२०१५स्मृती कारगिल युद्धाच्या
जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले. २६ जुलै रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. लढाईत शस्त्र आणि सैनिक हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र कोणतेही शस्त्र चालविण्याकरीता असणारा सैनिक सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो आणि सैनिक सदैव सतर्क असतील तर देश सुरक्षित राहतो. म्हणूनच भारतीय नागरिकांनी आणि सरकाने आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे.
कारगिलमधे घुसखोरी पाकिस्तानी सैन्याची
२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १६ वर्षे पूर्ण होतील. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले. पाकिस्तानी सैन्य आपल्या सिमेच्या आत घुसले आहे हे कळायला सुमारे तीन महिने लागले.
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस
भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. सुरूवातीला हे आमचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला, मात्र हे खरे नव्हते. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंटड्ढीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
५४३ अधिकारी आणि जवान युद्धात शहीद
जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. या युद्धात सुरवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठपर्यंत घुसखोरी केली आहे हे शोधून काढण्याची कामगीरी सोपविण्यात आली. आपल्या तुकडीबरोबर गस्तीसाठी गेले असता पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. यात लेफ्टनंट सौरभ कालिया यांच्यासह काही भारतीय जवान पकडले गेले. त्यानंतर त्यांना अतिशय क्रूरपणे मारण्यात आले. लेफ्टनंट कालिया यांचे वडील आजही त्यांच्या मारेकर्याना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
कारगिल युद्धातला दुसरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा हे होते. सिंहाइतका शुर असल्याने बत्रा यांना त्यांचे सैनिक शेरशहा म्हणत असत. कारगिल युद्धाच्या केवळ दीड वर्षे आधी भारतीय सैन्यात सामिल झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना पुढे काय असे विचारले असता, ‘जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही, ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर हे वाक्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर पॉइंट ५१४०च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट ५१४० जिंकला, मात्र त्यात ते शहिद झाले. युध्दाआधी, मी ‘भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. ते खरे ठरले. या युद्धातले सगळ्यात पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.
युद्धभूमीला भेट द्या
त्यानंतर लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते. विजयन यांनी ‘थ्री पिंपल्स या १७ हजार फुट उंचीवर असलेल्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला; पाकिस्तानचे १५० सैनिक असलेल्या या शिखरावर चढण्यासाठी थापर यांनी तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच सर्वांत अवघड कड्याची निवड केली होती. विजयन यांच्या शौर्याबद्दल त्यांना विरचक्र प्रदान करण्यात आले. मात्र त्यात त्यांना विरगती प्राप्त झाली. विजयन यांनी मोहिमेवर जाण्याआधी आपल्या कुटुंबियांसाठी एक पत्र लिहले होते. मी परत आलो नाही तरच हे पत्र माझ्या कुटुंबियांना पाठवावे असे त्यांनी सांगितले होते. या पत्रात त्यांनी आपले वडील निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर यांना युद्ध संपल्यानंतर आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये लढलो हे पाहण्यासाठी या युद्धभूमीला भेट द्या असे म्हटले होते. ७८ वर्षे वयाचे निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर हे दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल येथील १८ हजार फुटांवरच्या विरभूमीवर जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते पत्र अजरामर झाले आहे.
परमविर कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, शिपाई संजय कुमार यांची विरगाथा
कॅप्टन मनोज पांडे यांनी ‘खालुबर नावाच्या शिखरावर हल्ला करून ते शिखर पाकिस्तानकडून परत मिळवले. त्यात कॅप्टन मनोज पांडे यांना विरगती प्राप्त झाले. त्यावेळी आपल्या तुकडीतील सैन्याला उद्देशून शेवटचे दोन शब्द काढले होते. ते शब्द ‘ना छोडनू असे होते. नेपाळी भाषेतील या शब्दांचा अर्थ ‘दुश्मनांना सोडू नका असा होता. २४ वर्षांच्या मनोज पांडे यांना मरणोपरांत ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर ‘टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी ‘टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १३ जॅक रिफच्या सिपाही संजय कुमार यांना ‘पॉईंट ४८७७वर जाण्याचा आदेश मिळाला. संजयकुमार यांनी पाकिस्तानी सैन्यावरती जोरदार हल्ला करून तीन जवानांना यमसदनी धाडले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.
या युद्धात अनेक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. त्यात मेजर डी. पी. सिंग यांना गंभीर जखमी झाल्यानंतर आपला एक पाय गमवावा लागला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते आजही कृत्रिम पाय लावून धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असतात. ते भारताचे अग्रणी ‘ब्लेड रनर म्हणून ओळखले जातात. गंभीर जखमी झाल्यानंतर अवयव गमावलेले अनेक जवान आहेत. तरीही आपल्या अपंगत्वावर मात करत ते जीवन जगत आहेत.
तरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध
कारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले.
या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. मोठा पराक्रम गाजवल्याने या तुकड्यांचा ‘युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.
पाकिस्तानने घुसखोरी का केली?
पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याला दोन कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सीमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद तोडण्याकरीता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता. दुसरे म्हणजे, सैन्याने जम्मु काश्मिरमध्ये चांगले काम केल्यामुळे तेथील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे या दहशतवादाला पुन्हा पुनरजिवीत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष एकवटण्यास भाग पाडले. कारगिलच्या युद्धानंतर या भागात तीन ते चार हजार सैन्य असणार्या या भागात दोन तुकड्या म्हणजेच १५ ते २० हजार सैन्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तेवढेच सैनिक काश्मीर खोर्यातून कमी झालेले आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात काश्मीरमधला दहशतवाद मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आता पुन्हा या दहशतवादावर नियंत्रण मिळवले आहे.
कारगिलच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने द्रास भागात एक युद्धस्मारक बांधलेले आहे. कारगिलला भेट देणारे अनेक पर्यटक या युद्धस्मारकाला भेट देत असतात. तिथे गेल्यानंतर कारगिलचे युद्ध झालेली अनेक शिखरे तेथून दिसतात. त्यामुळे या भागात लढणे किती अवघड असते याची प्रचिती आपल्याला येते. कारगिल युद्धावरती ‘एलओसी कारगिल, ‘स्वर्णगाथा,मिशन फ़त्ते‘ असे अनेक चित्रपट निघाले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.
गरज शूर सैनिक आणि देशप्रेमी नागरिकांचीही
या युद्धात आपले रक्त सांडून आपल्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. लढाईत शस्त्र आणि सैनिक हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र कोणतेही शस्त्र चालविण्याकरीता असणारा सैनिक सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो आणि सैनिक सदैव सतर्क असतील तर देश सुरक्षित राहतो. म्हणूनच भारतीय नागरिकांनी आणि सरकाने आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला धोका निर्माण झाल्यावरच देव आणि सैनिक यांची नेहमीच आठवण येते. मात्र आलेले संकट संपल्यावर आपण या दोघांनाही विसरतो. जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही सुरक्षित राहू शकत नाही आणि महासत्ताही बनू शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली. शूरांतील शूर लोकांच्या आकाशगंगेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो.
आज २६ जुलै. कारगिल विजय दिवस. बरोबर १७ वर्षांपूर्वी ह्याच दिवशी भारताने निर्णायक लढाई करून द्रास आणि कारगिल ह्या जम्मू काश्मीरमधल्या दुर्गम भागातली महत्वाची शिखरे पाकिस्तानी सैन्याकडून परत जिंकून घेतली होती. भारत आणि पाकिस्तान मध्ये जवळ जवळ साठ दिवस चाललेले कारगिल युद्ध ह्या दिवशी समाप्त झाले.
१९९९च्या मे महिन्यात पाकिस्तानच्या ISI ह्या संघटनेच्या आशिर्वादाने पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल मध्ये भारताच्या हद्दीत घुसून काही भारतीय ठाण्यांवर कब्जा केला. स्थानिक धनगरांकडून ही बातमी भारतीय सैनिकांना समजली. जिहादी दहशतवाद्यांची किरकोळ घुसखोरी असेल ह्या समजुतीने कॅप्टन सौरभ कालिया ह्या तरुण सैन्याधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंगला गेलेली भारतीय सैन्याची तुकडी शत्रूच्या हातात अलगद सापडली. सगळे आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवून पाकिस्तानी सैन्याने पाच भारतीय सैनिकांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार मारले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पठाणकोटच्या हवाईदलाच्या बेसवरून कारगिलमध्ये लढाऊ विमाने पाठवण्यात आली, पण खराब हवामान आणि कारगिल-द्रासच्या अत्यंत दुर्गम डोंगररांगा ह्यामुळे भारतीय हवाईदलाला दोन विमाने आणि एक हेलिकॉप्टर गमवावे लागले. पाकिस्तानी हवाई हद्दीत इमरजेंसी लॅण्डिंग केलेले फ्लाईट लेफ्टनंट नचिकेत युद्धबंदी झाले. त्यांच्या बरोबर असलेल्या स्क्वा. लीडर अजय शुक्ल ह्यांनीही इमरजेंसी लॅण्डिंग केले होते पण पाकिस्तानी सैनिकांनी त्यांनाही हाल-हाल करून ठार मारले.
ह्यामुळे चिडलेल्या भारतीय सैनिकांनी नेटाने चढाई करून पाकिस्तानी सैन्याने काबीज केलेली सर्व ठाणी परत जिंकून घेतली. १३ जम्मू काश्मीर रायफल्स, गोरखा रेजिमेंट, जाट रेजिमेंट आणि १८ ग्रेनेडीयर्स ह्या भारतीय सैन्याच्या रेजिमेंटनी ह्या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवले. १३ जम्मू काश्मीर रायफल्सच्या शूर सैनिकांनी हातघाईच्या लढाईत जिंकून घेतलेले टायगर हिलचे शिखर ही लढाई भारतीय जनतेच्या नित्य स्मरणात राहील.
भारताने हे युद्ध जिंकले खरे पण त्यासाठी कित्येक तरुण भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागले. अत्यंत दुर्गम पर्वतरांगा, कमालीचे प्रतिकूल तापमान, दिवसरात्र चाललेली डोंगरांवरची चढाई ह्या कशाचीही पर्वा न करता भारतीय सैन्य लढले. जागरण झाल्यामुळे डोळ्याखाली खोल खड्डे पडलेला कॅप्टन विक्रम बात्रा हा तरुण सैन्याधिकारी अत्यंत थकलेल्या अवस्थेत देखील हसतमुखाने 'ये दिल मांगे मोर' म्हणताना आख्ख्या देशाने बघितला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना वीरमरण आलं. कॅप्टन बात्रा पुढे परमवीर चक्राचे मानकरी ठरले.
कारगिल युद्ध झाले तेव्हा खासगी प्रसारमाध्यमांनी ही बातमी लाईव्ह कव्हरेज करून लोकांपर्यंत पोचवली. त्यामुळे न्यूज मीडिया मधल्या बऱ्याच लोकांची करियर्स घडली पण कित्येक तरुण सैनिकांना त्यासाठी आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज जवळजवळ १७ वर्षानंतर मीडियामधले हेच लोक टीव्हीवरून काश्मिरी दहशतवाद्यांची भलावण करताना दिसतात.
पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेल्या विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्तानला तर मोजावी लागलीच, पण भारतीय सैन्याचं देखील खूप नुकसान झालं. आपण ही लढाई निर्णायक रित्या जिंकली खरी पण फार मोठी किंमत देऊन. आपल्या सैनिकांनी केलेल्या अपार त्यागाची कदर म्हणून आपण हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो
No comments:
Post a Comment