Total Pageviews

Saturday, 14 November 2015

PARRIS ATTACKS-भारत काय शिकणार ?-ब्रिगेडीयर. हेमंत महाजन

भारत काय शिकणार ? काल रात्री झालेला हल्ला हा फ्रान्सवर झालेला दुसºया महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला म्हणावा लागेल. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६० हून अधिक लोक मरण पावल्याचे तसेच ८० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे समजते. या हल्ल्याची जबाबदारी सध्या आयसीसने घेतल्यामुळे हीच संघटना यामागील प्रमूख सूत्रधार आहे हे निश्चित. गेल्या काही महिन्यांपासून मध्य पूर्व, इराक, अफगाणिस्तान व सीरियातील अव्यवस्था आणि हिंसाचाराला कंटाळून हजारो निर्वासित युरोपच्या दिशेने येत आहेत. या निर्वासितांमध्ये आयसीसने आपले प्रशिक्षित दहशतवादी घुसविल्याचे नाकारता येत नाही. हे निर्वासीत संपुर्ण युरोपभर पसरल्यामुळे त्यांच्यासह दहशतवादीही युरोपात पसरले असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे हल्ले केवळ फ्रान्सनंतर थांबतील असे म्हणता येत नाही, असे हल्ले युरोपात इतरत्र होण्याचीही शक्यता आहे. अल कायदा, लष्करे तय्यबा, बोको हराम आणि आयसीस अशा अनेक दहशतवादी संघटना सध्या जगभरात कार्यरत आहेत. त्यापैकी आयसीस सर्वात जास्त क्रूर, भयंकर आणि हिंसक मानला जातो. त्यामुळे आगामी काळात त्यांचे ह्लले वाढतील असे वाटते. फ्रान्स हा अत्यंत संपन्न व आधुनिक देश आहे. त्यांचे लष्कर, पोलीस आणि इतर संरक्षण यंत्रणा तितक्याच आधुनिक आहेत, तरिही तेथे हल्ला झाला याचा अर्थ असे हल्ले जगात कोठेही होऊ शकतात असाच होतो. पॅरिस हल्ल्याची तुलना मुंबईवर झालेल्या २६-११ आणि न्यूयॉर्कवर झालेल्या ९-११ बरोबर करण्यात येऊ शकते. केवळ दोन तासांमध्ये सात ठिकाणी हल्ले करण्यात आले. त्यापैकी ५ ठिकाणी स्फोट घडविण्यात आले तर दोन ते तीन ठिकाणी सामान्य नागरिकांवर गोळीबार करुन त्यांना ठार मारण्यात आले. हे हल्ले हॉटेल, स्टेडियम जेथे एक सामना सुरु होता तसेच एके ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रम सुरु होता तेथे झाले आहेत. म्हणजेच गर्दी जमण्याच्या ठिकाणी ते हल्ले करण्यात आले. इतक्या गर्दीच्या ठिकाणी संरक्षण व्यवस्था सांभाळणे कठिण असते, त्याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि बॉम्बसह ते फ्रान्समध्ये संरक्षण व्यवस्था चांगली असूनही आले याचे कारण ते येथे पूर्वीपासूनच होते. या दहशतवाद्यांपैकी सात जण आत्मघातकी होते, त्यांनी स्वत:ची सूटका होणे अशक्य असल्याचे दिसल्यावर स्वत:ला उडवून घेतले. ज्यावेळेस मरण्याच्या तयारीने दहशतवादी आलेले असतात तेव्हा ते मोठे नुकसान करण्याच्या हेतूने आलेले असतात हे निश्चित आहे. हा हल्ला झाल्यानंतर फ्रान्सने उचलेली पावले वाखाणण्याजोगी आहेत. या देशाने तात्काळ राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. त्यामुळे पोलीस व सैन्याला कोणत्याही संशयीतास ताब्यात घेऊन चौकशी करण्याची संधी मिळाली. जेथे हल्ले झाले तेथील परिसर रिकामा करुन ट्रॅफिकचीही तपासणी करता आली. भारतात मात्र हे चित्र उलटे असते, जेथे मोठी घटना घडते त्यादिशेने लोकांचे लोंढे जाऊ लागतात आणि तपास यंत्रणांना त्यांचा अडथळा होतो. तसेच कोणतीही वृत्तवाहिनी ब्रेकिंग न्यूजच्या ह्टट्पायी तेथे अडथळा आणत नसल्याचे दिसून आले. मी सकाळपासून पाच ते सहा तास फ्रेंच वाहिन्यांचे वृत्तनिवेदन पाहिले. त्यामध्ये केवळ पोलीस खात्यांचे जनसंपर्क अधिकारीच माहिती देत होते. व वाहिन्यादेखिल संयम राखून सयंत वृत्त देत होत्या. असे म्हटले जाते की दहशतवादी १० लोकांना मारतात पण लाखो लोकांना घाबरवून जातात. फ्रान्सने हे टाळले आहे. दहशतवाद्यांना विनाकारण प्रसिद्धी देण्याऐवजी सुरक्षा यंत्रणांच्या कामाला प्रसिद्धी देण्यात येत आहे. संपुर्ण फ्रा्स राष्ट्र म्हणून एकत्र येत एकवाक्यता दाखवून देत आहे. राजकीय पक्षांनीही वेळेचे भान राखून टीका करत बसणे टाळले आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी देण्याऐवजी कशी प्रतिक्रिया देता याईल या वस्तूपाठच फ्रान्सने घालून दिला आहे. या हल्ल्यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात, त्या म्हणजे दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदून एवढी मोठी हानी घडवली म्हणजे ते उच्च दर्जाचे नियोजन करुन आले होते. यामध्ये किती दहशतवादी होते हे शोधून काढणे आव्हानात्मक काम आहे. स्वत:ला उडवून घेतल्यानंतर आठ जण मारले गेले परंतु बाकीचे दहशतवादी इतर फ्रेंच नागरिकांमध्ये मिसळून गेले असावेत. त्यांना शोधणे अत्यंत कठिण काम आहे. तसेच हा दहशतवादाचा भस्मासूर किती दिवस चालेल याचे उत्तरही तितकेच अवघड आहे. कारण पाकिस्तान, अफगाणिस्तान यांसारखे देश दहशतवादाला जितका काळ आश्रय देतील, त्यांना प्रोहोत्साहन, आर्थिक मदत देतील, इंटरनेटचा वापर करु देतील तोवर त्यावर उत्तर सापडणार नाही. आयसीस हा गट इतरांपेक्षा फारच वेगळा आहे. बाकीचे दहशतवादी अत्यंत जुनाट होते. पण आयसीस दहशतवादी इमेल, ब्लॉग, टष्ट्वीटर, फेसबुक, एसएमएस यांचा वापर करतात. त्यामुळे ते फार मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडे तरुणही आकर्षित होतात. भारतातही आयसीसच्या दिशेने वाटचाल करणाºया तरुणांची उदाहरणे दिसून आली आहेत. मसरुर नावाचा बंगळुरूमध्ये आयटी कंपनीत काम करणारा तरुण आयसीसचे भारतात टष्ट्वीटर हँडल चालवत होता, त्याला १८ लाख फॉलोअर्सही मिळाले होते. हा हल्ला फ्रान्सवर का झाला? याचे मुख्य कारण त्या देशाने दहशतवादाविरोधात उचललेले कडक पाऊल म्हणता येईल. सूडापोटी आयसीसने हे हल्ले केले असावेत. पण हे अत्यंत तातत्पुरते कारण म्हणावे लागेल. जोपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबणार नाही तोपर्यंत हे प्रकार चालूच राहतील. भारताने याचा धोका वेळीच ओळखून सज्ज होणे गरजेचे आहे. सीमा अधिक सुरक्षीत करणे आणि सध्या घुसलेल्या दहशतवाद्यांना शोधणे युद्धपातळीवर करावे लागेल. अफगाणिस्तान, म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ येथे पसरलेल्या दहशतवादाची मुळे कापून काढावी लागतील. तरच दहशतवादाच्या भस्मासुरापासून आपल्याला बचाव करता येईल. ब्रिगेडीयर. हेमंत महाजन लेखक निवृत्त ब्रिगेडीयर असून त्यांनी संरक्षण तसेच अंतर्गत सुरक्षेवर विपुल लेखन केलेले आहे.

No comments:

Post a Comment