आयपीएलने
देणगी दुष्काळ निवारणाला दिली पाहिजेराव, दादा आता गप्प का? दुतोंडी आणि दुटप्पी धोरणांबद्दल महाराष्ट्रातील राजकारण्यांचा हात कुणी धरणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. देशामध्ये आणि विशेषत: महाराष्ट्रात आजवरचा सगळ्यात भीषण दुष्काळ पडलेला असतानाही महाराष्ट्र शासनाला अत्यंत श्रीमंत अशा आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर 60 लाख लिटर पाणी वापरले जाण्याच्या प्रकाराकडे शांतपणे किंबहुना धृतराष्ट्रासारखे पाहत बसावेसे वाटते आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत अशी ही स्पर्धा आहे. मुळामध्ये तो खेळही नाही. तो आहे मसालेदार करमणूक. मग त्याला पाण्याची एवढी उधळपट्टी करू देण्याची आवश्यकता काय? अर्थसंकल्पात सरकार तंबाखू, विडी, सिगारेट, मद्य या बाबी चैनीच्या ठरवून त्यावर दरवर्षी वाढीव कर लादते. कारण या बाबी जीवनावश्यक नाहीत. त्या चैनी आणि व्यसनांच्या आहेत. त्यामुळे त्यावर वाढीव कर लादणे व त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तूंवर कर न लादणे अथवा असतील तर त्यात वाढ न करणे असे रास्त धोरण अनुसरते. ते जनतेनेही मान्य केले आहे. मग हाच न्याय आयपीएलला का लागू होऊ नये? तुम्हाला घ्यायच्या असतील तर या स्पर्धा पाण्याचा वापर न करता घ्या. तसेच जवळपास दीड हजार कोटींची उलाढाल ज्या स्पर्धेतून संयोजक करतात त्यांनी भरीव अशी देणगी दुष्काळ निवारणाला दिली पाहिजे, असा आग्रह आमचे जाणते राजे का धरत नाहीत? वास्तविक ते आयसीसीचे अध्यक्ष, बीसीसीआयचेही माजी अध्यक्ष. सगळे क्रिकेट विश्व त्यांच्या तालावर नाचणारे आहे. असे असताना या दोन बाबी त्यांच्याकडून करवून घेण्यात या जाणत्या राजांना कोणती अडचण आहे? सामन्यांसाठी लागणारे पाणी आम्ही विकत घेतले, असा दावा कदाचित आयपीएलचे संयोजक करतील. तो मूर्खपणाचा ठरेल. सरकार जिथे खासगी विहिरी आणि जलस्त्रोत अधिग्रहीत करते तिथे आयपीएलच्या आम्ही पाणी विकत घेऊन नासले या म्हणण्याला कोणता अर्थ प्राप्त होतो? आसारामबापूंनी त्यांच्या सत्संगात होळीच्या आधी जी होळी खेळली, रंगपंचमी साजरी करण्यासाठी काही लाख लिटर पाणी वापरले त्याची अत्यंत तीव्र अशी प्रतिक्रिया संपूर्ण देशभरात उमटली. बापूंच्या भ्नताविरुद्ध व या रंगपंचमीच्या संयोजकांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले. अंधेरी येथील विष्णू गवळी यांनी हे प्रकरण हायकोर्टात नेले आहे. तर या रंगपंचमीसाठी टँकर देणार्या अभियंत्याला ठाणे महापालिकेने निलंबित केले आहे. जो न्याय आसारामबापूंच्या रंगपंचमीला तोच न्याय आयपीएलच्या पाण्याच्या उधळपट्टीला का लावला जात नाही, हा जनतेचा प्रश्न आहे. आयपीएलचे नेतृत्व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे आहे व महाराष्ट्राचे जलसंपदा खाते त्यांचे पुतणे अजितदादा यांच्याकडे आहे. म्हणून हा भेदभाव होतो आहे काय? या प्रश्नाचे कोणते उत्तर दोन्हीही पवारांकडे आणि मुख्यमंत्रीपद भूषविणार्या बाबांकडे आहे? एकीकडे जनता पाण्यासाठी रानोमाळ भटकत असताना व टँकरची प्रतीक्षा करीत असताना आयपीएलच्या सामन्याच्या मैदानावर हिरवळ निर्माण करण्यासाठी अथवा ती राखण्यासाठी प्रत्येक सामन्याकरिता साठ लाख लिटर पाण्याची उधळपट्टी करणे म्हणजे या जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्यासारखे नाही काय? एकीकडे जनतेला पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याचा उपदेश झोडायचा आणि स्वत:च्या पुठ्ठ्यातल्या संस्थांना मात्र मनसो्नत पाण्याची उधळपट्टी करू द्यायची. हा डबल ढोलकी बाणा कशासाठी? महाराष्ट्रातील साखर उद्योग आधीच संकटात सापडला आहे. एकीकडे कमी उसाचे संकट तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांची टंचाई. त्यात साखरेची बाजारपेठ कोसळली. उसाच्या टंचाईमुळे हंगामाचा कालावधी घटला. परिणामी उत्पादन खर्च वाढला. अशी स्थिती असतानाही जाणत्या राजांनी व त्यांच्या टग्या पुतण्यांनी साखर कारखान्यांना दुष्काळ निधीला भरघोस मदत करण्याचा हग्या दम दिला. त्यानुसार बिचार्या कारखान्यांनी कोट्यवधीचा निधी चुटकीसरशी गोळा केला आणि मुख्यमंत्री अथवा राष्ट्रवादीच्या दुष्काळ निवारण निधीत भरभरून ओतला. आता या निधीचा प्रत्यक्षात वापर कसा होईल ही बाब अलाहिदा! परंतु अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारांना दुष्काळ निवारण निधीसाठी वेठीला धरणारे राव, दादा आणि बाबा 1500 कोटींची उलाढाल करणार्या आयपीएलबाबत तोंडात गुळणी धरून बसले आहेत. वास्तविक मूठभर उच्चभ्रूंच्या घडीभर मनोरंजनासाठी खेळवले जाणारे आयपीएल हे सर्कस क्रिकेट आहे. त्याला या सवलती कशासाठी? वास्तविक आयपीएलकडून भरभ्नकम अशी देणगी दुष्काळ निवारणासाठी घ्यायला हवी होती. खरे सांगायचे तर आयपीएलनेच आपण होऊन तशी घोषणा करायला हवी होती. परंतु सैय्या भये कोतवाल फिर डर काहे का? अशा गुर्मीत आयपीएल आहे. तिची ही गुर्मी कुणामुळे आहे? आणि ती उतरविणार कोण? आयपीएल ही क्रीडा संघटना नाही, तो धर्मादाय निधी नाही. ती सेवाभावी संस्था नाही हे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिला कुठल्याही कर सवलती देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत आयपीएलचे लाड राज्यकर्ते का पुरवित आहेत? सध्या बॉलिवूडही समाजाबाबत संवेदनहीन झाले आहे. 1980 पर्यंत देशात कुठलीही आपत्ती आली की सिने कलावंत मदत गोळा करण्यासाठी मुंबईत रॅली काढत असत. तिला भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळत असे. आता त्यालाही देशभरात तीव्र दुष्काळ असतानाही काही करावेसे वाटत नाही. वास्तविक त्या काळात मानधन काही लाखात होते. आता ते कोटीमध्ये गेले आहे. तरीही सिनेअभिनेत्यांमध्ये ही संवेदनहीनता कशामुळे आली? इतर वेळेला आपल्या चाहत्यांचे ऋण जाहीरपणे मान्य करणारे हे कलावंत त्या ऋणातून काहीसे उतराई होण्याची आलेली ही संधी का दुर्लक्षित आहेत, याचाही विचार व्हायला हवा. ज्याला शतकाचा महानायक म्हणतात तो अमिताभही गप्प आहे. तिथे बाकीच्यांचे काय सांगावे
No comments:
Post a Comment