November 25, 2016052
Share on Facebook Tweet on Twitter
इस्लामिक दहशतवादाचा मसीहा बनलेल्या डॉ. झकीर नाईकची सरकारच्या तपास यंत्रणांनी चांगलीच नाकेबंदी सुरू केली आहे. या झकीर नाईकची आणि त्याच्या संबंधित संस्थांची बँकखाती गोठवण्यास सांगण्यात आले आहे. या नाईकशी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एकेकाळी या देशात इस्लामिक पंथाचा विचारवंत म्हणून मिरवणारा हा डॉक्टर झकीर नाईक आता दहशतवाद्यांचा पाठीराखा म्हणून, एक गुन्हेगार या स्वरूपात देशातील पोलिस यंत्रणेला हवा आहे. तो परदेशात गेलेला असून भारतात आलो की अटक होईल, या भीतीने भारतात येण्यालाच तयार नाही. मोठ्या फुशारक्या मारत मानवतेच्या गप्पा मारणारा हा माणूस, त्याआड मानवतेच्या विरोधात क्रूर आणि निर्दयी जिहादी दहशतवादाचा मसीहा बनून देशातील तरुणांना दहशतवादी बनविण्यासाठी चिथावणी देत फिरत होता. ढाक्यातील एका दहशतवादी हल्ल्यातील आरोपीने आपण दहशतवादाकडे डॉ. झकीर नाईकची भाषणे ऐकून वळलो, हे विधान केले आणि झकीर नाईकचे बिंग फुटले. या आधी तो कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहसारख्या नेत्यांसोबत एका व्यासपीठावर येऊन एकात्मतेच्या, मानवतेच्या गप्पा मारत लोकांची दिशाभूल करत होता. गठ्ठा मतांसाठी जिहादी दहशतवादाचे लांगूलचालन करणारे देशातील तथाकथित सेक्युलर आणि प्रत्यक्षात मल्टीकम्युनल असलेले नेते या डॉ. झकीर नाईकसोबत एका व्यासपीठावर जात, त्याला शांतिदूत असे म्हणत, झकीर नाईकची तोंड फाटेपर्यंत स्तुती करण्यात मशगूल होते. ढाक्यातील हल्ल्यातील आरोपीने जेव्हा डॉ. झकीर नाईक याच्या भाषणाचा उल्लेख केला, तेव्हा भारतातील तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. इस्लामिक रिसर्च सेंटर या नावामागे चाललेली दहशतवादी कारस्थाने काय आहेत, याची तपासणी सुरू झाली. काही कारणाने परदेशात गेलेला झकीर नाईक हे सगळे समजल्यानंतर भारतात आलाच नाही. झकीर नाईकसारख्या कोणीही उठावे आणि अल्पसंख्यक असल्याचे भांडवल करत इस्लामिक रिसर्च वगैरे नाव घेऊन संस्था उघडाव्यात. या संस्थांना परदेशातून भरमसाट देणग्या दिल्या, तरी त्याकडे लक्ष द्यायचे नाही. जाब विचारायचा नाही. अशा अल्पसंख्यक संस्था प्रचंड निधी जमा करून त्यांचा विनियोग कसा करतात, त्यामधून देशाच्या विरोधात काही कारवाया चालतात काय? याची चौकशीसुद्धा केली जात नाही. अशा प्रकारच्या भोंगळ धोरणांमधूनच डॉ. झकीर नाईकसारखे कोडगे लोक वाटेल ते करत नंगानाच घालतात. झकीर नाईक याच्या संस्थांमधून रिसर्च करण्यापेक्षा दहतशवादी बनविण्यासाठी तरुणांचा सर्च केला जात होता, हे आता उघड झाले आहे. जगात मानवतेला लाजवेल, अशा प्रकारे हिंसाचार करत पंथवेडेपणाचा नंगानाच घालत असलेल्या आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या एका दहशतवाद्याला या डॉ. नाईकच्या रिसर्च सेंेटरने ८० हजार रुपयांची मदत केल्याचे उघड झाले आहे. स्कॉलरशिप या नावाखाली ही मदत देत या नाईकने, सगळ्या शिक्षण यंत्रणेला आणि गुणवत्ता धारण करणार्या विद्यार्थ्यांनाच शरमेने मान खाली घालण्याची वेळ आणली आहे. डॉ. झकीर नाईक याचे बिंग दहशतवाद्यांनीच फोडल्यानंतर झकीर नाईकची चौकशी सुरू झाली. त्या वेळी तो परदेशात होता. भारतात आलो तर आपल्याला अटक होईल, या भीतीने हा भ्याड माणूस भारतात आलाच नाही. इस्लामिक रिसर्च सेंटरच्या नावाखाली द्वेषाचे विष पसरविणारा डॉ. झकीर नाईक याला मुस्लिम समाजातूनही आता विरोध सुरू झाला आहे. स्वत:चे संशोधन म्हणून डॉ. झकीर नाईक जी भाषणे देत हिंडत होता, ते सगळे वाङ्मयचौर्य होते, असे आता उघड झाले आहे. अनेकांनी इंटरनेटवर जाकीर नाईकची चोरी उघड केली आहे. तत्त्वाच्या लंब्याचौड्या गप्पा मारणारा हा माणूस, परप्रकाशित होता आणि विचारांशी प्रामाणिकही नव्हता, हे आता उघड झाले आहे. दहशतवादाला सरळ सरळ चिथावणी द्यायची, असले उद्योग डॉ. झकीर नाईक याने उघडपणे केले. झकीर नाईक भारतात आल्यावर अटक होईल, या भीतीने आपल्या वडिलांच्या अंत्यविधीलाही इकडे आला नाही. लहान गुन्हे आटोक्यात आणले की मोठे गुन्हे आपोआप नियंत्रणात येतात, हे गुन्हेगारी नियंत्रणाचे सूत्र असते. डॉ. झकीर नाईक दहशतवादाला खतपाणी घालणारे उद्योग करत होता तेव्हाच त्याला पायबंद घातला असता, तर दहशतवादी कारवायांना चाप बसला असता.
No comments:
Post a Comment