Total Pageviews

Tuesday 25 September 2012

बारबाला शोधण्यासाठी पोलीस करीत आहेत जिवाचे रान!
- प्रभाकर पवारमुंबईतील बारमध्ये काळे धंदेवाले पैशाची उधळण करतात. रोज कोट्यवधींची उलाढाल होते. राज्य शासनाला मात्र दर वर्षाला दहा-बारा कोटीच लेडीज बारमधून महसूल मिळतो. तो महसूल वाढावा असा कुणी प्रयत्न करीत नाही. त्याउलट रोज बारमध्ये धाडी घालून पोलीस फोर्सचा कसा गैरवापर करता येईल याकडेच शासनाचा कल दिसतो. हे योग्य आहे का?
ईस्ट रिजनच्या आयपीएस अधिकार्‍याच्या एका खबर्‍याने पूर्व उपनगरात अलीकडे धमालच उडवून दिली. मुलुंडच्या एका बारमध्ये बसलेल्या या खबर्‍याला वेटरने दारूचे बिल दिल्यावर हा खबर्‍या चवताळला. ‘मुझे पहचानता नही क्या? मै तुम सबको सबक सिखाता हूं! तुमको दिखाता हूं मेरी पहुंच कहा तक है!’ आणि त्या पठ्ठ्याने खरेही करून दाखविले. बारमध्ये फुल टू धमाल आहे, पोरी नाच नाच नाचत आहेत. साहेब, आपली फौज लवकर पाठवा. नाहीतर पोरी गायब होतील, असे त्या इन्फॉर्मरने आपल्या पोलीस अधिकारी बॉसला कळविले. त्या आयपीएस अधिकार्‍याने आपल्या या पठ्ठ्याच्या इमर्जन्सी कॉलची रात्री अकरा वाजता तत्काळ अंमलबजावणी केली. मुलुंड, पंतनगर, घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस एसआरपी असा सुमारे २०० पोलिसांचा ताफा मुलुंड येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये घुसविला. झोपेत असलेले वायरलेस व्हॅनचा आवाज ऐकून जागे झाले. तर झोपेच्या तयारीत असलेल्या आजूबाजूच्या रहिवाशांची त्या हॉटेलवरील रेडमुळे झोपच मोडली. कुणीतरी अतिरेकी किंवा गुंड बारमध्ये घुसले असावेत, काहीतरी मोठा गंभीर गुन्हा घडला असावा, अशी शंका आजूबाजूच्या रहिवाशांना आली. परंतु ती फोल ठरली. बारबालांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घातलेली धाड फेल ठरली. पोलिसांना हात हलवत माघारी परतावे लागले. एका खबर्‍यासाठी सुमारे २०० पोलिसांनी मुलुंड येथील ऑर्केस्ट्रा बार पिंजून काढला तरीही त्यांच्या हाती काही लागले नाही. तेव्हा असा प्रश्‍न पडतो, मुंबई पोलिसांची प्रॉयॉरिटी काय आहे? लेडीज बार बारबाला? राज्यकर्त्यांच्या कूचकामी धोरणाचा हा एक हास्यास्पद नमुनाच आहे. आज सर्वात जास्त पोलिसांचा पहारा लेडीज बार पबमध्ये असतो. अन्य कुठेही नाही, हे रोजच्या पोलिसांच्या स्टेशन डायरीतील नोंदीवरूनच आपणास आढळून येते. पोलिसांचा रोजचा पहारा गस्त बारबालांवर कारवाई करण्यासाठी असते असे दाखविले जाते; परंतु हे सारे झूठ आहे. पोलिसांच्या या सार्‍या गस्त पहारा बारवाल्यांना अभय देण्यासाठीच असतात. हे कुणाला माहीत नाही का? मग लेडीज बारवरील कारवाईची धूळफेक पोलीस का करतात? गृहमंत्री आर. आर. पाटील पोलीस आयुक्तांना खूश करण्यासाठीच ना? पोलिसांनी खरोखर लेडीज बारवर कठोर कारवाई केली असती, तर नक्कीच लेडीज बारमधीलछम छम’ थांबली असती. बारबालांचा बाजार उठला असता. एसीपी वसंतराव ढोबळे यांनी तसा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या खबर्‍यांनीही त्यांच्या नावाचा गैरवापर करून बारवाल्यांकडून खंडण्या वसूल केल्या आणि ढोबळेंना बदनाम केले. अरुप पटनायक यांची बदली झाल्यानंतर वसंतराव ढोबळे शांत झाले तर त्यांचे खबरे लापता झाले. पोलीस कंट्रोलला कॉल करून तक्रार करून खबरे जितके लेडीज बारवाल्यांकडून पैसे उकळतात इतके पोलीसही नाहीत. दोन पानांची पत्रकं काढून ब्लॅकमेलरही लेडीज बारवाल्यांना लुटतात. अशी ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सर्वांनाच हवी आहे. ती मरू नये असे सर्वांनाच वाटते. तरीही बारवरील धाडीचे रोजचे देखावे केले जातात याचेच आश्‍चर्य वाटते.बारमध्ये अनैतिक धंदे सुरू असतील तर ते त्वरित उद्ध्वस्त केले पाहिजेत; परंतु बारवर धाडी घालूनही ते बंद होत नाहीत याचा अर्थ काय? तेव्हा आता राज्यकर्त्यांनी बारवरील रोजच्या धाडीचे सत्र बंद करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर थांबविला पाहिजे किंवा लेडीज बार तरी बंद केले पाहिजेत. आज मुंबई शहरात गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरात आज कुणीही सुरक्षित नाही. अतिरेक्यांचा धोका तर मुंबईकरांच्या पाचवीला पूजलेला आहे. आणि आमचे पोलीस बारवरील धाडीत गुंतले आहेत. बारवरच्या धाडीत आपली सारी रात्र घालविणारे पोलीस दिवसा जनतेला काय न्याय देणार? पोलीस यंत्रणेचा समतोलच बिघडलेला आहे. कुणाचा पायपोस कुणात नाही. एक धोरण नाही. एकवेळ महिलेच्या गळ्यातील चेन लुटून पळणार्‍या लुटारूचा पोलीस पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार नाहीत; परंतु बारबालांचा शोध घेण्यासाठी ते जिवाचे रान करतील. ही अतिशयोक्ती नाही तर वस्तुस्थिती आहे हे मुलुंड येथील बारवरील कारवाईवरून दिसून येत आहे. ही एकेकाळी जगात नावलौकिक कमविणार्‍या मुंबई पोलिसांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. मुंबई पोलिसांचे शौर्य आज बारबालांचा शोध घेण्यात बारवर धाडी घालण्यात वाया जात आहे. याचे आज तमाम मुंबईकरांना दु: वाटत आहे. त्यामुळेच मुंबईत धर्मांध गुंड मातले आहेत. त्यांची मुंबई पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत वाढली आहे. हे ११ ऑगस्टच्या आझाद मैदान येथील घटनेवरून दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment