Total Pageviews

Tuesday, 12 June 2012

सुरक्षित प्रवासाचा मंत्र ऐक्य समूह stambha lekh अलीकडे रस्ते अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. यातील बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच ते टाळता येणे शक्य होते. निदान यापुढील काळात अपघात होऊ नयेत यासाठी वेगाचे भान राखणे, चालकांना पुरेशी झोप घेऊ देणे, त्यांना ठरावीक कालावधीनंतर प्रशिक्षण देत राहणे तसेच रस्तेदुरूस्ती आणि देखभालीकडे लक्ष देणे या उपायांचा काटेकोरपणे अवलंब करावा लागणार आहे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्यातील वऱ्हाडाच्या बसला झालेल्या भीषण अपघातानंतरही विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. यात अनेकांना प्राण गमवावे लागले असून जखमींची संख्याही मोठी आहे. वाढत्या अपघातांना आळा कसा घालायच्या आव्हानाने साऱ्यांनाच हैराण केले आहे. खरे तर काही बाबींकडे विशेष लक्ष दिल्यास अपघात टाळणे सहजशक्य आहे. सध्याचा जमाना वेगाचा आहे. त्यामुळे प्रत्येक काम अधिक वेगाने कसे होईल हे पाहिले जाते. प्रवासाचेही असेच आहे. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा असा साऱ्यांचाच प्रयत्न असतो. मग त्यासाठी वाहनांचा वेग वाढवला जातो. पण तो किती वाढवावा याचे भान राखले जात नाही. मग भरधाव वेगाने जाताना गाडीवरील नियंत्रण सुटले तर हमखास अपघात होतात. म्हणजेच गाडीचा अतिवेग हे अपघातांमागील महत्त्वाचे कारण आहे. खरे तर आपल्याकडे रस्त्यावरून जाताना वेग मर्यादेबाबतचे फलक लावलेले असतात. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. वास्तविक वेगमर्यादा ठरवून देण्यामागे काही उद्देश असतो. ते ठिकाण अपघाती क्षेत्र असल्यास वेग नियंत्रित असणे आवश्यकच ठरते. शिवाय मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांची वेगमर्यादा 50 ते 80 किलोमीटर अशी ठरवून दिली आहे. त्यामुळे वाहन चालवताना वेगाचे भान राखणे केव्हाही हिताचे ठरणार आहे. मानवी चुका
खरे तर बहुतांश रस्ते अपघातांना मानवी चुका जबाबदार असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अपघातांमागे रस्ते बांधणीतील दोष, वेगावर नियंत्रण नसणे, वाहन नादुरूस्त होणे तसेच टायर पंक्चर होणे ही अन्य कारणेही असतात हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय दिवसापेक्षा रात्री होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे. त्यातही साडे अकरा ते साडे बारा, दीड ते अडीच, साडेतीन ते साडेचार आणि पहाटे साडेचार ते सकाळी साडेसहा या कालावधीत अधिक प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चालकाला वेळेवर आणि पुरेशी झोप मिळणे, सततचे जागरण, प्रवास यामुळे चालकाच्या डोळ्यावर आलेली काही सेकंदाची झापडही अपघातास कारणीभूत ठरते. विशेष म्हणजे अशा पध्दतीने होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चालकाने वेळेवर विश्रांती आणि पुरेशी झोप घेतली तर हे अपघात सहज टाळता येण्यासारखे आहेत. या शिवाय रात्रीच्या अंधारात रस्त्याने वाहन चालवताना समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटमुळे दुसऱ्या गाडीच्या चालकाला काही क्षण समोरचे काहीच दिसत नाही. अशा परिस्थितीत त्या गाडीचा वेग अधिक असेल आणि वाटेत एखादे नादुरूस्त वाहन थांबले असेल तर अपघाताची शक्यता वाढते. हे लक्षात घेऊनच केंद्रीय मोटार वाहन कायद्याच्या कलम 104 आणि 138 नुसारगाडीला "रेट्रो रिफ्लेक्टर टेप्स' बसवणे बंधनकारक आहे. त्यात वाहनांच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाचे तर मागील बाजूस लाल रंगाचे टेप्स लावण्याविषयी सुचवण्यात आले आहे. पण याकडेही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला लावलेले वाहन दिसल्याने होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे.वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करणे हेसुध्दा अपघातामागील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांच्या काटेकोर पालनाकडे चालकांनी लक्ष दिलेच पाहिजे. तसे झाल्यास प्रसंगी त्यांना नियम पाळायला लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी गरज आहे नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची. पण नेमक्या याच बाबीकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. वाहतुकीचा परवाना देतानाही संबंधित व्यक्तीच्या कागदपत्रांची पुरेशी शहानिशा केली जाते असे नाही. त्यात चिंतेची बाब म्हणजे अलीकडे चालकाऐवजी त्याच्या सहाय्यकानेच गाडी चालवण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी चालक स्वत: सहाय्यकाला गाडी चालवण्यास सांगतात. हा चालक म्हणजे क्लीनर प्रशिक्षित असतो असे नाही. चालकाबरोबर राहून राहून त्याने चार जुजबी गोष्टी शिकून घेतलेल्या असतात. पण तांत्रिक अशी कोणत्याही स्वरूपाची माहिती नसते. अशा परिस्थितीत तो वाहन सुरक्षित चालवेल याची कोणतीच खात्री देता येत नाही. काही वेळा तर अजून परवाना मिळालेली मुलेही मोठमोठी वाहने चालवताना पहायला मिळतात. मग अर्धवट ज्ञानातून वाहन चालवून अपघात घडवून आणल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न पडतो. वाहन चालवण्याचा परवाना देताना वयाची अटही लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे विशिष्ट वयाच्या आत वाहन चालवण्याचा परवाना मिळवणारे पहायला मिळतात. मग अशा मुलांच्या हाती वाहन देणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच.नियमांचे पालन
चालकांना देण्यात येणारे प्रशिक्षण हासुध्दा महत्त्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने शासनाने राज्यात चेन्नई, दिल्ली आणि हरियाणाच्या धर्तीवर प्रशिक्षण संस्थांची उभारणी करण्याचे ठरवले आहे. या संस्थांमधून चालकांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. मात्र, या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा असावी, त्याच बरोबर दर पाच वर्षांनी पुन्हा प्रशिक्षण घेण्याची सक्ती केली जावी. अशा अनेक प्रशिक्षणातून चालक वाहन चालवण्यात कुशल आणि तरबेज होईल. तसेच वाहतुकीच्या नियमांच्या पालनाबाबत त्याच्यामध्ये जागृती निर्माण होईल. चालकांना प्रशिक्षणाबरोबरच वेळोवेळी योग्य समुपदेशन मिळणेही गरजेचे आहे. घरच्या किंवा अन्य समस्यांमुळे मनावरील वाढता ताण, सततचे जागरण, आहाराच्या वेळेतील अनियमितता याचा चालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. शिवाय ताण वाढत राहिला तर वाहन चालवताना कधी काय होईल सांगता येत नाही अशी परिस्थिती असते. त्यामुळे चालकांसाठी समुपदेशन, ध्यान-धारणा शिबिरे, मनमोकळा संवाद यावरही भर दिला जाणे गरजेचे आहे. शेवटी शरीर आणि मन प्रसन्न असेल तरच चालक व्यवस्थित वाहन चालवू शकेल. याबरोबरच वाहनांची वेळोवेळी तपासणीही गरजेची ठरते. अशा तपासणीमुळे वाहन रस्त्यात नादुरूस्त होण्याचे प्रकार टाळता येतात. साहजिकच रस्त्यात नादुरूस्त झालेल्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालता येतो. आपल्याकडे चुकीच्या पध्दतीने लेन कटिंग आणि ओव्हरटेक यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रक टर्मिनसची आवश्यकता आहे. तो नसल्यामुळे पेट्रोल पंपावर किंवा फूड मॉलवर वाहन उभे करणे चालकांना भाग पडते.बऱ्याच वेळा पेट्रोल पंपचालक ट्रक चालकांना वाहन थांबवू देत नाहीत. फूड मॉलमध्ये ट्रक चालकांना हवे ते खाद्यपदार्थ मिळत नाही. यामुळे ते एक्स्प्रेस वे वर वाहने कोठेही थांबतात. वास्तविक या महामार्गावर वाटेत वाहने थांबवू नयेत असा नियम आहे. पण अन्यत्र थांबण्याचे ठिकाण नसल्याने त्यातल्या त्यात सोयीच्या ठिकाणी वाहन उभे केले जाते आणि अपघाताला निमंत्रण मिळते. वास्तविक पुणे-मुंबई दरम्यान पाच ठिकाणी अशा टर्मिनसची आवश्यकता आहे. या पुढील काळात नवीन रस्त्यांची बांधणी, रस्त्यांची रूंदी वाढवणे ही कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहेत. साहजिकच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेगही वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपघातांवर नियंत्रण आणायचे असेल तर या साऱ्या गोष्टी गांभीर्याने लक्षात घेणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे
Saturday, June 09, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags:

No comments:

Post a Comment