घाणेरडा खेळ
vasudeo kulkarni
Wednesday, February 12, 2014 AT 11:14 AM (IST)
Tags: ag1
सभ्यलोकांचा खेळ, असा एक काळ लौकिक असलेला क्रिकेटचा खेळ, आता क्रिकेटमधल्या भ्रष्टाचार, गैरकारभार, वशिलेबाजी, सट्टेबाजी आणि उठवळपणामुळे घाणेरडा खेळ झाल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालाने झाले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मुळे क्रिकेटमधला खेळ हरवला. खेळाडूतली जिद्द-ईर्षा संपली. फक्त पैसा आणि पैसा, हेच क्रिकेटचे खेळाडू आणि क्रिकेट मंडळाचे एकमेव ध्येय झाले. क्रिकेटच्या खेळाशी ज्यांचा काहीही संबंध नसलेल्या राजकारणी आणि उद्योगपतींनी राज्यासह केंद्रीय क्रिकेट नियामक मंडळांवर वर्चस्व निर्माण केले. परिणामी खेळ बाजूला राहिला आणि पैसा आणि खेळातल्या राजकारणालाच महत्त्व आले. या आधीही क्रिकेटमधल्या भ्रष्ट खेळाडूंच्या वर्तनाचा पंचनामा झाल्याच्या घटना घडल्या होत्याच. त्याच प्रकरणातून माजी कर्णधार अझरुद्दीन याच्यासह काही खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघातून हकालपट्टीही झाली. गेल्या दहा वर्षात मात्र पैसा आणि पैसा एवढाच भारतीय क्रिकेटचा लौकिक झाला. मुळात क्रिकेट हा जागतिक खेळ कधीच नव्हता आणि नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, पाकिस्तान, भारत यासह अवघ्या अकरा देशात क्रिकेटचा खेळ खेळला जातो. फुटबॉल आणि हॉकी मात्र सर्वार्थाने जागतिक खेळ आहेत. पण फुटबॉल जागतिक स्पर्धेच्या चाचणी स्पर्धेपर्यंतही भारतीय फुटबॉल संघ पोहचू शकत नाही. हॉकीमध्ये एक काळ ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय ऑलिंपिक संघाची पिछेहाट अद्यापही थांबलेली नाही. ऍथलेटिक्ससह सर्व खेळांचा बट्याबोळ राजकारण्यांनी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या केंद्र-राज्य सरकारांनी केला. क्रिकेटलाही केंद्र सरकारने प्रचंड सवलती दिल्या. प्राप्तीकर खात्याने प्राप्तीकरात सवलत दिली. प्रारंभी फक्त कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटमध्ये एक दिवसीय आणि 20-ट्वेंटी सामन्यांचा शिरकाव झाला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पैशाचा खजिनाच खुला झाला. नियामक मंडळाने काही वर्षांपूर्वी आयपीएलचे स्तोम माजवले. खेळाडू आणि संघांचे लिलाव सुरू झाले. क्रिकेटला मनोरंजनाची नवी झळाली आली. दूरदर्शन प्रक्षेपणाच्या हक्काद्वारेही नियामक मंडळाला हजारो कोटी रुपये मिळायला लागले. परिणामी क्रिकेट हा खेळ विकाऊ झाला. पैशाच्या अधिक लोभाने खेळाडूही विकाऊ झाले. सट्टेबाज-दलालांनी नेमक्या याच संधीचा फायदा घेत आयपीएलवर जुगार सुरू केला. जुगाराच्या या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष, बडे उद्योगपती एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन हे दोषी असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नेमलेल्या न्यायमूर्ती मुकुल मुदगल चौकशी समितीने काढल्यामुळे, क्रिकेट नियामक मंडळाच्या बेअब्रूची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर टांगली गेली आहे. आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई मय्यपन हेच या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आयपीएलच्या गेल्या सत्रात त्यांनीच अत्यंत गोपनीय माहिती सट्टेबाज आणि दलालांना, जुगाऱ्यांना पुरवल्याचा ठपका मुदगल चौकशी समितीने ठेवल्यामुळे, या प्रकरणात श्रीनिवासन हेही आपोआपच दोषी ठरले आहेत. आयपीएलच्या सामन्यात घोटाळे केल्याबद्दल बडतर्फ केलेल्या आयपीएल आयुक्त ललित मोदी, यांनी श्रीनिवासन यांना नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशी केलेली मागणी योग्य ठरते, ती सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीतच ते दोषी ठरल्याने!
काळा पैसा आणि सट्टेबाजी
मुदगल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाला दिलेल्या या अहवालात मय्यपन यांच्यावर थेट ठपका ठेवतानाच, या सामन्यात अन्य गैर व्यवहार झाल्याचेही नमूद केले आहे. राजस्थान रॉयल्स या संघाच्या मालक अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी शिफारसही या समितीने केली आहे. आयपीएलच्या सामना निश्चिती आणि सट्टेबाजीच्या प्रकरणात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश असल्याची साक्ष श्रीनाथ याने दिली होती. काही परदेशी खेळाडूही सट्टेबाजीत गुंतल्याचे त्याचे म्हणणे होते. चौकशी समितीने अशा सहा खेळाडूंची नावे न्यायालयाला बंद पाकिटातून सादर केली आहेत. हे खेळाडू कोण हे न्यायालयाच्या परवानगीनंतरच जनतेसमोर येईल. पण आयपीएलचे सामने आणि त्यांची विक्री, घोटाळे, खेळाडूंची विक्री, सामन्यांची निश्चिती, या साऱ्या प्रकरणात काळेबेरे झाले होते, हे आरोप सत्यच असल्याचे समितीच्या अहवालामुळे क्रिकेट रसिकांच्या समोर आले, ते बरे झाले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या गुंड माफियांच्या काळा पैशाचा ओघ आयपीएलमध्ये येतो. सट्टेबाज जुगार खेळतात. त्या जुगारावर हजारो कोटी रुपयांचा सट्टाही लागतो, हेही मान्य करत समितीने आयपीएलमध्ये सट्टेबाजीचा जुगार नियमित करावा, अशी शिफारसही केली आहे. आयपीएलच्या सामन्यात खेळायसाठी क्रिकेटच्या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचे मानधन मिळते. विश्वचषक आणि अन्य खेळासाठीही नियामक मंडळाकडून लक्षावधी रुपयांचे मानधन मिळते. पण तरीही या खेळाडूंचा पैशाचा हव्यास काही थांबत नाही. जाहिरातीद्वारेही भारतीय खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचे मानधन मिळते. फक्त पैसा हेच त्यांचे सर्वस्व झाल्यामुळे काही खेळाडूंना पद्मश्री पेक्षाही जाहिरातींचे चित्रीकरण महत्त्वाचे वाटते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर या खेळाडूंना लाखो रुपयांची पेन्शनही मिळते. कसोटीत आणि सामन्यात यश मिळवणाऱ्या खेळाडूंवर केंद्र आणि राज्य सरकारे सवलतींचा वर्षाव करतात. काहीही काम न करता, बहुतांश खेळाडूंना बॅंका आणि अन्य संस्था-कंपन्यात गलेलठ्ठ पगारांच्या नोकऱ्याही आहेत. तरीही त्यांचा पैशाचा हव्यास काही संपत नाही. हे खेळाडू देशासाठी नव्हे तर फक्त पैशासाठीच खेळत असल्याचे, हा खेळच किळसवाणा आणि घाणेरडा, प्रेक्षकांना फसवणारा झाला आहे. आयपीएलच्या सामन्यात चिअर गर्ल्स नाचवून करमणूक करणाऱ्या भारतीय नियामक मंडळाने या खेळाचा अक्षरश: तमाशा करून टाकला. याच मंडळात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणी आहेत. आयपीएल सामन्यात ज्यांचा जावई दोषी ठरला, त्या एन. श्रीनिवासन यांना मंडळाच्या अध्यक्षपदाच्या कामकाजापासून काही काळ बाजूला ठेवले गेले होते. तरीही निर्लज्जपणे हा माणूस पुन्हा अध्यक्षपदावर निवडूनही आला. जाहीर सभातून स्वच्छ राजकारण आणि पारदर्शी कारभाराबद्दल भाषणबाजी करणाऱ्या जेटली यांच्यासह मंडळातल्या एकाही सदस्याने त्यांच्या निवडीला विरोधही केलेला नाही. केंद्र सरकारने क्रिकेट नियामक मंडळासह सर्वच क्रीडा संघटनातले राजकारण्यांचे हे वर्चस्व आणि दादागिरी संपवायला हवी. क्रिकेट नियामक मंडळ बरखास्त करून नव्या लोकशाही घटनेद्वारे त्याची पुनर्रचना करायला हवी. तरच खेळातले हे घाणेरडे राजकारण संपेल!
No comments:
Post a Comment