील काळ्या पैशाबरोबरच दहशतवादी, सीमापार दहशतवादी कारवाया, नक्षलवादी यांनाही दणका बसला आहे. एकतर ते अस्वस्थ होऊन आत्मसमर्पण करू लागले आहेत नाहीतर बेचैन होऊन बँका लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला फायदा आहे याची परीक्षा पाहण्यासाठी या दोन तीन गोष्टीच पुरेेशा आहेत. मात्र, देशात काहीही घडले तरी त्याचे राजकीय अर्थच काढायचे आणि राजकारणच करायचे असा चंग काही माध्यमांनी आणि राजकीय पक्षांनी बांधला आहे. विशेषत: नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांना मिळणारे समर्थन यावर जळफळाट होणार्या विरोधी पक्षातील आणि मित्र पक्षातील लोकांनी मोदी जे जे करतील आणि जे जे बोलतील त्याचे विपर्यस्त अर्थ काढून त्यांच्यावर टीका करत राहायचे असे जणू ठरवूनच टाकले आहे. त्यांचे हे विरोधाचे सोंंग लबाड लांडग्याचे आहे हे आता जनतेला कळू लागण्याइतपत या विरोधाचा अतिरेक झाला आहे. नोटाबंदीमुळे ज्यांना त्रास होतो आहे ती जनता आपली नापसंती व्यक्त करते. मात्र, या जनतेचा पाठिंबा या विरोधासाठी विरोध करणार्या विरोधी पक्षांना आणि नाकाने कांदे सोलणार्या मित्र पक्षांना नाही. देशाच्या संसदेत देशातील या महत्त्वाच्या ऐतिहासिक वळणावर चर्चा होऊन साधकबाधक विचार होण्याऐवजी गोंधळास्त्र वापरत विरोधी पक्ष चर्चाच नाकारत आहेत. फक्त आरोप करायचे आणि सरकारला त्यावर उत्तर देऊच द्यायचे नाही, अशी व्यूहरचना करून जनतेचा दिशाभ्रम करण्याचा डाव यामागे असला तरी जनता या गोंधळाचा अर्थही आता चांगला समजू लागली आहे. आता तर राष्ट्रपतींनीही संसदेत गोंधळ न करता जनतेच्या हिताची चर्चा करण्याचे कळकळीचे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. एक महिन्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचे समर्थन करणार्या, नोटाबंदीचा त्रास सहन करणार्या, अफवांवर विश्वास न ठेवणार्या, त्रास सहन करूनही या निर्णयाबाबत नकारात्मक मते व्यक्त न करणार्या, देशाचे अंतिम हित साधण्यासाठी आज त्रास सहन करणार्या, विरोधी पक्षांकडून दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देणार्या, माध्यमांच्या मायावी डावांना न भुलणार्या, काळा पैसा आणि भ्रष्टाचार या विरोधातील लढाईत पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहाणार्या, या सर्व प्रक्रियेत त्रास, शिव्या सहन करून दबावाखाली चांगले काम करणार्या बँक कर्मचार्यांसारख्या लोकांना सलाम केला आहे. तो सलाम सर्वांनी समजून स्वीकारला पाहिजे!
No comments:
Post a Comment