Total Pageviews

Monday, 30 November 2015

(भारतसोडून इतरत्र) प्रसिद्ध असलेल्या लेखिका अरुंधती रॉय यांनी महात्मा फुले समता पुरस्कार स्वीकारला. कुणाकडून?

अरुंधतीची दांभिकता भारतातील सर्व मानवतावादी कार्यांच्या संरक्षक, कथित सेक्युलर विचारधारेच्या ध्वजवाहक आणि (भारतसोडून इतरत्र) प्रसिद्ध असलेल्या लेखिका अरुंधती रॉय यांनी महात्मा फुले समता पुरस्कार स्वीकारला. कुणाकडून स्वीकारला? आपल्या छगन भुजबळांकडून! या देशात सामाजिक समतेसाठी, सेक्युलरपणासाठी संघर्ष करायचा तर साथ कुणाचीही चालते. सोबत कोण, यापेक्षा संघर्ष महत्त्वाचा. असो. छगन भुजबळ म्हटले की भ्रष्टाचार आठवतो. किती कोटींचा, तर आकडा कितीही सांगता येईल. कदाचित चार हजार कोटींचाही असेल. पण, भुजबळ मात्र महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यामुळे जे भ्रष्टाचाराचे डाग इतरांना दिसतात आणि विशेषत: त्या ‘नतद्रष्ट’ एसीबीला दिसतात, ते महान लोकांना दिसत नाही. भुजबळांकडून पुरस्कार स्वीकारताना अरुंधती रॉय यांना लाज वाटली नसेल किंवा एक लाखाचा चेक स्वीकारताना त्यांचे हात थरथरलेही नसतील. कारण, भुजबळ समतेचे वारकरी आहेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, पोलिस खात्याचे भगवाकरण झाल्याचा परिणाम आहे. त्यामुळे मुळात ते निष्कलंक आहेत. भुजबळांकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत मंचावरून अरुंधतीबाईंनी, सध्या चलनी असलेल्या असहिष्णुतेवर प्रवचन झाडले. पाठीवरून समता परिषदेचा हात फिरल्यावर तोंडातून मळमळच बाहेर पडणार. तशी ती पडली. देशात सध्या जे काही वातावरण आहे, त्याचे वर्णन करायला ‘असहिष्णुता’ हा शब्ददेखील कमी आहे, असे त्या म्हणाल्या. परदेशातून कोट्यवधींच्या देणग्यांचा रतीब बंद झाल्यावर सर्वदूर असहिष्णुताच दिसणार. एक मात्र राहून राहून आश्‍चर्य वाटते की, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांसारख्या थोर लोकांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेणार्‍या या तथाकथित नेत्यांना, अशा नेत्यांची तळी उचलणार्‍या विचारवंतांना, गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार विशेष महत्त्वाचा का वाटत नाही? दांभिकपणानेही शरमून जावे असा यांचा दांभिकपणा आम्ही नजरेआड करतो आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवितो. अरुंधती रॉय यांनी भुजबळांसारख्या बोलक्या सुधारकांच्या मागे लागण्यामागचे गौडबंगाल काय? चिदम्बरम्‌ना उपरती तिकडे दिल्लीत सोनिया कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते पी. चिदम्बरम् यांनी सांगितले की, सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर राजीव गांधी सरकारने घातलेली बंदी चूक होती. २७ वर्षांनंतर ही उपरती झाली आहे. कारण आता ती होऊन खूप काही नुकसान होणारे नाही, याची खात्री असेल, म्हणूनच चिदम्बरम् बोलले. बंदी घातली तेव्हा चिदम्बरम् राजीव गांधी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. पण, ही कृती असहिष्णू ठरत नाही. तस्लिमा नसरीन मुस्लिम उग्रवाद्यांच्या भीतीने वणवण फिरत आहे. अज्ञातवासात जीवन जगत आहे. ती असहिष्णुता ठरत नाही. नरेंद्र दाभोळकरांची हत्या कॉंग्रेसच्या राजवटीत होते, तेव्हा विचारस्वातंत्र्यावर घाला पडत नाही. दिल्लीत शिखांचा नरसंहार होतो, तेव्हा कुणाला भारत सोडून जावेसे वाटत नाही. एम. एफ. हुसेन यांना भारत सोडून पळावे लागले, तेही कॉंग्रेसच्या कारकीर्दीत. यावर गंमत केली ती कॉंग्रेसचे प्रवक्ते राशीद अल्वी यांनी. ते म्हणाले, चिदम्बरम् काय म्हणाले ते मला माहीत नाही. सलमान रश्दींच्या पुस्तकामुळे कोट्यवधींच्या भावनांना आघात पोचला. राजीव गांधी यांनी योग्य निर्णय घेतला. कुणाच्या भावनांना आणि विचारधारेला दुखविण्याचा कुणाला अधिकार नाही. मग हिंदूंच्या भावना दुखविल्या जातात म्हणून गोमांसावर बंदी घातली तर हेच लोक, असहिष्णुता म्हणून ओरडतात. आम्ही काय खायचे ते सरकार ठरविणार काय, असा प्रश्‍न विचारतात. मुळात, या लोकांचे पक्के ठरले आहे की, जे काही आम्ही करू, ते संविधानाचा सन्मान राखण्यासाठी, भारतीय मूल्यांचे वर्धन करण्यासाठी आणि जे काही मोदींच्या कार्यकाळात होईल, ते सर्व संविधानाला पायदळी तुडविणारे, समाजाला तोडणारे. अशी दगडी मते ज्यांची आहेत, त्यांचे काय मतपरिवर्तन होणार? पी. चिदम्बरम्‌देखील जे काही बोलले, तो त्यांचा नाइलाज होता. कारण ज्या कार्यक्रमात ते बोलले, त्याचे नाव होते- इज इंडिया लिबरल रिपब्लिक? (भारत मुक्त गणतंत्र आहे का?). अशा ठिकाणी प्रथमच चुकीची कबुली दिली म्हणजे पुढचे अडचणीचे प्रश्‍न टाळता येतात. तेच चिदम्बरम् यांनी केले. चिदम्बरम् यांची ही उपरती किती तोंडदेखली आहे, हे राशीद अल्वी यांनी ताबडतोब दाखवून दिले, तरीही असहिष्णुतेवरून मोदी सरकारला झोडपणे सुरूच राहणार. पैशाच्या चणचणीने अस्वस्थ झालेला मीडिया या अशा गोष्टींना भडक प्रसिद्धी देत राहणार. सर्वसामान्य नागरिकांनी मात्र यापासून अतिशय सावध राहिले पाहिजे. कारण आता अशा लोकांना वारंवार उपरती होत राहणार... - श्रीनिवास वैद्य

1 comment: