Total Pageviews

Thursday 1 December 2011

very poor policing in mumbai

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील कायदा-सुव्यवस्थेची पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पुरती वाट लागली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणारे पोलिस सामान्य माणसांना त्रास देण्याचे काम मात्र निर्लज्जपणे करीत असतात.
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत परस्परविरोधी दावे केले जातात. कोणी महाराष्ट्राला बिहार-उत्तर प्रदेशच्या पंगतीला नेऊन बसवते, तर कोणी मुंबई पोलिसांच्या स्कॉटलंड यार्ड प्रतिमेचा दाखला देऊन त्यांच्या कर्तबगारीचे पोवाडे गाते. पोलिसांची शस्त्रसज्जता आणि दक्षतेबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील हेही अनेकदा मोठमोठे दावे करीत असतात. तक्रार आल्यानंतर सात मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले पाहिजेत, अशी अपेक्षा ते व्यक्त करीत असतात. परंतु सोमवारी पहाटे ठाकुर्ली येथे पडलेल्या दरोडय़ाने पोलिस यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले असून पोलिसांची अब्रूची लक्तरे मुंबईच्या वेशीवर टांगली आहेत. ठाकुर्ली स्टेशननजीकच्या जलारामबाप्पा मंदिर परिसरातील यशोमंदिर सोसायटीवर आठ ते नऊ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला, त्यावेळी रहिवाशी आणि दरोडेखोरांमध्ये सुमारे अर्धा तास धुमश्चक्री सुरू असताना पोलिसांशी संपर्कच होऊ शकला नाही, यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी कोणती असू शकते? सलग दुस-या रात्री हाजीमलंगच्या पायथ्याशी खोणी गावात दरोडा घालून दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. आदल्याच आठवडय़ात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कल्याण स्टेशनच्या बाहेर दोन गुंडांमध्ये अर्धा तास धुमश्चक्री सुरू होती आणि डोंबा-याचा खेळ पाहिल्याप्रमाणे लोक सभोवती गोल करून ते पाहात होते. त्यातील एकजण निपचित पडल्यानंतर ही हाणामारी थांबली आणि त्यानंतर ब-याच वेळाने पोलिस घटनास्थळी आले. काही महिन्यांपूर्वी कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटेच्यावेळी एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यावेळी आठवडाभर पोलिसांनी बंदोबस्ताचे नाटक केले आणि पुन्हा चित्र जैसे थे! डोंबिवलीतील अनैतिक व्यवसायांनी त्रस्त झालेले लोक तर रोज ओरड करीत असतात. परंतु लोकांना होणा-या त्रासाशी, स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्थेशी आपला काहीच संबंध नसल्याप्रमाणे पोलिसांचे एकूण वर्तन आहे. कल्याण हे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्वात मोठे जंक्शन आहे आणि पोलिस पुरस्कृत अनैतिक व्यवसायाचे मोठे केंद्र म्हणून ते विकसित होत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील कायदा-सुव्यवस्थेची स्थानिक पोलिसांच्या  निष्क्रियतेमुळे  पुरती वाट लागली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणारे पोलिस सामान्य माणसांना त्रास देण्याचे काम मात्र निर्लज्जपणे करीत असतात. काही आठवडय़ांपूर्वी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे मोटारसायकलवरून पडून ज्याच्या आईचा मृत्यू झाला, त्या तरुणावर निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्याचे शौर्य डोंबिवलीतल्या पोलिसांनीच दाखवले होते. त्याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी रान उठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. याच डोंबिवलीत सोमवारी पहाटे पडलेल्या दरोडय़ाच्या निमित्ताने जे वास्तव समोर आले, ते पोलिसांसाठी नामुष्कीजनक आहे. दरोडा पडत दूरध्वनीवरून रामनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्यामुळे संपर्कच होऊ शकला नाही. बिल न भरल्यामुळे हे दूरध्वनी बंद आहेत, की तांत्रिक कारणामुळे याच्याशी लोकांना काही देणेघेणे असण्याचे कारण नाही. पोलिस ठाण्याचे दूरध्वनी बंद राहतात आणि पेट्रोलिंगच्या नावाखाली पोलिस उंडारत फिरतात. हरिश्चंद्र पाटील आणि त्यांचे पुत्र हर्षद व निशाद यांनी अत्यंत धाडसाने दरोडेखोरांशी दोन हात करून त्यांचा हल्ला परतवून लावला. तीन दरोडेखोरांना पकडणेही त्यामुळेच शक्य झाले. यामध्ये पाटील पिता-पुत्र जखमी झाले असून कदाचित त्यांच्या किंवा त्यांच्या मदतीला धावलेल्या एखाद्याच्या प्राणावरही बेतू शकले असते. दूरध्वनीवरून पोलिसांचा संपर्क न होऊ शकल्यामुळे गस्तीवरच्या पोलिसांना शोधून आणावे लागले. चित्रपटांतल्याप्रमाणे घटना घडून गेल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. मुंबईलगतच्या संवेदनशील परिसरातील हे चित्र पाहता कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे पोलिसच कल्याण-डोंबिवलीचे दरोडेखोर मानावे लागतील

No comments:

Post a Comment