Total Pageviews

Monday, 30 May 2016

INDIAS MINISTER NO 1

मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना, विविध प्रकारे या सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन प्रसारमाध्यमे करीत आहेत. या प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये लोकभावनेचे प्रतिबिंब उमटत असते. झी न्यूज या वाहिनीने एक वेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कोणते मंत्री अधिक कार्यक्षम आहेत? कोणी कशी कामगिरी केली आहे? या प्रश्नावर त्यांनी पन्नास निवडक पत्रकारांमधून सर्वेक्षण केले आहे. सरकारच्या कामगिरीबाबत रोज बातम्या आणि विश्लेषण प्रसिद्ध करणारे पत्रकारच अधिक संवेदनशीलपणे या कामगिरीबाबत परीक्षण करू शकतात, असा विचार या वाहिनीने केला आहे. या सर्वेक्षणाचे जे निष्कर्ष आले आहेत, त्यामध्ये दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक अव्वल आला आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाला त्यांना ही एक चांगली भेटच जणू मिळाली आहे. अर्थात, ही काही आपोआप मिळालेली भेट नाही, तर गडकरी यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि आपल्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा जो अनुभव सतत दिला आहे त्याचा हा परिणाम आहे. अगदी महाराष्ट्रात त्यांना जेव्हा पहिल्यांदा युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली होती, तेव्हापासून त्यांनी विकासाचा त्यांचा झपाटा कसा आहे, याचा परिचय आपल्या कामातून दिला. प्राप्त परिस्थितीतून चांगले घडविण्याची त्यांची विशाल दृष्टी कशी आहे, याचेही दर्शन त्या काळात घडले. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हे एकच उदाहरण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्यास पुरेसे आहे. अवघ्या महाराष्ट्राला या रस्त्यामुळे एक वेग आला आहे, याचा अनुभव रोज येत असतो. मुंबईसह सर्व प्रमुख शहरांतील उड्डाणपूल ही नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीची देणगी आहे, हे आज तीव्रतेने लक्षात येते. त्याच बरोबर आज महाराष्ट्रात जे रस्त्यांचे जाळे गावोगावी पसरले आहे त्यामागे गडकरींचीच योजनाबद्ध कामाची पद्धती आहे, हे कोणीही कबूल करेल. गडकरींना ‘रोडकरी’ म्हणण्यापर्यंत त्यांच्या कामाचा ठसा मराठी मनावर उमटलेला आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मर्म जाणणार्‍या नेत्याने गडकरी यांना आपली पसंती मोकळ्या मनाने देऊन टाकली होती. रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या असतात. विकासाचा मार्ग हा वेगवान रस्त्यांवरूनच जात असतो. हे लक्षात घेऊन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचे जे जे काम त्यांच्याकडे आले त्या त्या संधीचे सोने केले आहे. युपीए सरकारच्या काळात रस्तेनिर्मितीचा जो वेग होता तो केविलवाणा होता. २०१३ साली प्रतिदिन ७ किमी हायवे बनविण्याचा वेग होता तो २०१४ मध्ये अवघ्या दोन किमीवर आला होता. गडकरी या खात्याचे मंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्दिष्टच पंधरा पट म्हणजे प्रतिदिन ३० किमीचे ठेवले आणि आपल्या अथक प्रयत्नातून, व्यापक दृष्टिकोनातून प्रतिदिन २० ते २१ किमी महामार्ग बनविण्याचा वेग त्यांनी ठेवला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘‘अनेक दिवसांपासून थांबलेल्या सडक योजनांच्या समस्या दूर करून त्यांना गतीने कार्यान्वित करण्याकडे त्यांचा प्रयत्न आहे.’’ हे केवळ मंत्र्यांनी लोकांना बरे वाटावे यासाठी वापरण्याचे सुविचारवजा वाक्य नाही, तर यामागे गडकरी यांचे नियोजन आहे. आपल्यासमोर असलेल्या कामाला गती देण्यासाठी कामाचा दर्जा, कामाची भव्यता राखण्याचा विचार करूनच ते निर्णय घेतात. तसे नियोजन करतात. त्यामुळे रस्त्यांच्या योजनांना गती देण्याचा विचार त्यांनी तसा मोठ्या प्रमाणावर केला आहे. त्यासाठी ज्या रस्त्यांच्या योजना केवळ निधीसाठी रखडल्या त्यांना कशाप्रकारे निधी उपलब्ध होईल, याचा त्यांनी विचार केला, कंत्राटे घेऊन काम करणार्‍या कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे जी कामे रखडली होती त्या कंपन्यांबरोबरचे करार कठोरपणे रद्द करून टाकले. याचा परिणाम असा झाला आहे की, दिल्ली-जयपूर, नागपूर- जबलपूर, मुजफ्ङ्गरनगर-डेहराडून महामार्ग अशा तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांच्या रखडलेल्या प्रकल्पांपैकी नव्वद टक्के प्रकल्प पुन्हा गतीने कार्यान्वित झाले आहेत. कोणत्याही कामाचा अभियांत्रिकी दृष्टी ठेवून विचार करणे, व्यापकता लक्षात घेऊन सर्वंकष नियोजन करणे, केवळ त्या कामापुरता विचार न करता त्याला पूरक, पण परिणामकारकता वाढविणार्‍या उपयुक्त गोष्टींचा त्यासोबतच विचार करणे, ही गडकरी यांच्या चिंतनशीलतेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी रस्त्यांच्या या कामाला गती देत असतानाच आणखी काही विषय त्याला जोडूनच हाती घेतले आहेत. देशभरात पाचशे ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या योजनेवर त्यांनी काम सुरू केले आहे. रस्त्यांच्या विकासाबरोबरच अशा गोष्टी या व्यवहारातील चित्र आमूलाग्र बदलून टाकणार्‍या आहेत. गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतुकीशिवाय जहाज बांधणी मंत्रालयही आहे. या जलवाहतुकीच्या कामात काही विशेष वेगळे काम करण्याला वाव नसतो, असा एक गैरसमज होता, तो गडकरी यांनी दूर करून टाकला आहे. यात गती आणण्यासाठी गडकरी यांनी केलेल्या उपाययोजना, नव्या कल्पना यामुळे गेल्या वर्षभरात बारा मोठी बंदरे आणि शिपिंगच्या सरकारी कंपन्या यांनी तब्बल सहा हजार कोटींचा नङ्गा कमावला आहे. अनेक नव्या कल्पनांनी त्यांनी त्यांना मिळालेल्या विषयात जिवंतपणा आणि गती निर्माण केली आहे. भारतीय जनता पक्षाने अटलजी आणि अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली ‘सही दिशा, स्पष्ट नीती’ अशी एक घोषणा केली होती. या घोषणेचे कृतिशील रूप जर पाहायचे असेल, तर नितीन गडकरी यांची कार्यपद्धती आहे. विकासाची निकोप दृष्टी, नवे अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी, आधी चालत आलेल्या चाकोरीबद्ध पद्धतीला धक्का देऊन गतिशील नवी रचना स्वीकारण्याची ओढ, छोट्या प्रमाणात भीतभीत प्रयोग न करता नीट पारखून मोठ्या प्रमाणातच परिणाम दिसेल अशा पद्धतीने धाडसी कृती करण्याची धडक पद्धती, यामुळे नितीन गडकरी यांच्या कामाला एक प्रचंड वेग आहे. लोकसंग्राहक वृत्तीमुळे त्यांच्या कामाच्या झपाट्याला योग्य अशा प्रकारचे परिणामकारक आणि शिस्तीत काम करणार्‍यांचे एक जाळे त्यांनी तयार केले आहे. कसलेही हितसंबध, कसलेही हेतू कामामध्ये न आणता दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कामाचा आविष्कार करून परिणामकारक विकासाचा ठसा उमटविण्याकडे त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण आणि धडाकेबाज कार्यपद्धतीनेच त्यांना ‘मंत्री नंबर वन’ अशा स्थानावर नेऊन पोहोचविले आहे. निवडक पत्रकारांची ही पसंती सर्वसामान्य जनतेचीही पसंती दर्शविणारी आहे, यात शंकाच नाही!

No comments:

Post a Comment