Total Pageviews

Saturday, 27 October 2018

जन(अ)हित याचिका! टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |:तरुण भारत



मा. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पदारूढ झाल्यावर घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे यापुढे ऊठसूट कोणत्याही अनावश्यक बाबींवर जनहित याचिका दाखल करता येणार नाहीत. दाखल केलेल्या याचिकादेखील काळजीपूर्वक पडताळणी करून मगच सुनावणीस घेतल्या जातील. खरेतर जनहित याचिका ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब. मात्र, दुर्दैवाने तथाकथित पुरोगामी वर्गाने आजवर त्यांचा हिंदू धर्म, सण-परंपरा यांच्याविरुद्ध बर्‍याच प्रमाणात दुरुपयोग केला आहे. गेला कित्येक काळ एखादा सण आला की एखादी जनहित याचिका आलीच, असे समीकरण रूढ झालेले आपल्याला दिसते. दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण जवळ येऊन ठेपला आहे. एकंदर पुरोगामित्वाचे बुद्धिऐश्‍वर्य पाहता, यानिमित्ताने अशाच काही पुरोगामी जनहित याचिका दाखल केल्या जाऊ शकतील.
त्यांचा कल्पनाविलास :
-
दिवाळी हा सण चार दिवस साजरा न करता; एकाच दिवशी सकाळ ते संध्याकाळ असा वसुबारस ते पाडवा साजरा केला जावा.
-
वसुबारसेच्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करणे हा प्राणिमात्रांमध्ये भेदभाव करणे आहे. सवर्णांचा प्राणी असलेल्या गायीची पूजा करण्याऐवजी पुरोगाम्यांतील सर्वसमावेशक, सर्वप्रिय अशा श्‍वानांचीच या दिवशी पूजा केली जावी.
-
अभ्यंगस्नान करते वेळी किती मिली तेल आणि किती ग्रॅम उटणे लावावे यावर निर्बंध हवे. जास्त मात्रेत लावलेले तेल काढण्यास जास्त पाणी वापरावे लागते. दिवाळीतील या एका दिवशी झालेल्या पाण्याच्या नासाडीमुळे पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होऊ शकते. उटण्यासाठी वृक्षतोड झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगची भीती निर्माण होते. यासाठी या दोहोंच्याही वापरावर कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे.
-
नरकासुर हा कोणी असुर नसून आमचा पूर्वज होता. आफ्रिकेतील खेड्यापाड्यांत आजही त्याची पूजा होते. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून पायाच्या अंगठ्याने चिराटे फोडण्याची क्रूर प्रथा तातडीने बंद करण्यात यावी. हा दिवस महात्मा नरकासुर शहादत दिवस म्हणून जाहीर करण्यात यावा. या दिवशी महात्मा नरकासुर यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्यांची चित्रफीत शाळांमध्ये दाखवली जावी.
-
धन्वंतरीही सनातनी आयुर्वेदाची देवता आहे. समुद्रमंथनाचा कोणताही उल्लेख आमच्या असुरांचा खरा इतिहासनामक पाठ्यपुस्तकात नाही. त्यामुळे धन्वंतरी यांना देव न मानता आजच्या वैद्यकाचा प्रणेता असलेल्या सॉक्रेटिसचीच या दिवशी पूजा व्हावी. सॉक्रेटिस नाही का तो? मग कोण? हिपोक्रेटस्? बरं बरं. आम्हा पुरोगाम्यांचे कधी काही चुकत नसल्याने सॉक्रेटिसऐवजी हिपोक्रेटस् असे वाचावे. न वाचल्यास सॉक्रेटिसलाच आम्ही आधुनिक वैद्यकाचा बाप म्हणून जाहीर करू! आमचा शब्द अंतिम राहायला हवा.
-
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारीवर्गाने वह्यांची पूजा करण्याची बुरसटलेली प्रथा टाकून द्यावी. आपले नवे वर्ष हे १ जानेवारीला सुरू होत असल्याने २ जानेवारीलाच वहीपूजन करावे. (कारण १ तारखेला आदल्या दिवशीच्या पुरोगामी तीर्थाचा अंमल शिल्लक असल्याने काही काम शक्य होत नाही.)
-
पाडव्याला पत्नीने पतीला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळण्याची प्रथा बंद व्हावी. ही प्रथा पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे. यापुढे पतीने पत्नीला आणि भावाने बहिणीला ओवाळावे. त्या दोघींनी ओवाळणी म्हणून काहीही देऊ नये. हजारो वर्षांच्या पुरुषी वर्चस्वाला मोडीत काढण्याचा हा उत्तम मार्ग ठरेल.
आकाशकंदिलाच्या झिरमिळ्या किती लांबीच्या असाव्यात, याचे स्पष्ट निर्देश हवेत. खालून जाणार्‍या व्यक्तीला लांब झिरमिळ्यामुळे गळफास लागू शकतो; शिवाय कंदिलासाठी रात्रभर वीजही खर्च केली जाते. यासाठी खरेतर कंदिलावर बंदीच घालण्याचा विचार करावा. ते शक्य न झाल्यास लांबीवर निर्बंध टाकायलाच हवेत.
-
मातीच्या पणत्या न वापरता विजेचे दिवे वापरले जावे. मातीच्या पणत्या वापरल्याने जमिनीची धूप होत आहे. शिवाय त्यामध्ये वाया घालवल्या जाणार्‍या तेलातून कित्येकांच्या स्वयंपाकघरात फोडणी पडू शकते, हाही भाग आहेच. विजेचे दिवे वापरताना ते चिनी बनावटीचेच असावेत. हिंदी-चिनी भाई भाईया घोषणेला जागत, आपल्या चिनी बांधवांचे पोट भरण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात ठेवायला हवे.
-
इमारतीच्या आवारात किल्ला उभा करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे. किल्ल्यावरील तोफांची संख्या मर्यादित असावी आणि मावळ्यांच्या हातात तलवारी न देता चरखे देऊन अहिंसेचा संदेश देण्यात यावा. किल्ल्यावर हिंदू आतंकवादाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज लावण्यास मनाई करावी. तिथे पुरोगामी एकात्मतेचे प्रतीक असलेला परचम-ए-सितारा-ओ-हलालच उभारला जावा.
-
रांगोळी काढताना ती घरातच रेखाटण्याची परवानगी असावी. संस्कारभारती रांगोळी हा प्रकार संघी असल्याने त्यावर बंदी घालावी. रांगोळीसाठी हिरवा आणि पांढरा रंग अनिवार्य असावा. शंख, चक्र इत्यादी हिंदू प्रतीकांचा रांगोळीत समावेश होऊ नये.
-
लाडूचे वजन, चकल्यांच्या वेटोळ्यांची संख्या, चिवड्यात घातल्या जाणार्‍या शेंगदाण्यांची संख्या याविषयीची नियमावली जाहीर करावी. फराळाच्या पदार्थांची न्युट्रीशनल व्हॅल्यू, त्यात वापरले गेलेले तेल, साखर यांची सविस्तर माहिती डब्याच्या बाहेर चिकटवणे अनिवार्य करावे.
-
फराळाचे पदार्थ आरोग्यदायक अशा ऑलिव्ह ऑईलमध्येच बनवले जावेत. देशी गायींचे तूप आणि अन्य देशी तेलांची विक्रीच दिवाळीत बंद करावी.
-
लाडूंना बेदाणा वा चारोळी टोचल्याची खूण असल्यास आणि सोबत त्यांपैकी काहीच नसल्यास कोणत्याही चौकशीशिवाय अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. असे करणे हे वंचितांचे शोषण असून त्याची गंभीर दखल घेतली जायला हवी.
-
सरतेशेवट आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, दिवाळीला हिंदू सण असे न म्हणता पंथनिरपेक्ष सण असे म्हटले जावे. आणि हळूहळू हा सण साजरा होणे पूर्णतः बंद करण्याकडे प्रगतिशील वाटचाल करावी.
वरील कल्पनाविलास वाचून आपले मनोरंजन झाले असेल, हसू आले असेल. मात्र, या याचिकांची एकंदर वाटचाल ही हलक्यात घेण्यासारखी मुळीच नाही. मा. सरन्यायाधीशांनी एकंदर जनहित याचिका दाखल करण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह असाच आहे. देशाचे सामाजिक स्वास्थ्य जपायचे असेल, तर अशा जन(अ)हित याचिकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्याच पाहिजेत


No comments:

Post a Comment