Total Pageviews

Monday, 30 November 2015

INDO PAK RELATIONS -SAMNA EDITORIAL


इरादे आणि शहजादे! Tuesday, December 01st, 2015 हिंदुस्थानबरोबर विनाअट चर्चा करण्याची तयारी म्हणे आता पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दाखविली आहे. अर्थात फक्त चर्चेची गुर्‍हाळे चालविण्यापेक्षा शरीफमियांनी आधी आयएसआयच्या नथीतून हिंदुस्थानविरोधी ‘गोळी’ मारणे बंद करावे. एकीकडे हेरगिरीचे ‘ना’पाक इरादे कायम ठेवायचे आणि दुसरीकडे मैत्रीचे ‘शहजादे’ बनण्याचा आव आणायचा. पाकिस्तानी दुतोंडी सापाचे हे प्रकार त्याला ठेचल्याशिवाय बंद होणार नाहीत. इरादे आणि शहजादे! हिंदुस्थानात आणि सीमा भागात पाकड्यांचे उपद्व्याप ही काही नवीन गोष्ट नाही. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी, शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन हे त्यांचे उद्योगही नेहमीचेच आहेेत. ‘हंस के लिया पाकिस्तान, लड के लेंगे हिंदुस्थान’ ही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि त्यांनी पोसलेले हिंदुस्थानातील धर्मांध मुस्लिम यांची पूर्वीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी सर्वच मार्गांचा अवलंब पाकिस्तान करीत असतो. त्यात तो आजपर्यंत कधीही यशस्वी झालेला नाही हा भाग वेगळा, पण म्हणून कुरापती आणि उचापतींचे त्यांचे ‘ना’पाक उद्योग थांबलेले नाहीत. जम्मू आणि कोलकात्यामधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या पाचजणांना रविवारी पकडण्यात आले. यात आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या आपल्या देशातील हेरगिरीच्या कारवायांवर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातील ‘मार्गदर्शक’ यांच्यातील दूरध्वनी संभाषणातूनही आयएसआयचा प्रत्यक्ष सहभाग जगासमोर आला होताच. आता पाकिस्तानचे जे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त केले गेले त्यातून पाकिस्तानचा ‘नापाक’ चेहरा जगासमोर पुन्हा आला आहे. बलुचिस्तानात हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानविरोधी कारवाया घडवून आणत आहे, तेथील ‘फुटीरतावादी’ शक्तींना खतपाणी घालीत आहे, अशी बांग पाकिस्तानी राज्यकर्ते नेहमीच ठोकत असतात. अलीकडच्या काळात तर हा कांगावा जरा जास्तच केला जात आहे. पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या ताज्या अमेरिका दौर्‍यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडेही हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. सरबजीत प्रकरणावरूनही पाक सरकार आणि लष्कराने हिंदुस्थानला हेरगिरीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा नेहमीचा उपद्व्याप केला होता. मग आता पाकचेच हेरगिरीचे जे रॅकेट हिंदुस्थानी यंत्रणांनी उद्ध्वस्त केले त्याबद्दल पाकिस्तानला काय म्हणायचे आहे? अर्थात पाकिस्तानी हेरगिरी पहिल्यांदाच पकडली गेली असे नाही. त्यांचे हे उद्योग यापूर्वीही हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी उघड केले आहेत. ‘आयएसआय’साठी हेरगिरी करणार्‍या सैन्यातील एका कारकुनाला दोन वर्षांपूर्वी जयपूरमध्ये अटक करण्यात आली होती. शिवाय हिंदुस्थानी गृहखात्यातच पाकसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून एका वरिष्ठ अधिकार्‍याची चौकशी करण्यात आली होती. गेल्या तीन-चार वर्षांत आयएसआयच्या सुमारे ५० गुप्तहेरांना हिंदुस्थानात पकडण्यात आले आहे. तरीही हिंदुस्थानच्याच नावाने पाकिस्तान उलट्या बोंबा मारीत असतो. वास्तविक पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर आयएसआयच्या माध्यमातूनच हिंदुस्थानविरोधी कारवाया अमलात आणत असतात. हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांत पाक गुप्तहेर आणि हिंदुस्थानविरोधी गद्दारांची पिलावळ कार्यरत आहे. मग ते इस्लामी दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष मदत करणारे ‘स्लीपर सेल’ असतील, सिमी, इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांत काम करणारे असतील किंवा या सर्व मंडळींनी ठिकठिकाणी तयार केलेल्या ‘मिनी पाकिस्ताना’तून हिंदुस्थानविरोधी फूत्कार सोडणारे धर्मांध असतील. पाकड्यांचे हे ‘ना’पाक उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहेत. जम्मू आणि कोलकाता येथे उघड झालेले पाक हेरगिरीचे रॅकेट हा या उद्योगांचा केवळ एक छोटा भाग आहे. हिंदुस्थानबरोबर विनाअट चर्चा करण्याची तयारी म्हणे आता पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दाखविली आहे. ती तर त्यांना दाखवावीच लागेल, पण फक्त चर्चेची गुर्‍हाळे चालविण्यापेक्षा शरीफमियांनी आधी आयएसआयच्या नथीतून हिंदुस्थानविरोधी ‘गोळी’ मारणे बंद करावे. एकीकडे हेरगिरीचे ‘ना’पाक इरादे कायम ठेवायचे आणि दुसरीकडे मैत्रीचे ‘शहजादे’ बनण्याचा आव आणायचा. पाकिस्तानी दुतोंडी सापाचे हे प्रकार त्याला ठेचल्याशिवाय बंद होणार नाहीत. - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/irade-ani-shehjade#sthash.GiWWboBB.dpuf

No comments:

Post a Comment