Total Pageviews

Thursday, 18 April 2013

BOASTAN BLASTS

बॉस्टन स्फोटांचा धडा -नवप्रभा
बॉस्टन मॅरेथॉनवेळी झालेल्या स्फोटांद्वारे अमेरिकेला पुन्हा एकवार दहशतवादाने ललकारले आहे. विश्व व्यापार केंद्रावरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रोखण्यात यश मिळाल्याचा जो टेंभा अमेरिका आजवर मिरवीत आली होती, त्याचा फुगा या स्फोटांनी फुटला आहे. या स्फोटामागे अल कायदा किंवा तत्संबंधित दहशतवादी संघटना आहेत की नाहीत हे अद्याप जरी स्पष्ट झालेले नसले, तरी एवढ्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेसाठी पाच लाख प्रेक्षक गोळा झालेले असताना स्पर्धेच्या थेटफिनीश लाईन’ पाशीच हे स्फोट घडवले गेल्याने यातून अमेरिकी जनतेचा आपल्या सुरक्षेवरील दृढ भरवसा पुसला गेला आहे हे निश्‍चित. या स्फोटांमागे नेमके कोण आहे हे अद्याप पुराव्यांनिशी स्पष्ट झालेले नसले तरी शेवटी त्यामागे कोणीही असो, हे दहशतवादी कृत्य आहे आणि अमेरिकेच्या अत्यंत सजग आणि दक्ष सुरक्षा यंत्रणा असलेल्या सुरक्षित भूमीवर असे स्फोट घडविले जाणे हा त्या देशासाठी नक्कीच मोठा हादरा आहे. या स्फोटांनी फार प्राणहानी जरी झाली नसली, तरी त्यांचे एकंदर स्वरूप पाहाता मोठा घातपात घडवण्याचा त्यामागील इरादा स्पष्ट होतो.
एक स्फोट झाल्यानंतर काही सेकंदांतच दुसरा स्फोट घडवण्याची क्लृप्तीही भारतामधील दहशतवादी कारवायांत यापूर्वी वापरली गेलेली आहे. त्यातून प्राणहानी अनेक पटींनी वाढत असते. बॉस्टन मॅरेथॉनच्या अंतिम रेषेपाशीच हा स्फोट घडवण्यामागेही यच्चयावत प्रसारमाध्यमांचे लक्ष त्याकडे त्वरित वेधले जावे आणि स्फोटांची तीव्रता अख्ख्या जगाला दिसावी असाच हेतू असावा आणि तो सफल झाला आहे. स्फोट होतानाची दृश्ये, उठलेले धुराचे लोट यातून पुरेशी दहशत अमेरिकेत माजवली गेली आहे. या स्फोटांमागे अल कायदा आहे की नाही हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. कदाचित हे देशांतर्गत दहशतवादी शक्तींचेही कृत्य असू शकते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत श्वेत वर्चस्ववाद्यांचाही अलीकडे घातपाती कृत्ये घडवण्यात हातखंडा दिसून आला आहे. विश्व व्यापार केंद्रावरील दहशतवादी हल्ल्याच्याही पूर्वी ऑक्लोहामा शहरातील बॉम्बस्फोटांनी अमेरिका हादरली होती. त्या स्फोटांमागे अशा श्वेत वर्चस्ववादी शक्ती होत्या असे नंतर आढळून आले. बॉस्टन मॅरेथॉनमधील स्फोट हे देखील अशा एखाद्या स्थानिक गटाचेही कृत्य असू शकते. परंतु तसे नसेल तर मात्र तो अमेरिकेसाठी अधिकच चिंतेचा विषय बनणार आहे. जिहादी दहशतवाद्यांचे जर हे कृत्य असेल तर त्यातून मध्य पूर्व आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत त्याचे पडसाद यापुढील काळात उमटत जातील हे उघड आहे. अमेरिकेची दहशतवादासंदर्भातील आक्रमक प्रत्युत्तर देण्याची नीती लक्षात घेतली तर हे हल्ले सहन करून स्वस्थ बसण्याच्या स्थितीत बराक ओबामा नाहीत. एक कणखर नेता अशी आपली प्रतिमा त्यांना आटोकाट जपायची आहे. या स्फोटांनंतर त्यांनी देशाला उद्देशून दिलेल्या संदेशाची भाषा जरी पाहिली, तरी या कणखरपणाची चुणूक त्यात दिसून येते. या स्फोटांमागे जे कोणी असतील त्यांची पाळेमुळे खणून काढून त्यांना त्यांच्या दुष्कृत्याची पूर्ण सजा देण्याचे अभिवचन त्यांनी अमेरिकी जनतेला दिलेले आहे. जिहादी दहशतवाद्यांनी जर हे स्फोट घडवून आणले असतील तर अर्थातच जगाच्या रंगभूमीवर सूडनाट्य भविष्यात रंगणार आहे. अमेरिकेसारख्या सुरक्षित देशामध्ये असे स्फोट घडवण्याचे षड्‌यंत्र तडीस न्यायचे म्हटले तरी अल कायदाला स्थानिक पातळीवर दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे जाळे निर्माण केल्याखेरीज असे स्फोट घडवता येणे शक्यच नाही. त्यामुळे अमेरिकेसाठी ती अधिक चिंतेची बाब असेल. ही देशांतर्गत दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठिराख्यांची साखळी हुडकून काढून त्यांना धडा शिकवणे हे मोठे आव्हान मग अमेरिकी प्रशासनापुढे असेल. या स्फोटांमागे जे कोणी असतील त्यांना धडा शिकवण्याबरोबरच अमेरिकी जनतेने गमावलेला स्वतःच्या सुरक्षेबाबतचा भरवसा पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हानही अमेरिकी प्रशासनापुढे असेल. या संकटाच्या घडीस सामोरे जाण्याची अमेरिकेची आक्रमक तर्‍हा आणि आपल्याकडील अशा प्रकारच्या दहशतवादी घटनांच्या वेळी दिसणारा राजकीय नेत्यांचा कचखाऊपणा यामधील अंतर आपल्यालाही बरेच काही सांगून गेले असेल. शाब्दिक इशार्‍यांच्या बुडबुड्यांनी दहशतवाद मोडून काढता येत नसतो एवढा धडा आता तरी आपले पुढारी घेतील काय

No comments:

Post a Comment