Total Pageviews

Monday, 23 May 2016

शहीद पांडुरंग गावडे हे बलिदान त्यांच्या घराण्याच्या आणि पथकाच्याही लष्करी परंपरेला साजेसेच होते

शहीद पांडुरंग गावडे हे बलिदान त्यांच्या घराण्याच्या आणि पथकाच्याही लष्करी परंपरेला साजेसेच होते. शहीद पांडुरंग गावडे मूळचे आंबोली मुळवंदवाडी येथील नाईक पांडुरंग महादेव गावडे यांनी शूर नायकाप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ातील ड्रगमुला येथे जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करले. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा आणि नॉर्दर्न कमांड मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी गावडे यांचे युद्धकौशल्य, शौर्य, कसब आणि धडाडीचे कौतुक केले आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या लष्कराच्या पहिल्या पथकाचे ते नेतृत्व करत होते. त्यांच्या शहीद होण्याने देशाने एक कसलेला आणि निष्णात सैनिक गमावला आहे. मूळचे मराठा लाइट इन्फंट्रीचे आणि सध्या ४१ राष्ट्रीय रायफल्स या दहशतवादविरोधी पथकात असलेले गावडे सर्व प्रकारच्या युद्धकौशल्यात आणि तंत्रकौशल्यात पारंगत होते. ते उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच ते संगणक आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात वाकबगार होते. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटूही होते. त्यांच्या जीवनातील अखेरच्या ठरलेल्या या चकमकीतही त्यांनी लष्कराच्या आणि मराठा लाइट इन्फंट्रीच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत आपल्या दलाचे अगदी अग्रभागी राहून नेतृत्व करत नऊ तास झुंज दिली आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र त्यादरम्यान स्फोटकांतील छर्रे (स्प्लिंटर्स) त्यांच्या पायांत आणि डोक्यातही घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने १६८ मिलिटरी हॉस्पिटल आणि नंतर श्रीनगरमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांचे हे बलिदान त्यांच्या घराण्याच्या आणि पथकाच्याही लष्करी परंपरेला साजेसेच होते. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा सैन्यातच सेवा बजावत आले आहेत, त्यापैकी गणपत महादेव गावडे हे पांडुरंगचे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक गावडे हे सध्या धुळे येथे एन. सी. सी.मधून सैन्यात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत ४१ राष्ट्रीय रायफल्सने गमावलेले गावडे हे तिसरे सुपुत्र आहेत. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी मूळचे सातारचे असलेले ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि पॅरा कमांडो कर्नल संतोष महाडिक यांना मनिगाह येथील जंगलात तर १३ फेब्रुवारीला नाशिकच्या बयाले गावचे नाईक शंकर चंद्रभान शिंदे यांना चौकीबलजवळील झुरेशी गावात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. पांडुरंग यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. पत्नी प्रांजलवर या घटनेने आभाळच कोसळले आहे. पांडुरंग यांना प्रज्वल हा पाच वर्षांचा, वेदान्त हा चार महिन्यांचा मुलगा आहे. फेब्रुवारी महिन्यात पांडुरंग हे एक महिन्याच्या रजेवर आले होते. यात त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचा वाढदिवस तर धाकटय़ा मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. हुतात्मा गावडेंचं पुणेकर होण्याचं स्वप्न अपुरंच - पुणे - मुलांच्या शिक्षणासाठी भावाच्या मदतीने पुण्यात जागा घेऊन "त्यांनी‘ टुमदार घरही बांधलं. सुटी मिळताच "ते‘ कुटुंबासमवेत या नव्या घरी राहायला येणार होते... पण, हे स्वप्न सत्यात उतरण्यापूर्वीच सिंधुदुर्गच्या "त्या‘ वीराचे डोळे दहशतवाद्यांशी लढताना मिटले ते कायमचेच. मुलांच्या शिक्षणाचे "त्यांनी‘ पाहिलेलं स्वप्न कदाचित भविष्यात पूर्णही होईल... परंतु स्वप्नपूर्ती पाहण्यासाठी "ते‘ डोळे मात्र नसतील...!! जम्मू-काश्मी.रमधील कुपवाडा जिल्ह्यात जैशे महंमदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत "41 राष्ट्रीय रायफल्स‘चे नायक पांडुरंग गावडे यांना वीरमरण आले. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीचे रहिवासी. येरवड्यातील माजी सैनिक नगरमध्ये सुधा गावडे ही त्यांची बहीण राहते. सैन्यात भरती होण्यासाठी 1999-2000 च्या दरम्यान ते बहिणीकडे राहायला आले होते. पण, त्यांना बेळगावमधून सैन्य भरतीचा कॉल आल्याने ते तिकडे भरतीसाठी गेले. परंतु, पुण्याशी त्यांची नाळ कायम होती. अवघ्या काही वर्षांत त्यांना पुणे हे आपलं दुसरं घर वाटू लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आंबोलीतून पुण्यात राहायला येण्याचे ठरवले होते. पुण्यात राहायचं म्हटलं तर हक्काचे घर हे हवंच. म्हणून त्यांनी घराचा शोध सुरू केला. हा शोध संपला 2013 मध्ये. त्यांनी भावाच्या मदतीने लोहगावमधील साठेवस्तीत एक गुंठा जागा घेतली आणि तिथे दोन मजली टुमदार घर बांधलं. येत्या जून-जुलै महिन्यांत सुटी मिळाल्यानंतर ते कुटुंबासमवेत या नव्या घरी राहायला येणार होते. परंतु, तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. येरवड्यातील शिवसेनेचे सुरेश लाड आणि माजी नगरसेवक सागर माळकर हे गावडे यांचे जवळचे मित्र. माळकर म्हणाले, ""गावडे यांना पुण्याविषयीचे नेहमीच आकर्षण वाटायचे. मुलांना पुण्यात शिकायला आणण्यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे त्यांनी येथे घर बांधले. गेल्या आठवड्यात गावडे यांनी मला फोन केला होता आणि जुलैमध्ये नवीन घरात राहायला येणार असल्याचे कळविले होते.‘‘ जून-जुलैमध्ये सुटीवर आल्यानंतर पुण्यातील घराची वास्तुशांती करण्याबरोबरच मुलांचे बारसेही याच घरी करण्याचे त्यांचे नियोजन होते, असे लाड यांनी सांगितले. परंतु, नियतीच्या मनात काही औरच होते, असे म्हणावे लागेल जम्मू-काश्मीबरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यां शी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले नायक शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांचा दीडवर्षाचा मुलगा ओमने अंत्यसंस्कार केले. शहीद शंकर यांची सहा वर्षाची कन्या वैष्णवी वडील आज येणार म्हणून वाट पाहत होती. पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर चिमुकलीचे डोळे अश्रूंनी डबडबले.

No comments:

Post a Comment