अरण्यरुदन’ ठरू नये...
गुरुवारच्या रात्री फ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने ८४ जणांचा बळी गेला. यात प्रामुख्याने लहान मुले असल्याचे समजते. नाइस शहरात बॅस्टाईल दिन साजरा करीत असलेल्या गर्दीत एका माथेफिरूने वेगात ट्रक घुसविला आणि लोकांचा बळी घेतला. ट्रकचालक मूळ ट्युनिशिया देशाचा नागरिक असल्याचे समजते. राष्ट्रपतींनी देशात आणिबाणी जाहीर केली आहे. युरोपात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या फ्रान्समध्ये आहे आणि त्याचेच फळ आता फ्रान्स भोगत आहे. उदार आणि मानवतेच्या विचारांचा प्रतीक असलेल्या फ्रान्सला या भूमिकेचा पुनर्विचार करणे भाग आहे. ब्रिटनने असा विचार नुकताच केला आणि युरोपीय समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मध्य-पूर्वेतील हिंसाचारामुळे कोट्यवधी मुस्लिम जनता युरोपात शरणार्थी म्हणून घुसत होती. युरोपीय समूहाच्या धोरणामुळे या गटातील प्रत्येक देशाला हे शरणार्थी सामावून घेणे बंधनकारक होते. ब्रिटनने ते नाकारले आणि या समूहातून बाहेर पडणे स्वीकारले. जिथे जिथे मुस्लिम समाज गेला तिथे तिथे त्याने उपद्रवच केला आहे. त्यातून रशिया आणि चीनसारखे कम्युनिस्ट देशदेखील सुटलेले नाहीत. तरीही अजूनही आपणच काय, सारे जग मुस्लिमांच्या या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतच नाही, हे दुर्दैव आहे. सार्या युरोपवर ज्या ख्रिश्चन संप्रदायाचा प्रभाव आहे, त्या ख्रिश्चन संप्रदायानेदेखील काही शतकांपूर्वी हेच केले होते, जे आज मुस्लिम करू इच्छित आहेत. या प्रदेशातील मूळ पूजापद्धती आणि श्रद्धांना ध्वस्त करून त्यांना येशू ख्रिस्ताला शरण येण्यास भाग पाडण्यात आले. आफ्रिकेतही हेच झाले. हे करताना ख्रिश्चनांनी कुठलाही विधिनिषेध पाळला नाही. ख्रिश्चन नसलेल्या समाजाला दयावान येशू ख्रिस्ताच्या दावणीला बांधण्यासाठी जे अमानुष प्रकार झालेत, ते अंगावर शहारे आणणारे आहेत. आज ख्रिश्चनांच्या तोडीसतोड असलेल्या मुस्लिमांशी त्यांची गाठ पडत आहे. इस्लाम हा शांततेचा मार्ग दाखवितो, दहशतवाद्यांना धर्म नसतो, यांसारखे सेक्युलर ढोल आपल्या भारतातच बडविले जातात आणि येथील समाज, सरकार, न्यायव्यवस्था माना डोलवितात. जगात असे दिसत नाही. आठव्या शतकात स्पेनला पादाक्रांत केल्यानंतर मुस्लिमांनी तेथील यच्चयावत चर्चेस पाडून तिथे, त्याच जागी मशिदी बांधल्या होत्या. तेराव्या शतकात ख्रिश्चनांनी स्पेनवर आपले अधिराज्य स्थापन केले आणि एकूण एक मशिदी पाडून तिथे पूर्ववत चर्च बांधलेत. मुस्लिमांना हीच भाषा समजते. ज्यांना खेटराची भाषा समजते त्यांना त्याच भाषेत समजावले पाहिजे. हे जेव्हा होईल, तेव्हा जगातील हा मुस्लिम दहशतवाद आटोक्यात येईल. परंतु, अजूनही जग या मानसिकतेत आलेले दिसत नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे एक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हा मुद्दा अत्यंत आक्रमकतेने उचललेला आहे. त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. केवळ मुस्लिमांच्या प्रश्नावर ट्रम्प निवडूनही येऊ शकतात, अशी तिथली आजची तरी स्थिती आहे. परंतु, इकडे भारतात मात्र ट्रम्पच्या या रोखठोक भूमिकेने बुद्धिवंत अस्वस्थ झाले आहेत. भारताच्या बौद्धिक संस्थांवर वामपंथी लोकांनी कब्जा केल्यामुळे भारताचे जे नुकसान झाले आहे, ते अपरिमित आहे. आधी या वामपंथीयांनी फाळणीला आणि पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा दिला आणि नंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडून भारताची स्थिती छिन्नविछिन्न करून टाकली. जागतिक स्तरावर जे राजकारण चालते ते स्वार्थी असते आणि त्यात चूक नाही. प्रत्येक देश आपला स्वार्थ बघत असतो. त्याला तुमच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकसमर्थित दहशतवादाचा मुद्दा ज्या ज्या वेळेस उपस्थित केला, त्या वेळी जगाने त्याकडे गांभीर्याने बघितलेच नाही. गंमत म्हणजे, मुस्लिम दहशतवादामुळे सारी पृथ्वी आक्रंदत असतानाही, अजूनही जगाला मुस्लिम दहशतवादाच्या विरोधात नेमकी कुठली भूमिका घेतली पाहिजे, हे ठरविण्यात अपयश आले आहे, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक वेळी अंतर्गत सुरक्षा अधिक कडक, सज्ज करणे, हा जरी एक उपाय असला, तरी दहशतवाद मुळात उत्पन्न कसा आणि कुणामुळे होतो, याचा शोध घेऊन मुळावरच घाव घालणे अभिप्रेत आहे. आपापल्या देशातील मुस्लिमांबाबत नेमकी वस्तुनिष्ठ भूमिका सार्या देशांनी घेतली पाहिजे. मुस्लिम दहशतवाद्यांची समस्या मुस्लिम अल्पसंख्य असलेल्याच देशात फक्त आहे, असेही नाही. त्यामुळे जगातील विचारवंतांनी मुस्लिम नावाच्या संप्रदायाचा सखोल अभ्यास करून जगाला धोरण ठरविण्यासाठी निश्चित असे मार्गदर्शन केले पाहिजे. भारतापुरते बोलायचे झाले, तर पाकिस्तान तर त्याच्या मुळावरच उठला आहे. पाकिस्तान देश आहे की राष्ट्र आहे, हेच कळेनासे झाले आहे. तुम्ही कोण? असा प्रश्न जर एखाद्या पाकी नागरिकास विचारला तर तो गोंधळून जाईल. मूळ पाकिस्तानी असलेले आणि आता कॅनडात स्थायिक झालेले जागतिक स्तरावरचे विचारवंत तारक फतेह ठासून सांगतात की, पाकिस्तान एक राज्य (स्टेट) नाही. पाकिस्तान म्हणजे मनाची एक स्थिती आहे आणि कुठल्याही मनाच्या स्थितीला राष्ट्रीयत्व नसते. केव्हा ना केव्हा तरीपण निश्चितच, पाकिस्तान इतिहासाच्या कचर्याच्या ढिगात सामावलेला असेल. असा पाकिस्तान जेव्हा भारताच्या कुरापती काढतो, तेव्हा उर्वरित जग त्याकडे बाललीला म्हणून दुर्लक्ष करते. हे किती भयानक आहे. युनोच्या वार्षिक सभेत पाकिस्तानच्या राजदूताने जे अकलेचे तारे तोडले, ते अवाक् करणारे आहेत. त्याला भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी जे उत्तर दिले, ते म्हणजे एक झणझणीत झापडच आहे! पाकिस्तान दहशतवाद्यांचे गुणगान करीत असतो आणि इतर देशांचा भूभाग हडपण्यासाठी दहशतवादाचा वापर करीत असतो. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान युनोच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करून जगाला संभ्रमित करीत असतो, याकडेही अकबरुद्दीन यांनी जगाचे लक्ष वेधले. युनोने ज्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे त्यांना पाकिस्तान गौरवाचे स्थान देतो. दहशतवाद हे या देशाचे अधिकृत धोरण झालेले आहे. आणि युनोच्या व्यासपीठावरून आपली ही कृत्ये झाकण्यासाठी मानवी अधिकार व स्वयंनिर्णयाचा हक्क यासारखे मुखवटे घालून भाषण ठोकतो. आम्हा भारतीयांना अकबरुद्दीन यांचे हे तडाखेबंद भाषण खूपच भावले असणार. पाकिस्तानला चांगलेच ठणकावले म्हणून आम्हाला दिलासा मिळाला असेल. आता तरी जागतिक समुदाय पाकिस्तानची कान धरून चांगलीच खरडपट्टी काढणार, असे आम्हाला वाटू शकते. पण, तसले काही घडण्याची एवढ्यात तरी शक्यता नाही. जोपर्यंत भारताची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत नाही, तोपर्यंत जग तुमचे ऐकणार नाही. युनो असो की आणखी कुठलाही जागतिक मंच असो, तिथे भारताने मांडलेली त्याची स्पष्ट भूमिका शेवटी ‘अरुण्यरुदन’च ठरण्याची शक्यता आहे...
No comments:
Post a Comment