हेच आजवर या देशात चालत आलं, आता ते उघड होऊ लागल्यानेच ही सारी चुळबुळ सुरू झाली आहे.
“कायदेशीर निर्णयाने समाजात शांती, सुस्थिरता आणि समानता येण्याऐवजी त्या स्थानावर अशांतता, अस्थिरता आणि भेदांची निर्मिती झाली.” या मताचा आणि निरीक्षणाचा प्रत्यय आता केरळ आणि केरळसह दक्षिण भारतात येताना दिसतो आहे. स्वामी अय्यप्पा यांचं मंदिर, जे शबरीमला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे, त्या मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. शबरीमला मंदिरात आता १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनाही प्रवेश घेता येईल, असा हा निर्णय. या निर्णयानंतर सध्या सामाजिक-सांस्कृतिक आणि पर्यायाने राजकीय वर्तुळात एकच वादळ निर्माण झालं आहे. वरकरणी परंपरावादी विरुद्ध सुधारणावादी अशा दिसणाऱ्या या वादात प्रत्यक्षात सुधारणेच्या नावाखाली अराजकाला चालना देऊ इच्छिणारे तथाकथित पुरोगामी घुसले असल्याचं स्पष्टपणे दिसत असून याचे परिणाम रेहाना फातिमा आणि संबंधित टोळक्याच्या रूपाने आज आपल्यासमोर आहेत. आता शबरीमलाच्या या एकूण विषयावर काही मतप्रदर्शन करण्यापूर्वी आधी मूळ विषय समजून घेणं आवश्यक ठरतं. स्वामी अय्यप्पा यांचं शबरीमला हे काही एकमेव मंदिर नाही. केरळमध्ये अशी अनेक मंदिरे आहेत आणि यापैकी कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेशबंदी नाही. मग केवळ याच मंदिरात ती का आहे? यामागे आख्यायिका अशी की, स्वामी अय्यप्पा हे महिषी नामक स्त्री असुराशी लढले आणि तिचा नाश केला. त्यावेळेस ही महिषी तिच्या पूर्वजन्मीच्या शापातून मुक्त झाली आणि तिच्यातून एक सुंदर देवी प्रकट झाली. या देवीने अय्यप्पांची पत्नी होण्याची इच्छा व्यक्त केली परंतु, अय्यप्पा हे ब्रह्मचारी होते. त्यांनी तिला वचन दिले की, माझे भक्त माझी वाट पाहत आहेत. जेव्हा माझे भक्त शबरीमलात येणे बंद करतील, तेव्हा मी जरूर विवाह करेन. या आख्यायिकेनुसार ही देवी अय्यपांच्या मंदिरापाशी त्यांची वाट पाहत शतकानुशतके उभी आहे आणि तिने अय्यप्पांच्या मंदिरात प्रवेश केलेला नाही. शबरीमला मुख्य मंदिराशेजारी तिचेही मंदिर आहे. स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, ही भाविकांची श्रद्धा असल्याने आणि त्या देवीच्या प्रेमाचाही मान म्हणून स्त्रिया अय्यप्पांच्या मंदिरात प्रवेश करत नाहीत. आता ही एका आख्यायिकेच्या आणि तिला मानणाऱ्या हजारो-लाखो भक्तांच्या श्रद्धेतून निर्माण झालेली एक परंपरा आहे. आज देशात हिंदूंची जवळपास २५ लाख मंदिरे आहेत. यामध्ये अशा काही श्रद्धा असलेली मोजकी ४-५ मंदिरे आहेत, जिथे स्त्रियांना प्रवेश नाही आणि दुसरीकडे अशीही काही मंदिरे आहेत, जिथे पुरुषांनाही प्रवेश नाही.
याचा अर्थ प्रत्येक रूढी आणि परंपरेचा केवळ पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणून जसाच्या तसा स्वीकार करायचाच, असा होतो का? तर निश्चितच नाही. ज्या परंपरा कालबाह्य झाल्या किंवा ज्यातून मानवी हक्कांचे, मूल्यांचे हनन होते, असे लक्षात आले, त्या परंपरांचे जोखड फेकून देण्याचा समंजसपणा हिंदू समाज नेहमीच दाखवत आला आहे. अस्पृश्यता, बालविवाह, सतीप्रथा, केशवपन आणि अशा कितीतरी परंपरांना हिंदू समाजाने केव्हाच तिलांजली दिली. कधी स्वेच्छेने कधी कायद्याच्या बडग्याखाली. काही प्रतिगामी वृत्तींनी या सुधारणांना विरोध केला परंतु, त्यांच्यासमोर उभे राहणारे, लढणारे सुधारकदेखील या समाजात जन्माला आले. त्याचे परिणाम आज समोर आहेत. त्यामुळे रूढी-परंपरा या वेळोवेळी काळाच्या कसोटीवर तपासल्या जायला हव्यात, आणि त्या आज अनुकरणीय आहेत किंवा नाही, याचं मूल्यमापन हे व्हायलाच हवं. परंतु, म्हणून शबरीमला मंदिराच्या बाबतीतही असेच एकांगी ठोकताळे लावून कसं चालेल? जर हजारो, लाखो सुशिक्षित महिला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरत असतील, तर त्याचा अर्थ कसा लावायचा? उत्तर सोपं आहे. मुळात हिंदुत्व हे प्रवाही आहे, सहिष्णू आहे. नास्तिकता मांडणाऱ्या चार्वाकाला इथे ऋषी मानलं गेलं आणि मंदिरांच्या पायऱ्यांवर बसून परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत वादविवादही इथे झाले. त्यामुळे सुधारणा आणि प्रगतीसाठी हिंदू समाज कालही लवचिक होता, आजही आहे आणि उद्याही राहील, याबाबत शंका असण्याचे काही कारण नाही. परंतु, हे प्रश्न चर्चेने, सामोपचाराने सोडवणं शक्य नाही का? सरसंघचालकांनी याबाबत उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच रास्त आहेत. हिंदू समाजाच्या श्रद्धांवरच असे वारंवार आणि विनासंकोच आघात का केले जातात? असा प्रश्न विचारत हे असे प्रश्न समाजमनात उठतात आणि असंतोषाची स्थिती तयार होत जाते आणि ही स्थिती समाजजीवनाचे स्वास्थ्य आणि शांतीसाठी अजिबात चांगली नसल्याचं सरसंघचालक म्हणाले. त्यांचं हे मत आज प्रत्यक्षात येताना दिसतंही आहे. शबरीमलामध्ये महिलांचा प्रवेश हा कसा महिलांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे, हे हिरीरीने सांगत या विषयात तमाम तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी, बुद्धिवादी, स्त्रीमुक्तीवादी इ. सारे सक्रिय झाले. मध्यंतरी काही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला आणि शक्य तेवढं वातावरण चिघळत राहील, याची काळजी घेतली. विशेष म्हणजे, यामध्ये रेहाना फातिमा नामक एक मुस्लीम सामाजिक कार्यकर्ती (?) देखील आघाडीवर होती. त्याहून विशेष म्हणजे, स्वतःला नास्तिक म्हणविणारेही मंदिरप्रवेश करून अय्यप्पांच्या दर्शनासाठी आग्रही झाले.
मुस्लीम महिलांना हिंदू मंदिरात प्रवेशाची आणि नास्तिकांना देवदर्शनाची इतकी आस लागली असेल, तर त्यात वाईट काहीच नाही. परंतु,तिहेरी तलाकविरोधी विधेयक मांडलं जात होतं, तेव्हा या कथित पुरोगामी मुस्लीम महिला कुठे होत्या? शबरीमलात तर केवळ महिलांना (१० ते ५० वर्षे वयोगटातील) प्रवेश मिळत नाही, तेही बहुसंख्य महिलांनी तशी श्रद्धा स्वीकारली आहे म्हणून. परंतु, तिहेरी तलाक ही प्रथा तर मानवतेलाच काळिमा फासणारी. तिच्याविरोधात किती रेहाना फातिमा उभ्या राहिल्या, लढल्या? बुरखा पद्धत आणि अशा असंख्य प्रथा-परंपरा आजही मुस्लीम समाजात कायम आहेत. मुस्लिमांच्या किती दर्गे आणि मशिदींमध्ये महिला प्रवेश करू शकतात आणि प्रार्थना किंवा उत्सव साजरे करू शकतात? कुणा मुस्लीम सामाजिक कार्यकर्ता किंवा पुरोगामी विचारवंताला हा प्रश्न पडला का? पडला असेल तर त्यासाठी त्यांनी काय केलं? उत्तर हेच मिळतं, की काही सन्माननीय अपवाद वगळता अशा बहुतेकांनी काहीही केलं नाही. ही सर्व टोळकी मूग गिळून गप्प बसली. शबरीमलाच्या बाबतीत मात्र सर्वांची तोंडं लगेचच उघडली. कारण, त्यामध्ये समाजामध्ये दुभंग निर्माण करून,अराजक माजवून, स्वतःचे विकृत मनसुबे पूर्ण करण्याची संधी या मंडळींना दिसली. स्त्रीमुक्ती वगैरे वरवर दाखविण्याचा मुद्दा आणि त्या बुरख्याआड खरा चेहरा अराजकतेचा. हेच आजवर या देशात चालत आलं, आता ते उघड होऊ लागल्यानेच ही सारी चुळबुळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या रेहाना फातिमाला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करून, मुस्लीम धर्मसंस्थांनी आणखी वरकड केली. आता याला घरचा आहेर म्हणावं का अजून काही, हे इतक्यात सांगता येणार नाही. कारण या संस्थाही काही धुतल्या तांदळाप्रमाणे नव्हेतच. परंतु, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मुस्लीम धर्मसंस्थेने एका मुस्लीम महिलेला बहिष्कृत करणं, ही गोष्ट तशी विरळाच. त्यामुळे या साऱ्या वादंगाच्या निमित्ताने या कथित पुरोगामी, स्त्रीमुक्तीवादी कंपूचा दांभिक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, हे स्पष्टच आहे. तो पुढेही होत राहीलच. दुसरीकडे हिंदू समाजही आपापसांतील हे भेदाभेद, वादविवाद मागे टाकून सुधारणेच्या वाटेने पुढे जात राहील, यातही काही शंका नाही. त्यासाठी हिंदुत्व नक्कीच सक्षम आहे. परंतु, अशा एखाद्या अटीतटीच्या वेळी समाजातील काही शक्ती या प्रश्न सोडविण्याऐवजी चिघळविण्यासाठीच कशा सक्रिय होतात आणि समाजाचं कसं दूरगामी नुकसान करतात, याचाच एक धडा शबरीमलाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा मिळतो आहे
No comments:
Post a Comment