Total Pageviews

Saturday, 10 December 2011

कोलकत्त्यातले मृत्युकांड
ऐक्य समूह
Saturday, December 10, 2011 AT 11:00 PM (IST)
Tags: editorial

कोलकात्याच्या अति दाटीवाटीच्या ठाकुरिया विभागातल्या एएमआरआय या खाजगी रुग्णालयाला लागलेल्या आगीचे रूपांतर मृत्युकांडात झाल्याने त्यात त्र्याहत्तर रुग्णांचे बळी गेल्याची घटना थरकाप उडवणारी आहे. शुक्रवारी पहाटे या पाच मजली रुग्णालयाच्या तळघराला अचानक आग लागताच कोलकाता महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी, अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेतली पण अरुंद गल्ल्यामुळे ही आग शमवायसाठी पाणी मारताना, जवानांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. हे खाजगी रुग्णालय पूर्णपणे वातानुकुलित असल्याने, सर्व मजल्यांवरच्या खोल्यांची दारे आणि खिडक्याही बंद होत्या. अग्निशामक दल पोहचेपर्यंत तळघरातली आग पहिल्या-दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीबरोबरच प्रचंड धुराने ही संपूर्ण इमारत वेढली गेली. तळघरातल्या रासायनांचाही स्फोट झाला. अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्याने धूर, विषारी वायूने गुदमरून पस्तीस रुग्णांचा मृत्यू झाला. आगीने लपेटल्याने पंधरा रूग्ण होरपळून गेले. आग लागली तेव्हा, रुग्णांसह डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य सेवकांसह 170 जण रुग्णालयात होते. अतिदक्षता आणि दक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या रूग्णांना सुरक्षित बाहेर काढायसाठी अग्निशामक दलाच्या पथकांनी अक्षरश: मृत्यूशी झुंज दिली. रूग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडून ही पथके इमारतीत घुसली आणि शर्थीचा प्रयत्न करून शंभर जणांना त्यांनी सुखरूप हलवले. खाजगी रुग्णालयात सरकारी रूग्णालयांपेक्षा अधिक चांगले वैद्यकीय उपचार होतात, डॉक्टरांची उपस्थिती असते. अत्यावश्यक वेळी रूग्णावर तातडीने शस्त्रक्रियाही होऊ शकते. रूग्णाची काळजी दक्षतेने घेतली जाते, असा समज लोकांत असल्यामुळेच परवडत नसतानाही मध्यमवर्गीय कुटुंबेही अत्यवस्थ रूग्णांना अशा सर्व वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या रूग्णालयात दाखल करतात. बहुतांश रूग्णालयात अतिदक्षता विभाग असतोच. या विभागातल्या रूग्णांना ऑक्सिजनसह सर्व सुविधा द्यायचीही व्यवस्था असते. आपले आई-वडील किंवा नातेवाईक असाध्य आजारातून बरे व्हावेत, त्यांची प्रकृती सुधारावी, अशीच नातेवाईकांची इच्छा असते. त्यासाठी दवाखान्याची भरमसाठ बिले मध्यमवर्गीय कुटुंबेही भरतात. डॉक्टरांच्यावर आणि रूग्णालयाच्या व्यवस्थापनावर पूर्णपणे विश्वास ठेवून खाजगी रूग्णालयात रूग्णांना दाखल केलेल्या, या बिचाऱ्या कुटुंबियांना आपला लाख मोलाचा जीवच गमवावा लागेल, असे वाटले नव्हते. पण दुर्दैवाने एएमआरआय रूग्णालयातल्या व्यवस्थापनातल्या निष्काळजी-बेपर्वाईच्या कारभाराने ते घडले. या मृत्युकांडाची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नातेवाईकांच्या सांत्वनाचाही प्रयत्न केला, पण रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून जखमी आणि मृतांच्या नावांचा तपशील ही घटना घडल्यावर सहा तास उलटल्यानंतरही मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी बॅनर्जींना घेराव घातला. त्यांचा हा संताप अयोग्य नव्हता. पण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांनी शोकमग्न नातेवाईकांच्यावरच जोरदार लाठीहल्ला केल्याने, संतापाचा स्फोट झाला. आगीच्या तांडवातून या रूग्णालयात जे काही वाचले होते, ते या जमावाने मोडून तोडून टाकले. रूग्णालयातले फर्निचर, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्य जमावाने रस्त्यावर फेकून दिले. ज्या रूग्णालयाने आपल्या जीवाभावाच्या कुटुंबियांना वरचा रस्ता दाखवला, त्या रूग्णालयाची नामोनिशाणीही या रूग्णांच्या नातेवाईकांनी, हितचिंतकांनी संपवून टाकायचा निर्धार केला होता. जमाव एवढा चिडला, अनावर झाला, त्याचे कारण व्यवस्थापनाने रूग्णांच्या नातेवाईकांना नीट माहिती दिली नाही, हेच होय!
नियम धाब्यावर!
महानगरातल्या-शहरातल्या कोणत्याही पाच-सहा मजली इमारतीला लिफ्टची सुविधा असली तरीही, संकटकालीन स्थितीत रहिवाशांना सुरक्षित बाहेर पडायसाठी जिने असलेच पाहिजेत, असा नियम आहे. पण बहुतांश बिल्डर्स या नियमावलीचे पालन करीत नाहीत. वन बीएचके आणि टू बीएचके असे शब्द प्रतिष्ठेने सांगणाऱ्या मध्यमवर्गीयांनाही आपण राहत असलेल्या इमारतीत संकटकालीन व्यवस्था आहे काय? हेही माहिती नसते. खाजगी रूग्णालये, कार्यालयातही हा महत्वाचा नियम पाळला जात नाही. लिफ्ट असली तरी जिना हवाच आणि विशेषत: वातानुकूलित इमारतीसाठी तर जिन्याची सोय हवीच! या नियमाला बगल देत, एएमआरआय रूग्णालयाची इमारत बांधली गेली. कोलकाता महापालिकेच्या बांधकाम विभागाने अशा चुकीच्या इमारतीला परवानगी दिली. जिना नसलेल्या या इमारतीतील बहुतांश रूग्णांचे बळी गेले ते,   संकटकाळात बाहेर पडायचा मार्गच उपलब्ध नसल्यानेच! दक्षिण कोलकात्याच्या ज्या गर्दीच्या भागात हे रूग्णालय बांधले गेले, त्या परिसरातल्या गल्ल्या अरुंद-चिंचोळ्या असल्याने अग्निशामक दलाच्या बंबांना, आग लागलेल्या त्या इमारतीपर्यंत पोहचताना आणि आगीवर पाणी मारून रिकामा झालेला बंब रस्त्यातून बाहेर काढताना अग्निशामक दलाची कोंडी झाली. दोन तास अग्निशामक दलाचे पंचवीस बंब ही भीषण आग शमवायसाठी झुंजत होते हे लक्षात घेता, ही आग किती आक्राळ-विक्राळ होती, हे लक्षात येते! महापालिकेच्या नियमानुसार उंच इमारतीवर आगीचे संकट कोसळल्यास, प्रत्येक मजल्यावर अग्निशामक रसायनांची नळकांडी, पाण्याच्या टाकीतून आगीवर पाण्याचे फवारे मारायसाठी पाईप, अशी सुविधा अत्यावश्यक आहे. पण या रूग्णालयात जिनाही नव्हता. अग्निशामक प्रतिबंधक कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळेच आग झपाट्याने पसरली आणि संपूर्ण इमारतच आगीच्या वणव्यात सापडली. एअर कंडिशन इमारत असल्याने, अग्निशामक प्रतिबंधक व्यवस्था सक्तीची असतानाही, ती का नव्हती? आणि ती नसतानाही पालिकेने या रूग्णालयाला परवानगी कशी दिली? हा सारा तपशील चौकशीनंतरच उजेडात येईल. राज्य सरकारने या दुर्घटनेत बळी गेलेल्या प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तातडीची मदत द्यायचे जाहीर केले. ही मदत आगीत होरपळून आणि धुराने गुदमरून बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना मिळेलही. आगीच्या कारणांची चौकशीही होईल. पण ज्यांच्या घरातले माणूस हकनाक या दुर्घटनेत गेले, त्यांचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही. चौकशीने त्यांना दिलासाही मिळणार नाही. महानगरातली हायफाय खाजगी रूग्णालये चालवली जातात ती, सेवेपेक्षा पैसा मिळवायच्या उद्देशानेच! त्यामुळेच त्या रूग्णालयांच्या व्यवस्थापकांना रूग्णापेक्षा काळजी असते ती, जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याचीच! पैशाच्या या हव्यासानेच एएमआरआय रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने सारे कायदे राजरोसपणे पायदळी तुडवले आणि रूग्णांना मृत्युकांडात ढकलले. केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व खाजगी मोठ्या रूग्णालयांची तपासणी करून, संकटकालीन व्यवस्थेची पूर्तता व्यवस्थापनाने केली आहे की नाही, याचा तपास करायला हवा. नियम पायदळी तुडवणाऱ्या रूग्णालयांना टाळी ठोकायला हवीत

No comments:

Post a Comment