Total Pageviews

Tuesday 31 May 2016

PULGAON AMMUNITION DEPOT FIRE-आगीची कारणमीमांसा आणि धडा-- ब्रिगेडियर हेमंत महाजन

आगीची कारणमीमांसा आणि धडा By pudhari | Publish Date: May 31 2016 7:43PM | Updated Date: May 31 2016 7:43PM पुलगाव येथे असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या दारूगोळा भांडारामध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन अधिकार्‍यांसह 20 जणांना प्राण गमवावा लागला आहे. देशाच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीने ही दुर्घटना अत्यंत चिंतेची आहे. या दुर्घटनेच्या निमित्ताने देशभरात इतरत्र जी सैन्याची दारूगोळ्याची भांडारे आहेत, त्या सर्वांचेच एकदा सेफ्टी ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. त्यातून भविष्यातील दुर्घटना टाळण्यास मदत होईल. देशाची संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सकारात्मक प्रयत्न होत असताना, आधुनिकीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न होत असतानाच काल अचानकपणे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील पुलगाव येथे असलेल्या सेंट्रल अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये भीषण आग लागली. पुलगावमधील हे दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचे भांडार देशातील सर्वांत मोठे भांडार म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे भारतीय सैन्य युद्धपरिस्थितीसाठीची तजवीज म्हणून 30 ते 40 दिवस पुरेल इतका दारूगोळा साठवून ठेवत असते. हा साठा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. अशा प्रकारचे दारूगोळ्यांचे काही डेपो हे सीमावर्ती भागातही आहेत. काही भांडारे ही देशाच्या मध्यभागी आहेत; तर काही इतर ठिकाणी आहेत. पुलगावमधील सेंट्रल अ‍ॅम्युनेशन डेपो हा देशाच्या मध्यभागी असलेला सर्वांत मोठा साठा असणारा डेपो आहे. तब्बल 10 हजार एकर परिसरामध्ये हे भांडार आहे. या डेपोभोवती असलेल्या कुंपण भिंतीची लांबी 26 मीटर इतकी आहे. या डेपोमध्ये दारूगोळा वर्गीकरण करून ठेवला जातो. उदाहरणार्थ, रायफलसाठीचा दारूगोळा वेगळा ठेवला जातो; तर आकाश आणि ब्रह्मोस यांसारखी क्षेपणास्त्रे स्वतंत्र ठेवली जातात. दारूगोळ्यांमध्ये स्फोटक पदार्थांचे प्रमाण जितके अधिक तेवढी ती जास्त धोकादायक मानली जातात. असा धोकादायक दारूगोळा ज्या इमारतींमध्ये ठेवला जातो, त्या इमारती वेगळ्या धाटणीच्या असतात. त्यांच्या भिंती कोणताही स्फोट झाला तरी तो सहन करण्यास सक्षम असतात. या इमारतींमध्ये 50 ते 100 मीटर एवढे सुरक्षित अंतर ठेवले जाते. डेपोमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे फायर इंजिन आणि इतर सामग्री सदैव तैनात असते. या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रश्‍न उद्भवतो तो इतकी सर्व व्यवस्था आणि सुरक्षेसंदर्भातील काळजी घेतलेली असूनही आग का लागली? सध्या याबाबतचे नेमके कारण समोर आलेले नाही; मात्र मागील काही उदाहरणांवरून आणि अभ्यासावरून प्राथमिक स्वरूपाच्या काही शक्यता वर्तवतात येतात. सैन्याची कोर्ट ऑफ एनक्वायरी पूर्ण होईल, त्यावेळी प्रत्यक्ष कारण समोर येईल. ही चौकशी एक ते दोन महिन्यांच्या आत केली जाणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांना शिक्षाही होणे आवश्यक आहे. ती सर्व प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये पार पडेल. आग लागण्याची कारणे काय असतील ? या आगीची तीन प्रमुख कारणे असू शकतात. 1. जुनाट किंवा कालबाह्य (एक्सपायर) झालेल्या दारूगोळ्यामध्ये स्फोट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे. जुनाट दारूगोळा ठेवलेल्या एका इमारतीमध्ये सर्वप्रथम आग लागली आणि त्यामुळे इतर ठिकाणी स्फोट झाले असण्याची शक्यता आहे. 2. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट हेदेखील एक प्रमुख कारण असू शकते. 3. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था किंवा आपल्याकडील काही देशद्रोही घटकांकडून जाणीवपूर्वक आग लावली गेली असण्याची शक्यताही सध्याच्या वातावरणात नाकारता येणार नाही. घटना घडल्यानंतर सैन्यातील अधिकार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावयास हवे. कारण सैन्याच्या परंपरेप्रमाणे अधिकारी समोर राहून आग विझविण्याच्या प्रयत्न करत होते. ज्यावेळेला मोठा स्फोट झाला, तेव्हा अनेक जवान आणि अधिकारी त्या स्फोटामध्ये मारले गेले. सैन्याने जीवावर उदार होऊन प्रयत्नांची शिकस्त केल्यामुळेच ही आग आटोक्याबाहेर गेली नाही किंवा आजूबाजूच्या गावांना तिची झळ बसली नाही. मात्र, तरीही या डेपोमधील अधिकार्‍यांसमोर दोन महत्त्वाची आव्हाने असतील. 1. अनेक स्फोट झाल्यामुळे पुष्कळ स्फोटक पदार्थ एक किंवा दोन किलोमीटर लांब अंतरापर्यंत उडून जाऊन पडलेली असू शकतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराचे पूर्ण निरीक्षण करून दूर उडालेली स्फोटके एकत्रित करून ती नष्ट करावी लागतील. 2. ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत या भागात राहणार्‍या नागरिकांना घरी जाण्यास मनाई केली पाहिजे. कारण उडून गेलेल्या स्फोटकांचा पुन्हा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ आग विझवण्यात यश आले म्हणून धन्यता मानून चालणार नाही; तर पुढील जबाबदारीही लक्षात घेतली पाहिजे. याशिवाय आजूबाजूच्या शेडमध्ये, जिथे आग लागली नव्हती तिथे असलेली स्फोटके आणि दारूगोळा सुरक्षित आहे का, याचे पुन्हा एकदा काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. बर्‍याचदा अशा स्फोटांमुळे हा दारूगोळा किंवा स्फोटके ही अतिसंवेदनशील बनलेली असू शकतात. परिणामी, आगामी काळात त्यांचा स्फोट होण्याची शक्यता असते. याला पुष्कळ वेळ लागू शकतो; मात्र खबरदारी म्हणून आपण आत्ताच त्यांची पाहणी करणे आवश्यक आहे. या दुर्घटनेमध्ये शेकडो कोटी रुपयांचा दारूगोळा जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या युद्धसज्जतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पुढील काही महिन्यांमध्ये इतर ऑर्डिनन्स फॅक्ट्ररींमध्ये अशा प्रकारचा दारूगोळा तयार करण्याचा वेग वाढवून जळालेला किंवा स्फोट झालेला दारूगोळा बदली करणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशा प्रकारची दारूगोळा भांडारे आहेत. यामध्ये पुण्यातील खडकी, देहूरोड आणि तळेगाव येथे अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी आहेत. या कारखान्यांच्या आसपास असलेला रेड झोन हा पूर्वी दोन किलोमीटर होता. तो आता कमी करून एक किलोमीटर किंवा त्याहून कमी केला जात आहे. वास्तविक, अशा डेपोंजवळ असणारा सेफ्टी झोन हा जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे. कारण दुर्दैवाने अशा प्रकारे काही स्फोट झाले तर त्या भागात काही नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा रेड झोन असतो. मात्र, आपल्याकडे नागरी वस्त्यांसाठी आणि राजकीय सोयीसाठी त्याची मर्यादा कमी करण्याचा हट्ट धरला जातो. ताज्या दुर्घटनेपासून धडा घेऊन अशा प्रकारचा हट्ट हा किती जीवघेणा ठरू शकतो, याची नोंद संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. रेड झोनचा परिसर कमी करून अकारण धोका पत्करणे परवडणारे नाही, हे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे. या दुर्घटनेच्या निमित्ताने देशभरात इतरत्र जी सैन्याची दारूगोळ्याची भांडारे आहेत, त्या सर्वांचेच एकदा सेफ्टी ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. त्यातून भविष्यातील दुर्घटना टाळण्यास मदत होईल. - See more at: http://www.pudhari.com/news/rajniti/49435.html#sthash.l40xEsEH.dpuf

No comments:

Post a Comment