आपण पाहावे आपणासी.... एक सुजाण नागरिक
म्हणून आपणही सावध राहायला हवं! साईली
भाटकर-महा एमटीबी
आपल्या सैनिकांकडे सुधारित शस्त्रं आली
म्हणजेच देश सुरक्षित झाला, असे होत नाही. कोणत्याही देशाची सुरक्षा ही
जेवढी देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून असते, तेवढीच ती त्या देशातील नागरिकांवरही
अवलंबून असते. नागरिकांनी जर सतर्कता बाळगली,
तर त्याचा फायदा कायदा व सुव्यवस्थेला
होणारच आहे. देशाच्या सुरक्षेत असेही योगदान देता येईल पण, तरीही
सुरक्षा यंत्रणांनीही स्वत:मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
अमेरिकेच्या नौदलातील वरिष्ठ
अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विषारी पत्र पाठवल्याचा
धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्याने इतर अनेक
वरिष्ठ अधिकारी आणि मोठमोठ्या नेत्यांनाही असेच विषारी पत्र पाठवले आहे. या
पत्रामधून रायसिन हा जैविक विषारी पदार्थ सापडला. विल्यम अॅलेन असे या वरिष्ठ नौदल
अधिकाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली,
परंतु सांगायचा मुद्दा हा की, अमेरिकेची
सुरक्षा यंत्रणा एवढी सशक्त असतानादेखील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असे
विषारी पत्र पाठवण्यात आले. अमेरिकन सुरक्षाव्यवस्थेच्या डोळ्यात धूळ फेकून ते
विषारी पत्र अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचलेच. सुदैवाने यात कोणतीही
जीवितहानी झालेली नाही. तरीदेखील अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह
उपस्थित होतेच ना! अब्जावधी डॉलर्सचा खर्च ही सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी
करण्यात आला असेल. अमेरिकाच सुरक्षित नसताना ती इतरांना काय अभय देणार? अर्थात
आजवर अनेक देश अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला आपला आदर्श मानत आले आहेत, परंतु
विकसित तंत्रज्ञान असलेली अमेरिका ही सुरक्षेच्या बाबतीत पुन्हा एकदा फोल ठरली. मग
तो ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला असो किंवा मग अमेरिकेतील शाळांमध्ये
लहानग्यांवर होणारे अतिरेकी हल्ले असोत. सशक्त सुरक्षा यंत्रणा ही प्रत्येक देशाची
मूलभूत गरज असते. सुरक्षा यंत्रणा हा देशाच्या विकसनशीलतेचा पाया असतो. हा पाया जर
मजबूत असेल तर जगात त्या देशाचे अस्तित्व टिकून राहते किंबहुना ते आणखी उजळून
निघते. सुरक्षा यंत्रणेच्या भरवशावरच तर देशाची युद्धनीती अवलंबून असते. जे देश
स्वत:चे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत, त्यांच्याकडून दुसऱ्या देशांनी नाहक अपेक्षा
ठेवू नयेत.
एकीकडे अमेरिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर
बोट दाखवताना आपला भारत देश आपण किती सुरक्षित ठेवला आहे? याकडेही
पाहायला हवे. गोष्ट जर राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षा यंत्रणेची असेल तर त्यात हयगय
करून चालणार नाही. यूट्यूबसारख्या जगभरात पसरलेल्या प्रभावशाली माध्यमांद्वारे
आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेची बित्तंबातमी मिळते.
मोदींचे अंगरक्षक किती? त्यांच्या अंगरक्षकांजवळ असणारी बुलेटप्रूफ
ब्रिफकेस कशी काम करते? मोदींच्या ताफ्यात किती गाड्या आहेत? यासारख्या
महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती यूट्यूबवर सहज उपलब्ध आहे. या माहितीचा गैरवापरही
केला जाऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
अमेरिकेएवढे विकसित तंत्रज्ञान
आपल्याकडे उपलब्ध असले तरीही त्याचा किमान व योग्य वापर सुरक्षा यंत्रणेत होत
नाही.
आपल्या सैनिकांकडे सुधारित शस्त्रं आली
म्हणजेच देश सुरक्षित झाला, असे होत नाही. कोणत्याही देशाची सुरक्षा ही
जेवढी देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून असते, तेवढीच ती त्या देशातील नागरिकांवरही
अवलंबून असते. नुसतं सुशिक्षित झालो, आयकर भरतो,
स्वच्छतेच्या वाटेने आता पावले उचलू
लागलो आहोत म्हणून सुजाण नागरिक झालो, असे म्हणता येणार नाही. सुजाणतेबरोबर सजगता व
सतर्कतादेखील हवी. अगदी साधी गोष्ट आहे, बसमध्ये लिहिलेले असते की, प्रवासादरम्यान
आपले कान व डोळे उघडे ठेवा. एखादी संशयित वस्तू दिसली, तर
ती पोलिसांच्या ताब्यात द्या. अशी सूचना लोकल ट्रेनमध्येही होत असते पण आपल्यापैकी
खरेच किती जणांचे आसपासच्या गोष्टींकडे लक्ष असते, हे ज्याचे त्याने पाहावे. आपण जर
सतर्कता बाळगली, सावध राहिलो तर काय बिशाद चोऱ्यामाऱ्या, अपहरण
यासारखे गुन्हे करणार्यांची! इथे साधे ट्रेनच्या डब्यात गर्दीत एखाद्याने आपले
पाकीट मारले तरीदेखील आपल्याला कळत नाही एवढे आपण आपल्याच धुंदीत असतो किंवा मग
कानात बोळे घालून आपण आसपासच्या जगाशी काही काळासाठी संपर्क तोडलेला असतो. या
छोट्या गोष्टी असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत. नागरिकांनी जर
सतर्कता बाळगली, तर त्याचा फायदा कायदा व सुव्यवस्थेला होणारच
आहे. देशाच्या सुरक्षेत असेही योगदान देता येईल पण, तरीही सुरक्षा यंत्रणांनीही स्वत:मध्ये
सुधारणा करणे आवश्यक आहे. डोकलामप्रकरणी तणाव वाढत असतानाच चीनशी भारताचे युद्ध
झाले तर भारताची युद्धनीती काय असेल? आपल्याकडे शस्त्रसाठा मुबलक प्रमाणात आहे का? याचे
तर्कवितर्क प्रसारमाध्यमांकडून टीव्हीवरून जगभरात दाखवले जात होते. थोडक्यात काय
अमेरिकेसारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते. तेव्हा सुरक्षा यंत्रणेत सुधारणा
करून एक सुजाण नागरिक म्हणून आपणही सावध राहायला हवं!
No comments:
Post a Comment