हिजबुल मुजाहिद्दिन या कुविख्यात दहशतवादी संघटनेच्या आणखी एका म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याच्यासोबत याच संघटनेचे आणखी दोन दहशतवादीही गुरुवारी मारले गेले. दोन वर्षांपूर्वी काश्मीर खोऱयात बुरहान वाणी या हिजबुलच्याच म्होरक्याला ठार करण्यात आले होते. त्यावेळी काही स्वयंघोषित मानवतावाद्यांनी सुरक्षा दलांवर आणि भारत सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. अशी माणसे मारून काश्मीर समस्या सुटणार नाही. त्यासाठी चर्चेचीच कास धरली पाहिजे, असा उपदेशही (नेहमी केला जातो तोच) केला गेला. आता मन्नान वाणी यालाही यमसदनी पाठविण्यात आले आहे. वास्तविक बुरहान आणि मन्नान यांचे आडनाव एकच असले तरी त्यांचा एकमेकांशी नातेसंबंध नाही. पण ते एकाच दहशतवादी विचारसरणीने भारलेले होते आणि भारताच्या विघटनासाठी कार्यरत होते. दोघेही एकाच संघटनेचे प्रमुख हस्तक होते. काश्मीर भारतापासून तोडणे हे या संघटनेचे ध्येय आहे. बुरहानच्या खात्म्यानंतर मन्नान त्याची जबाबदारी सांभाळत होता, असे म्हटले जाते. मन्नान वाणी हा अलिगड मुस्लीम विद्यापीठाचा माजी रिसर्च स्कॉलर होता. भूगर्भ शास्त्रात त्याला गती होती. त्याला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्याची तयारी त्याचे आईवडील करत होते. तथापि, त्याने आपल्या बुद्धिमत्तेला न्याय देण्याऐवजी स्वतःच्या विनाशाचा मार्ग निवडला. सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार त्याने याच वर्षी 5 जानेवारीला हिजबुल मुजाहिद्दिन संघटनेत प्रवेश केला. त्याचे हातात रायफल घेतलेले छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. अशा प्रकारे विख्यात भूगर्भ शास्त्रज्ञ होण्याऐवजी कुख्यात दहशतवादी होणे त्याने पसंत केले. त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचा विचार आणि विश्लेषण करणे भाग पडते. धर्माचा पगडा, सुशिक्षितांपेक्षा अशिक्षित किंवा अर्धशिक्षितांवर अधिक असतो. ते धार्मिक अतिरेकाच्या जाळय़ात अधिक सहजगत्या सापडतात असा एक सार्वत्रिक समज आहे. तथापि, सत्य परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी असल्याचे दिसते. आतापर्यंत जे दहशतवादी मारले किंवा पकडले गेले आहेत, किंवा ज्यांना शिक्षा झाल्या आहेत, त्यांच्यात केवळ सुशिक्षितांचेच नव्हे, तर उच्चशिक्षितांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे जे अर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आहेत, त्यांचे प्रमाणही मोठे आहे. म्हणजेच हा गरीबी किंवा श्रीमंतीचाही प्रश्न असल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पलीकडे जाणार प्रश्न आहे. ज्यांना लोकमान्यता असलेल्या क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमाविण्याची संधी होती, असे तरुण धार्मिक दहशतवादाचा मार्ग पत्करून आणि चुकीच्या संकल्पना मनात रूजवून घेऊन स्वतःच्या आयुष्याची शोकांतिका करून घेतात ही आश्चर्याची बाब आहे. अर्थात या स्थितीला ते स्वतः जबाबदार आहेत. शिक्षणामुळे सारासार विचार करण्याची क्षमता प्राप्त होते या समजुतीला अशा घटनांमुळे तडा जातो. एकदा हा सर्वनाशाकडे नेणारा मार्ग स्वीकारल्यानंतर एकतर आपण दुसऱयाला मारणे किंवा स्वतः मरणे हेच पर्याय उरतात. अशा स्थितीत स्वतःला लोटण्यामागे कोणती मानसिकता असते आणि ती कशी निर्माण होते, यावर अनेकदा तज्ञांनी विचार व्यक्त केले आहेत. तथापि, त्यावर उपाय सापडत नाही, हे खरे आहे. अशा व्यक्ती दहशतवादाच्या दलाल ांच्या हाती सापडल्यानंतर त्यांच्या बुद्धीचा उपयोग हे दलाल त्यांच्या कामासाठी करून घेतात आणि स्वतः नामानिराळे राहतात. अनेक जणांचा असा शोकांत झाला असूनही त्यापासून शहाणपणा शिकला जात नाही, इतके हे धर्मवेड प्रबळ असते. यावर प्रबोधन हा मार्ग असल्याचे सांगितले जाते. पण हे प्रबोधन कोणी, कोणाचे आणि कसे करायचे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. गेल्या काही दशकांमध्ये शिक्षणासाठी स्वतःचे घर सोडून बाहेर जाण्याची पद्धत रूढ झाली आहे. असे युवक दहशतवादाच्या दलालांच्या हाती सापडण्याची शक्यता मोठी असते. एकदा ते त्यांच्या प्रभावाखाली आले की आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसतात. यातून ते देशद्रोहाच्या मार्गाला लागले की त्यांचा विचार सहानुभूतीने केला जाऊ शकत नाही. त्यांच्या विरोधात कठोरातील कठोर पावले उचलणे प्रशासन आणि सुरक्षा दलांना भाग पडते. त्यामुळे अशी स्थिती निर्माण होण्यापूर्वी अशा व्यक्तींनी स्वतःच विचार करणे आणि पावले उचलणे आवश्यक असते. अशा व्यक्तींना समजून घ्यावे, त्यांच्या भावनांचा विचार करावा, त्यांना सुधारण्याची संधी द्यावी, त्यांच्या विरोधात एकदम शस्त्र उचलून त्यांचा खात्मा केल्याने काहीही साध्य होणार नाही, असाही एक सल्ला दिला जातो. तथापि, जेव्हा देशाविरोधात युद्ध पुकारले जाते आणि हातघाईची परिस्थिती उद्भवते तेव्हा सुरक्षा दलांकडे इतका विचार करण्याचा अवधीही नसतो. त्यांचे काम देशद्रोहय़ांना संपविणे हेच असते आणि त्यांनी ते केल्यास त्यांना दोष देता येत नाही. प्रशासन किंवा सरकारलाही अशा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करावीच लागते. कारण हा केवळ काहींच्या भावभावनांचा प्रश्न नसून देशाच्या सुरक्षेचा असतो. त्यावर तडजोड करता येणे अशक्य आहे. मन्नान याच्या खात्म्यानंतर काही राजकीय नेत्यांनी बुद्धिमान युवकाचा असा मृत्यू झाल्याचे दुःख व्यक्त केले आहे. तसेच प्रशासनावर या घटनेची जबाबदारी ढकलली आहे. ही एकांगी विचारसरणी आहे. कित्येकदा अशा युवकांना विनाशाच्या मार्गावर नेण्यासाठी अशा राजकारण्यांचीच प्रक्षोभक वक्तव्ये व त्यांनी स्वतःच्या सत्तास्वार्थासाठी निर्माण केलेले वातावरण कारणीभूत असते. त्या जाळय़ात अडकण्याची पेंमत या युवकांना भोगावी लागते. तथापि, एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली की मग कोणाचाही इलाज चालत नाही. दहशतवादाच्या माध्यमातून काहीही साध्य होत नाही, याची जाणीव प्रारंभापासून ठेवणे आवश्यक आहे
No comments:
Post a Comment