By
shankar.pawar | Publish Date: Oct 13 2018
काश्मिरात नुकत्याच झालेल्या चकमकीमध्ये मन्नन वानी नावाचा हिजबुल
कमांडर मारला गेला आहे. त्यानंतर जुनेच नाटक नव्याने सुरू झाले आहे. दोन-तीन
वर्षांपूर्वी असाच बुरहान वानी नावाचा जिहादी मारला गेला होता. तेव्हाही एका
ठराविक गटाने त्याचे उदात्तीकरण सुरू केलेले होते. एका सामान्य प्राथमिक शिक्षकाचा
हुशार मुलगा म्हणून टाहो फोडला होता. अलीकडे नक्षली हिंसाचाराचे समर्थन करणारा एक
बुद्धिवादी वर्ग भारतात उदयास आला आहे. हळूहळू त्यांच्याकडून जिहादी दहशतवादाचेही
समर्थन सुरू झाले आहे. त्याचेच पडसाद दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात उमटले होते.
संसदेवरच्या हल्ल्यातला गुन्हेगार अफजल गुरू याच्याविषयीदेखील सहानुभूती व्यक्त
करणारे कार्यक्रम विद्यापीठात साजरे केले जात होते. आरंभी मोठ्या प्रमाणात
त्याविरोधात प्रतिक्रियाही उमटल्या; पण अशा लहानसहान गोष्टींतून त्या विषयांचे गांभीर्य कमी केले जात
असते. तेवढ्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात. त्यामागे एक स्पष्ट हेतू दडलेला
असतो.
सामान्य जनतेच्या मनात जी राष्ट्रभावना असते, ती सैल करून टाकणे हे त्यातले उद्दिष्ट असते. अशा भावना दुबळ्या
होत जातील, तितक्या एखाद्या राष्ट्राच्या
सुरक्षा विषयक जाणिवाही सैल होऊन जात असतात. गुरुवारच्या चकमकीतही एका बाजूने
कोंडीत पकडलेल्या जिहादींशी भारतीय जवान लढत होते आणि दुसरीकडे त्यापैकीच काहींना
मागल्या बाजूने होणार्या दगडफेकीचाही सामना करावा लागत होता; पण हातात हत्यार असूनही हे जवान दगडफेक्यांना शस्त्राने उत्तर देत
नव्हते. संयम त्याला म्हणतात. हाती हत्यार आहे, तरीही संयमाने शत्रू व आपला यात फरक करण्याची ती परमावधी आहे.
वास्तवात हे दगडफेके देशद्रोह्यांना वा शत्रूला वाचवण्यासाठी हल्ला करत होते.
म्हणजे, तेही शत्रूचे हस्तक होते; पण त्यांच्यावर जवानांनी गोळ्या झाडल्या नाहीत.
उलट, त्यांचे दगड अंगावर घेत शत्रूशी
दोन हात केले. तर, कौतुक कोणाचे करायचे? त्या संयमी भारतीय जवानांचे, की त्यांच्यावर समोरून गोळ्या घालणार्या ‘हिजबुल’च्या वानीचे? की त्यांच्यावर मागून दगड मारणार्यांचे? कुठे तरी बुद्धीचे तारतम्य असायला हवे ना? ते ज्यांनी गमावले आहे, त्यांना कितीही शिकलेले असले म्हणून बुद्धिमान समजणेच चुकीचे आहे.
म्हणूनच, असल्या कुणाचेही कुठलेही युक्तिवाद
ऐकण्याची गरज नाही; पण विविध वाहिन्यांवर असले
दिवाळखोर बुद्धिमान चर्चा करत होते आणि एका हुशार मुलाला शिक्षण सोडून हत्यार हाती
का घ्यावे लागले, त्याचे समर्थन करत होते. हा गनिमी
कावा झालेला आहे. त्या हुशार मुलांची माथी भडकवायची आणि त्यांना हाती हत्यार घेऊन
सैन्याशी लढायला पुढे करायचे. दुसरीकडे, ज्या कायद्याच्या राज्याला झुगारण्याचा उद्देश आहे, त्याचाच आधार घेऊन आपली कातडी वाचवायची.
कुणा एका विचारवंताने म्हटलेले आहे, की लोकशाही ही भयंकर निकृष्ट राज्यव्यवस्था आहे; पण त्यातल्या त्यात तीच सुसह्य व्यवस्था असल्याने मान्य करणेही भाग
आहे. त्यातला आशय असा, की अन्य व्यवस्था आपल्या
विरोधातला शब्दही ऐकून घेत नसतात. जरा कुठे प्रतिकूल स्वर उमटला, तर चिरडून टाकला जातो. लोकशाहीत मात्र सत्तेच्या विरोधातले सर्व
टोकाचे आवाज सत्ताधार्याला निमूट ऐकून घ्यावे लागतात. त्या विरोधातल्या आवाजालाही
कायदा संरक्षण देत असतो. काश्मिरात हिंसा माजलेली आहे आणि ती हिंसा करणार्यांनाही
कायदाच सुरक्षा देतो. उलट, कायद्याची अंमलबजावणी करणार्या
पोलिस व लष्कराला मात्र कायदा तितके संरक्षण देत नाही. म्हणून, दगडफेक्यांमुळे जखमी होत जवानांना लढावे लागत असते; पण अशा दंगलखोरांवर हत्यार उपसता येत नाही. आता त्याच्याही पुढली
पायरी गाठली गेली आहे. अशा हिंसाचार व घातपाती कृत्यांना सहानुभूती मिळवण्यासाठी
त्यांच्या पापाचे उदात्तीकरण सुरू झालेले आहे, मन्नन वानी हा हुशार, बुद्धिमान मुलगा होता, तो मारला गेला; पण हा
बुद्धिमान मुलगा अभ्यास करताना वा शैक्षणिक कार्य करताना मारला गेलेला नाही.
पुस्तके-ग्रंथ व कॉलेज सोडून तो शस्त्राने दहशत माजवत होता, त्यात मारला गेला आहे. तेव्हा त्याच्या कृतीकडे बघायला हवे. कोण
कितीही मोठा हुशार, बुद्धिमान वा उच्चपदस्थ असला, म्हणून कायदा मोडण्याचा अधिकार त्याला मिळत नसतो.
सुरक्षेच्या कामात गुंतलेल्या बड्या पोलिस अधिकार्याच्या हाती
हत्यार असते आणि प्रसंगी आपल्या संपूर्ण पथकाला हत्यार वापरण्याचे आदेशही देण्याचे
अधिकार असतात; पण ते बेछूटपणे वापरले तर
त्याच्या अधिकाराकडे बघितले जात नाही, तर कृत्याकडे बघितले जात असते. तसेच इथे मन्नन वानी हुशार
असण्याचा काहीही संबंध नाही. तो देशद्रोहाचे व हिंसाचाराचे कृत्य करताना मारला
गेला आहे. त्याच्या पापाचे कुठल्याही कारणास्तव उदात्तीकरण होऊ शकत नाही. तो मारला
जाणे अपरिहार्य होते आणि त्याला मारणार्याने केले ते पुण्यच आहे. कारण, अनेक सामान्य पोलिस, जवान व नागरिकांच्या जिवाला हा हुशार मुलगा एक धोका बनलेला होता.
अशा पापाचे उदात्तीकरण करणेही म्हणूनच आता गुन्हा ठरवणे भाग झाले आहे. तसे केले
नाही, तर दिवसेंदिवस ही समस्या बोकाळत
जाणार आहे. त्या उदात्तीकरणातून जवान व पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होणार आहे. तसे
झाले तर, कायदा कोर्टापुरता उरेल आणि त्याच्याही
आदेशाचा अंमल करायला पोलिसांत धैर्य शिल्लक उरणार नाही. म्हणूनच, असे उदात्तीकरण करणार्यांना कोर्टाने झापले पाहिजे आणि असली
प्रवृत्ती दिसेल तिथे ठेचून काढली पाहिजे. मग तो शहरी नक्षलवाद असो किंवा ‘हिजबुल,’ ‘जैश’चा जिहादी दहशतवाद असो. उदात्तीकरण करणारे हे अस्तनीतले निखारे
असतात
आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे
ब्रिगेडिअर हेमंत महाजन
माझ्या
या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे.
Available with Madhavi
Prakashan,Dattakuti,1416,Sadashiv
Peth,Pune-411030,Maharashtra,Tele-020-24474762,020-24475372,MOB-09325097494.E
Mail-madhavipublisher@gmail.com
No comments:
Post a Comment