Total Pageviews

Saturday, 13 July 2013

WOMEN NAXALS

सुन्न करणारे घातचक्र!-म टा-श्रीपाद अपराजित -Jul 14, 2013, बधिर व्यवस्थेपुढे ढोल पिटता पिटता काही लोक थकतात. काही व्यवस्थेच्याच घाण्याचे घटक बनतात. काहींच्या हाती मात्र घण येतो. एखादी वाट निवडल्यानंतरही तरुणाईची संभ्रमावस्था लवकर संपत नाही. अशावेळी त्यांच्यापर्यंत कुणाच्या मदतीचा हात आधी पोहचतो हे फार महत्त्वाचे असते. आदिवासींमधील युवावर्गाला नक्षलवाद्यांचे म्हणजेच माओवादी चळवळीचे आकर्षण आधीही होते. अलीकडे त्यात युवकांचाच नव्हे तर युवतींचाही सहभाग वाढतो आहे. ही चिंता सतावत असतानाच पोलिसी गोळीबारात झालेल्या सहा माओवादी महिलांच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढरी जंगलातील चकमकीत नुकतीच सहा महिला माओवाद्यांची हत्या करण्यात आली. व्यवस्थेविरोधात खांद्यावर बंदूक घेणाऱ्या महिलांचा अंत बंदुकीच्या गोळीनेच व्हावा ही बाब चटका लावणारीच आहे. काय असाव्यात या महिलांच्या अपेक्षा ? का आली त्यांच्या हाती बंदूक ? या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. समाजरचनेच्या सद्य चौकटीविरोधातील रोषामधून असा असंतोष उफाळून येतो. विकासाचे हजारो मार्ग असतानाही समाजाच्या दुर्बल घटकांपर्यंत सुविधा पोहचत नाही. त्यामुळे हा संघर्ष निरंतर सुरू असतो. पिचलेल्या समाजाच्या हाका देणारा वर्ग छोटा नाही. बधिर व्यवस्थेपुढे ढोल पिटता पिटता त्यातील काही लोक थकून जातात. काही जण व्यवस्थेच्या घाण्याचे घटक बनतात. काहींच्या हाती मात्र घण येतो. या संभ्रमावस्थेतील तरुणाईपर्यंत कोणाच्या मदतीचा हात आधी पोहचतो हे फार महत्त्वाचे असते. आदिवासींमधील युवावर्गाला नक्षलवाद्यांचे म्हणजेच माओवादी चळवळीचे आकर्षण आधीही होते. अलीकडे तर त्यातील युवतींचा वाढता सहभाग वाढतो आहे. एकीकडे महिला सुरक्षिततेच्या नवनव्या योजनांचा रतीब वाढत असतानाच गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सहा महिलांचा जीव जावा ही घटना अंतर्मुख करणारी आहे. मारल्या गेलेल्या महिला माओवाद्यांपैकी प्रेमिला नैतामचे वय २३ वर्षे होते. स्वरूपा धुर्वे २० वर्षांची होती. रेश्मा गावडे या १८ वर्षांच्या तरुणीलाही माओवाद्यांनी आपल्या जाळ्यात ओढले होते. धानोऱ्याजवळच्या खेड्यात राहणाऱ्या प्रेमिलाला इंद्रक्काने प्लाटून २० मध्ये भरती केले होते. रेश्मालाही इंद्रक्कानेच गाठले होते. साक्षगंध झालेल्या मुलासोबत तिला लग्न करायचे नव्हते. लग्न आठ दिवसांवर आले असताना रागाच्या भरात ती माओवाद्यांबरोबर निघून गेली. पुढे इंद्रक्काची गार्ड बनली आणि अखेरीस चकमकीत मारल्या गेली. स्वरूपा २००७ मध्ये टीपागड दलममध्ये भरती झाली होती. आता ती उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या टीमची डेप्युटी कमांडर म्हणून काम करायची. सर्वच महिलांची कहाणी थोड्याफार फरकाने अशीच सुरू होते. कहाणीचा शेवट मात्र अस्वस्थ करणाराच असतो. उच्च समित्यांवर अत्यल्प महिला माओवाद्यांच्या सर्वोच्च समितीला पॉलिटब्युरो म्हणतात. त्यात सात सदस्य आहेत. यात एकही महिला नाही. त्यानंतर असते सीसी म्हणजेच सेंट्रल कमिटी. त्यात २६ सदस्य आहेत. यातही महिला सदस्य नाहीच. एप्रिल २००५ ते २००८ या काळात अनुराधा शानभागने या कमिटीत काम केले होते. एप्रिल २००८ मध्ये तिचे निधन झाल्यापासून अन्य महिलेची वर्णी लागलेली नाही. माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे (डीकेएसझेडसी) एकूण २३ सदस्य आहेत. त्यात ज्या तीन महिला आहेत , त्यांचा उल्लेख बातम्यांमधून अधूनमधून होत असतो. नर्मदाक्का , सुगाताक्का आणि रतनबाई ही त्याची नावे. माओवाद्यांच्या या कमिटींखेरीज वेस्टर्न रिजनल कमिटीमध्येही सहा सदस्य आहेत. त्यात सृजनाक्का ही एकमेव महिला सदस्य आहे. या कमिटीखालोखाल काम करणारी वेस्टर्न मिल्ट्री कमांडच्या कार्यकारिणीत सहा सदस्य आहेत. त्यातही महिलांना स्थान नाही. माओवाद्यांच्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये महिलांचे प्रमाण नगण्य आहे. मुंबई , पुणे , नाशिक आणि अहमदाबादच्या परिसरासाठी माओवाद्यांनी सहा सदस्यांची गोल्डन कॉरिडोर कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमार्फत धक्कातंत्र देणारी स्ट्रॅटेजी ठरविली जाते. त्यात सीमा हिराणी काम करते. महाराष्ट्र स्टेट कमिटीमध्ये मात्र एकाही महिलेचा समावेश नाही. सध्या गडचिरोली जिल्ह्याची सूत्रे नर्मदाक्का या बेधडक महिलेकडे आहेत. ती मूळ आंध्र प्रदेशची आहे. पन्नाशीच्या घरातील नर्मदाक्का पदवीधर आहे. लाहेरी , हत्तीगोटा , मरकेगाव यासारख्या अनेक हिंसक घटनांचे नेतृत्व तिच्याकडे होते. तिला आठ भाषा येतात. दुर्गम भागांतील अनेक शाळांना ती स्वतः भेटी देते. समस्या समजून घेते. दंडकारण्य परिसरात तिचा दबदबा आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या भूपतीची पत्नी तारक्का हेदेखील माओवादी चळवळीतील मोठे नाव आहे. भामरागड , पेरमिली , एटापल्ली भागाचे नेतृत्व तिने यापूर्वी केले आहे. आणखी एक नाव म्हणजे रजिता. सध्या कसनसूर कार्यक्षेत्राची जबाबदारी तिच्याकडे आहे. प्रत्यक्ष लढणाऱ्या कॅडरमध्ये मात्र महिलांची संख्या लक्षणीय आहे. गडचिरोली-गोंदिया परिसरातील स्थानिक स्तरावर अनेक महिला काम करतात. अंदाजे ४० टक्के महिला प्रत्येक ऑपरेशनसाठी सज्ज असतात. घनदाट जंगलामध्ये पाठीवर प्रत्यक्ष बंदुका घेऊन फिरणाऱ्या कॅडरमध्ये या महिलांचा समावेश असतो. आकस्मिक चकमकीचे आव्हान असतानाच बंदुका व आवश्यक सामग्रीसह १२ किलोंचे ओझे पाठीवर घेऊन या महिला जंगल तुडवत असतात. महिला आणि पुरुषांच्या बाबतीत अन्यत्र भेदभाव असेल , माओवाद्यामध्ये मात्र नाही. १२ किलोंच्या ओझ्यापासून कोणत्याही कॅडरची मुक्तता नाही. माओवादी चमूंचा जंगलातील मुक्काम सतत बदलत असतो. अशा भटकंतीत बरेचदा खायलाही मिळत नाही. त्यामुळे प्रकृतीची हेळसांड होते. सेंट्रल कमिटीसारख्या तुलनेने मोठ्या चमूची सदस्य असलेल्या व नियमित शहर संपर्क असलेल्या अनुराधाचे निधन साध्या मलेरियाने झाले तेव्हा आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. उत्तर गडचिरोली गोंदिया डिव्हिजनल कमिटीच्या इंद्रक्काचा मृत्यू याचवर्षी मे महिन्यात साप चावून झाला. ती ३५ वर्षांची होती. चळवळीतील महिलांची किती ' काळजी ' घेतली जाते , हा मुद्दा या मृत्यूंनंतर चर्चेत आला होता. महिलांचे जिणे अत्यंत भयकारी असून सर्वसामान्य व्यक्तीला त्याची कल्पनाही येऊ शकणार नाही , असे मनोगत गडचिरोलीतील काही शरणागत महिला माओवाद्यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. ' पशूंपेक्षाही भयंकर यातना तेथे सोसाव्या लागतात. शहरात निदान सूर्य कलला की महिलांमध्ये असुरक्षितता दाटत असेल , जंगलात तर तिन्ही त्रिकाळ भीतीचे वातावरण असते ', अशी आपबीती अनेकांनी कथन केली आहे. आजकाल माणसांच्या गर्दीने फुललेल्या सिमेंटच्या जंगलात महिला अत्याचाराच्या अनेक किंकाळ्या हवेत विरतात. नियमांचे दाखले आणि कायद्याचा ससेमिरा चुकविताना भल्याभल्यांची दमछाक होते. जंगलांचे सम्राट वेगळे आहेत आणि कायदेही. त्या घनगर्द काळोखातील अनन्वित अत्याचार बरेचदा शहरी वसाहतींपर्यंत पोहचतच नाहीत. बंदुकीच्या दस्त्याची साथ सोडण्याचा विचार कदाचित अनेक महिलांच्या मनात घोळत असेल , मात्र स्वयंघोषित सत्ताधीशांचा जंगल वेढा तुटणार नाही तोपर्यंत घातचक्र संपणार नाही. माओवादी गटाच्या असल्या तरी सहा महिला गोळीबारात मारल्या जातात या बातमीने संपूर्ण परिसराला सुन्न करून सोडले. आपल्याच देशाच्या सीमेतील मृत्यूंची ही वेदनादायी शिवाशिवी कशी थांबणार , हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. अनेक महिलांचा अकाली अंत मेंढरी चकमकीत ठार झालेल्या प्रेमिलाने हत्तीगोटाच्या हल्ल्यात पंधरा पोलिसांना संपविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी सन १९९९ मध्ये एटापल्लीची उपकमांडर मीनक्का अशाच एका चकमकीत ठार झाली होती. २००५ मध्ये दोन , २००७ मध्ये तीन , २००८ मध्ये तीन तर २०१० मध्ये एक व २०१२ मध्ये तीन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. गडचिरोली तालुक्यातील माखणचुआ चकमकीत रनिता या दलम कमांडरला जीव गमवावा लागला होता , मात्र तत्पूर्वी तिने एका घरात लपून चार तास सुरक्षा दलांशी लढा दिला होता , अशी नोंद पो‌लिस कार्यालयात आहे. २०१३ चा आढावा घेतला तर जानेवारीच्या गोंविदगाव चकमकीत दोन , भटपारच्या चकमकीत दोन आणि सिंदेसूर घटनेत तीन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. मेंढरीच्या सहांचा समावेश केला तर एका वर्षात ठार झालेल्या महिला माओवाद्यांचा आकडा १३ होतो. व्यवस्था बदलासाठी चुकीचा मार्ग निवडल्याने या महिलांना अकाली प्राण गमवावे लागले , अशी हळहळ आता व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment