Total Pageviews

Saturday, 7 November 2015

पोलिसांनाच का झोडपता?-SAMNA EDITORIAL

पोलिसांनाच का झोडपता? Saturday, November 07th, 2015 अंधेरी पोलीस ठाण्यात जोडप्याला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्त जावेद अहमद यांनी दिले आहेत. म्हणजे शेवटी या प्रकरणातही मायबाप सरकारने पोलिसांनाच गुन्हेगार ठरवून फासावर लटकवले आहे. पोलिसांना त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा देण्याचे राहिले बाजूला. त्यांना फटकावण्याचे काम चालले आहे, हे थांबवा! पोलिसांनाच का झोडपता? सध्या जो उठतोय तो पोलिसांवर ‘दादागिरी’ करतोय व ‘दादागिरी’ करणार्‍यांना संरक्षण मिळत असल्याने मुंबई पोलिसांची ‘गोची’ झाली आहे. कोणीही सोम्यागोम्या पोलीस ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालतो, पोलिसांना शिवीगाळ करतो. पुन्हा पोलिसांनी हे सर्व मुकाट सहन करायचे असते. कारण पोलीस हे जनतेचे मित्र वगैरे असल्याने त्यांनी या ‘बेवड्या’ धांदलखोरांवर कारवाई केली तर त्यांची ‘वर्दी’ उतरवली जाते. गेल्या काही दिवसांत पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणार्‍या अशा घटना घडल्या आहेत व त्या योग्य नाहीत. अंधेरी पोलीस ठाण्यात जोडप्याला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्त जावेद अहमद यांनी दिले आहेत. म्हणजे शेवटी या प्रकरणातही मायबाप सरकारने पोलिसांनाच गुन्हेगार ठरवून फासावर लटकवले आहे. सत्य पोलिसांच्या बाजूने असूनही फक्त ‘सोशल मीडिया’वर काही वेडेवाकडे झळकले म्हणून पोलिसांनाच गुन्हेगार ठरवले जात आहे. २ नोव्हेंबरच्या रात्री अंधेरी मेट्रो स्टेशनबाहेर एक जोडपे एकमेकांना शिवीगाळ करीत होते. एकमेकांशी निर्लज्ज झोंबाझोंबी करीत होते व पोलिसांनी प्रयत्न करूनही त्यांची हाणामारी थांबत नव्हती. त्यांना पोलीस ठाण्यात आणले तरी त्यांची ‘धुंदी’ उतरली नाही व एकमेकांवर आरडाओरड करून त्यांनी भलताच गोंधळ घातला. त्यांना एकमेकांपासून ओढून व खेचूनही दूर करणे अवघड झाले. त्यामुळे बळाचा वापर करावा लागला. या ‘मद्यधुंद’ जोडप्यास पोलीस ठाण्यात आणून ‘दुग्धस्नान’ घालावे व पोलिसांनी त्यांची सेवा करावी असे कुणी म्हणत असेल तर ते चूक आहे. ज्या कुणी या सर्व प्रकाराचे मोबाईल व्हिडीओ-शूटिंग करून सोशल मीडियावर टाकले त्याला सर्वप्रथम अटक करून खटला चालवायला हवा. पोलिसांनी कसे वागावे? काय करावे? यावर मार्गदर्शन नेहमीच दिले जाते, पण लोकांनी कायदा पाळावा, मद्यधुंद अवस्थेत राडेबाजी करून पोलिसांवर हात टाकू नये, असे कुणी सांगताना दिसत नाही. कायद्याचे राज्य म्हणजे त्या जोडप्याचा मद्यधुंद राडा नव्हे व असे ‘राडे’ कायद्याने थांबवता येत नाहीत. गणेशोत्सवात तेच घडले. लालबागच्या राजाच्या मंडपात एका बेताल तरुणीने घुसखोरी केली. सुरक्षेसाठी असलेल्या महिला पोलिसांनी तिला रोखले तेव्हा त्या मुलीने शिवीगाळ करून पोलिसांवरच हल्ला केला. आता पोलिसांनी कायदा मोडणार्‍यांच्या लाथा व थपडा सहन करायच्या असे समाजाला वाटत असेल तर ते राज्याच्या पोलीस खात्याचा कणाच मोडीत आहेत. लोकांनी बेताल वागायचे आणि पोलिसांनी हाताची घडी घालून बसायचे. हेच धोरण असेल तर मग सर्व पोलीस ठाण्यांना टाळेच लावलेले बरे! मागे कांदिवलीच्या पोलीस ठाण्यात दोन तरुणींनी ‘टाइट’ अवस्थेत हातात बीयरच्या बाटल्या घेऊन हंगामा केला व पोलिसांवरच चोरासारखे बसण्याची वेळ आली. याच पोलिसांकडून आपण मग आपल्या व शहराच्या रक्षणाची अपेक्षा करायची! पोलीस हे जनतेचे मित्र वगैरे म्हणणे ठीक आहे, पण पोलीस ठाण्यात जाऊन राडेबाजी करणारे बेवडे हे पोलिसांचे मित्र कसे होऊ शकतात? अंधेरीच्या जोडप्याने मर्यादा सोडल्या. पोलिसांना जुमानले नाही व पुन्हा समाज व सोशल मीडियावाले त्याच ‘विकृतीस’ पाठबळ देणार असेल तर ब्रह्मदेवसुद्धा तुमचे-आमचे रक्षण करू शकणार नाही. हेच लोक उद्या तुकाराम ओंबळेसही गुन्हेगार ठरवतील. अर्थात, पोलीस खात्यातही उडदामाजी काळेगोरे असणारच. तसे ते सर्वच खात्यांमध्ये आणि समाजातही असतात. मात्र त्यामुळे सरसकट संपूर्ण खाते आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून कसे चालेल? कल्याण-डोंबिवलीच्या प्रचारसभेत आम्ही ‘राजकीय’ घरगड्यांचे काम करणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर आसुड ओढले आहेत. आता ही पोलिसी घरगड्यांची विकृतीसुद्धा रोखायला हवी. पोलिसांना त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा देण्याचे राहिले बाजूला. त्यांना फटकावण्याचे काम चालले आहे, हे थांबवा! - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/polisanch-ka-zodpata#sthash.whBdKYKM.dpuf

No comments:

Post a Comment