१८ नौसैनिकांचा बळी घेऊन ‘सिंधुरक्षक’ बुडाली. आता ‘सिंधुरत्न’ अपघातग्रस्त झाली. यावेळीही आमच्या ‘स्थितप्रज्ञ’ संरक्षणमंत्र्यांनी स्वत: सुरक्षित राहून ऍडमिरल जोशी यांना बुडवले आहे. हिंदुस्थानी संरक्षण दलाने बंदुका व तोफगोळ्यांचे उत्पादन बंद करून ‘फेविकॉल’चे उत्पादन सुरू केलेले दिसते. कारण इतके होऊनही संरक्षणमंत्री खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत.
‘फेविकॉल’ अँटनी
ऍडमिरल का बुडाले?
हिंदुस्थानच्या संरक्षण दलास वाळवी लागली आहे. समुद्रात पाणबुड्या आगीत खाक होत आहेत किंवा बुडत आहेत. हवाई दलाची मिग लढाऊ विमाने कोसळत आहेत. सीमेवरील सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेली जात आहेत. तरीही देशाचे संरक्षणमंत्री व त्यांचे कारभारी षंढासारखे बसून आहेत. सहा महिन्यांपूर्वी भीषण स्फोटात आय.एन.एस. ‘सिंधुरक्षक’ ही पाणबुडी नष्ट झाली. त्यात १८ नौसैनिकांचे बळी गेले व आता पश्चिम किनारपट्टीवर हिंदुस्थानी नौदलाची आणखी एक पाणबुडी ‘सिंधुरत्न’ जबरदस्त अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातातही कपिष मुवल आणि मनोरंजन कुमार या अधिकार्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नौदलास अपघातांनी ग्रासले असून प्रचंड नुकसानीस तोंड द्यावे लागत आहे. हिंदुस्थानच्या आरमाराची अशा प्रकारे झालेली वाताहत पाहून शेजारच्या दुश्मन राष्ट्रास आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. कारण कोणतेही युद्ध सुरू नसताना हिंदुस्थानचे आरमार नष्ट होत आहे. ‘सिंधुरत्न’ पाणबुडीस झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून देशाचे नौदलप्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला आहे व कुचकामी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी तो स्वीकारला आहे. ऍडमिरल जोशी यांच्या काळात नौदलात सर्वाधिक अपघात झाले व पाणबुड्यांच्या अपघातांनी आमच्या नौदलाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे नौदलप्रमुखांनी राजीनामा दिला. मग याच नैतिकतेच्या मुद्यावर संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? ऍडमिरल जोशी यांनाही त्या पाणबुडीबरोबर बुडवून संरक्षणमंत्री स्वत:ची चामडी वाचवू पाहत असतील तर तो सर्वच प्रकार कोडगेपणाचा कळसच म्हणावा लागेल. नौदलप्रमुखांच्या राजीनाम्याआधी
संरक्षणमंत्र्यांनी पदत्याग केला असता
तर त्यांची शान राहिली असती. रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी तडकाफडकी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. विमान कोसळले म्हणून त्या खात्याचे मंत्री माधवराव शिंदे यांनीही मंत्रीपदाचा त्याग केला होता, पण मनमोहन सिंगांच्या सरकारमधील मंत्र्यांच्या नालायकीचे बळी अधिकारी ठरत आहेत व त्यागपत्र देऊन घरी जाण्याची नैतिक जबाबदारी अधिकार्यांवर लादली जात आहे. हिंदुस्थानचे लष्कर, नौदल व हवाई दल हे जगात सामर्थ्यशाली असल्याचा डांगोरा आपणच पिटत असतो. प्रत्यक्षात ही तीनही दले नैराश्याने ग्रासली आहेत. नेतृत्वच कुचकामी असल्यावर दुसरे काय व्हायचे हो? संरक्षणमंत्री अँटनी हे सज्जन गृहस्थ असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या सज्जनपणाचे झेंडे फडकवून दुश्मनांना पळवून लावता येणार नाही. त्यासाठी लढावेच लागेल. तुम्ही भले सज्जन असाल, पण ते पाकडे किंवा चीनची लाल माकडे तुमच्या सज्जनपणास हिंग लावून विचारीत नाहीत. पंतप्रधान मनमोहन सिंगही सज्जनपणाचा निर्जीव पुतळाच आहेत, पण त्यांच्या सज्जनपणामुळे देशातील आर्थिक अराजक कमी झाले काय? भ्रष्टाचार व महागाईवर उतारा म्हणून मनमोहन यांचा सज्जनपणा उपयोगाचा नाही. तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे हे काम नाही. देशाचे नेतृत्व खंबीर हवे, त्याचे मन व मनगट पोलादी हवे आणि आपल्याकडे नेमकी याचीच कमतरता आहे. अँटनी हे गळपटलेले संरक्षणमंत्री आहेत. खरे तर त्यांचा पिंड संरक्षणमंत्र्यांचा नाही. शिक्षणमंत्री किंवा समाजकल्याणमंत्री म्हणून ते उत्तमप्रकारे काम करू शकतात. पण त्यांच्या शिरावर टाकण्यात आला आहे तो देशाच्या संरक्षण खात्याचा भार. तो त्यांना अजिबात पेलवत नाही आणि सोनियांनीच हा भार लादल्याने सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. हिंदुस्थानला संरक्षणमंत्री कसा हवा, तर एकदम ‘दबंग’! पाकड्या व चीनच्या गुंडगिरीस त्याच गुंडगिरीने
जशास तसे उत्तर
देणारा. पाकिस्तान व चीन हातात हात घालून हिंदुस्थानच्या कुरापती काढतात व आपण मात्र हात चोळत बसतो. ईशान्येकडून चीन धडका मारतो आहे. कश्मीर खोर्यातून पाकडा घुसतो आहे. आसामातून बांगलादेशी हातभर आत शिरला आहे. अशारीतीने हिंदुस्थानची संरक्षण सिद्धता रसातळाला गेली आहे, पण याची खंत संरक्षणमंत्र्यांना आहे असे दिसत नाही. सीमेवर हिंदुस्थानी सैन्यावर हल्ले सुरूच आहेत. वास्तविक पाकिस्तानी सैनिक (खरे तर अतिरेकी!) आमच्या हद्दीत घुसून आमच्या जवानांची मुंडकी कापून घेऊन गेले त्याचवेळी संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आमच्या देशाची इतकी नाचक्की कधीच झाली नव्हती. ‘पाकिस्तानला धडा शिकवू’ असे नुसते पालुपद वाजवून दुश्मनांचा खात्मा कसा होणार? हवाई दलातील मिग विमाने म्हणजे उडणार्या शवपेट्याच बनल्या होत्या. तरणीबांड पोरे त्यात नाहक मरत असतानाही संरक्षणमंत्री शांतपणे खुर्चीला चिकटून बसले होते. आताही त्यांचे तेच सुरू आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी रोज राजीनामा द्यावा असे भयंकर प्रकार हिंदुस्थानी नौदलात घडत आहेत. १८ नौसैनिकांचा बळी घेऊन ‘सिंधुरक्षक’ बुडाली तेव्हा हाहाकार माजला. संरक्षणमंत्री आता नक्कीच राजीनामा देतील असे तेव्हा वाटले होते, पण तसे घडले नाही. आता ‘सिंधुरत्न’ अपघातग्रस्त झाली आणि दोन अधिकार्यांचा बळी गेला. यावेळीही आमच्या ‘स्थितप्रज्ञ’ संरक्षणमंत्र्यांनी स्वत: सुरक्षित राहून ऍडमिरल जोशी यांना बुडवले आहे. हिंदुस्थानी संरक्षण दलाने बंदुका व तोफगोळ्यांचे उत्पादन बंद करून ‘फेविकॉल’चे उत्पादन सुरू केलेले दिसते. कारण इतके होऊनही संरक्षणमंत्री खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत. कमाल आहे!
No comments:
Post a Comment