Total Pageviews

Monday, 5 December 2011

आयएसआय'च्या कारवायांमुळे त्रस्त भारत
ब्रिगेडिअर हेमंत महाजन
Tuesday, December 06, 2011 AT 03:00 AM (IST)
1965 व 1971 च्या अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी, जनरल झिया आणि "आयएसआय' यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून "के प्लॅन' असे संबोधले गेले. भारतात विद्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य भाग होता. यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणीही शीख माथेफिरू तरुणांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आली. काश्‍मीरचे विभाजन करण्याचाही डाव रचला गेला.

2009 मध्ये सामान्य नागरिक, सुरक्षा कर्मचारी तसेच दहशतवादी सर्व मिळून, तब्बल 2600 हून अधिक जणांना दहशतवादी कारवायात प्राण गमवावे लागले. 2010 रोजी हीच संख्या 2000 च्या जवळपास आहे. 2011 रोजी हीच संख्या 1600, तर गंभीररित्या जखमी झालेल्यांची संख्या 10,000 हून अधिक आहे. यावरूनच "आयएसआय'च्या दहशतवादी कारवायांची भयानकता स्पष्ट होते.

गेल्या काही काळातील वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे "आयएसआय' ने आपल्या व्यूहरचनेत मोठा बदल केला. पाकिस्तानातील सरकारी यंत्रणांना "आयएसआय'पासून दोन हात दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. उघडपणे चालणारी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरेही आता दिसत नाहीत. (याचा अर्थ ती बंद झाली असा नाही). अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्य देशातील काश्‍मिरींना एकत्र करून भारतविरोधी रॅलींचे आयोजन करणे, निषेधसभा घेणे, असे प्रकार केले जातात. तथाकथित आझाद काश्‍मीरची मागणी त्यांच्या मार्फत पुढे केली जात आहे. यातूनच काश्‍मीरमध्ये हुरियत कॉन्फरन्ससारख्या गटांची वाढ झाली आहे.

पूर्वीप्रमाणे पाकिस्तानी सैनिकांना भारतात दहशतवादी म्हणून पाठवणे आता बंद झाले आहे. या दहशतवादी कारवायांना "काश्‍मिरी चेहरा' देण्यासाठी पाकव्याप्त काश्‍मीर भागातील तरुणांचीच आता या कामी निवड केली जाते. पाक लष्करातील माजी सैनिकांकडे त्यांचे नेतृत्व सोपवण्यात येते. भारतातील अल्पसंख्य समाजामध्ये दहशत माजवणे व त्यांना अलग पाडणे, हे या गटांचे मुख्य काम आहे. या कामी अलिकडे अफगाणी आणि "अल-कायदा'च्या दहशतवाद्यांचाही उपयोग करून घेण्यात येतो.

सध्या पाकव्याप्त काश्‍मीर भागात "आयएसआय' ची तब्बल 52 प्रशिक्षण केंद्रे कार्यरत असून 2000-2500 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. याच स्वरूपाचे काम पाकिस्तानातील धार्मिक संस्थांच्या माध्यमातूनही सुरु आहे. भारताच्या अन्य राज्यांमध्येही आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने "आयएसआय' तयारी करत आहे.

"आयएसआय'च्या कारवायांचा रोखही गेल्या काही काळात वेगाने बदलताना दिसून येतो. परकीय हस्तकांचा जम्मू-काश्‍मीर भागात वापर, त्यांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांचे बनावट चलन वितरित करणे, तसेच भारतातील दंगलग्रस्त भागातील मुस्लिम तरुणांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारताच्या जवळपास सर्व भागात "आयएसआय' एजंट कार्यरत असून, त्यांनी मुस्लिमबहुल भागांत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. काश्‍मीर व अन्य भागांतील लोकांच्या धार्मिक भावना भडकावत, समुदायांमधील तेढ वाढवण्याचा हा नियोजित प्रयत्न आहे. लष्करी यंत्रणांमधील मूलतत्ववाद्यांना शोधून त्यांना आपल्या कामांसाठी फोडणे, तसेच तुरुंगांमधील गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणाऱ्यांना आपल्या यंत्रणेत सामावून घेणे "आयएसआय'ने चालू केले आहे.

दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काही एजंटांना भारतात महत्त्वाच्या शहरात पाठवले जाते. नोकरी धंदा मिळवून भारतीयांशीच विवाह करुन हे एजंटस आपली पाळेमुळे घट्ट रोवतात. अतिशय गुप्तपणे हे एजंट केवळ आवश्‍यकता असेल तेव्हाच काम करतात आणि अन्य वेळी शांत असतात. सीमा सुरक्षा दलासारख्या यंत्रणांच्या निष्प्रभतेमुळे, गुजरात सीमेवरुन वगैरे अशा हस्तकांना भारतात प्रवेश करणे अतिशय सुलभ ठरले आहे.

भारतातून हज यात्रेला मोठ्या संख्येने जाणारे यात्रेकरू आणि दक्षिण भारतातील आखाती देशात रोजगारासाठी जाणारे लोक, यांच्यावर "आयएसआय' विशेष लक्ष ठेवून आहे. भारतातील मदरशांना आर्थिक मदतींचा ओघ प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवला गेला आहे. नेपाळ व बांगलादेश सीमेवरून भारतात घुसणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

लष्करी छावण्यांच्या भागातील मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकारांनाही "आयएसआय'चे हस्तक जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळवून देतात. काही ठिकाणी तर भाषक वा प्रादेशिक वृत्तपत्रांवर पैसा, अन्य दबाव तसेच प्रत्यक्ष वृत्तपत्रात काम करून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीनगर भागातून प्रसिद्ध होणाऱ्या "ग्रेटर काश्‍मीर' सारख्या वृत्तपत्रांतून हा प्रकार पाहायला मिळतो.

अंडरवर्ल्ड, माफिया आणि फुटीरतावादी चळवळींच्या माध्यमातून शस्त्रात्रे व दारूगोळ्याचे थेट उत्पादनही काही ठिकाणी होते. केवळ काही उपकरणे चोरट्या मार्गाने आयात करावी लागतात. जिहादचा प्रभाव वाढवण्यासाठी काश्‍मीर व ईशान्य भारतातील नागरी प्रशासनातील काही घटकांचेही सहाय्य त्यांना लाभत आहे. लष्करी अधिकाऱ्यांना संपवणे व त्यातच स्वत:ही संपणे हे जिहादमध्ये अभिप्रेत आहे.

जिहादच्या माध्यमातून कालनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यावरही "आयएसआय'चा भर राहिला आहे. भारतातील दहशतवादी कारवयांचे संपूर्ण नियंत्रण व समन्वय "आयएसआय'च करत आहे. हुरियत कॉन्फरन्ससारख्या संघटनांवर त्यांचा पूर्ण ताबा आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारतीय नेतृत्वाचा भर मात्र कृतीपेक्षा घोषणांवरच अधिक असल्याचे दिसते. दहशतवाद्यांशी थेट सामना करण्यापेक्षा कडक शब्दांत निषेध करण्यावरच आपली नेतेमंडळी भर देतात. यामुळे सरकारच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, एक "सॉफ्ट स्टेट', अशी भारताची प्रतिमा तयार होत आहे. नेत्यांची संयमी भूमिका आता मर्यादा ओलांडत आहे.

"आयएसआय' ला प्रत्युत्तर देण्यासाठी नियोजनबद्ध व निश्‍चित अशा व्यूहरचनेचा पूर्णतः अभाव आहे. त्यासाठीही अमेरिकेकडेच बघण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. अमेरिकेचे "अफपाक' धोरण हा अमेरिकेला त्रस्त करणारा दहशतवादच संपवण्यावर केंद्रीत असून "आयएसआय'च्या भारतातील कारवायांशी त्याला देणे-घेणे नाही, हे आपण समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा भारताला असणारा धोका वाढतच जाईल.

लेखाच्या पुढील भागात "आयएसआय'च्या ईशान्येकडील कारवायांचा आढावा घेण्यात येईल. मतांचे राजकारण बाजूला ठेवण्याचे धाडस करून राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर "आयएसआय'चे भूत काबूत आणणे सहज शक्‍य आहे. त्या संबंधीच्या धोरणांबाबतची चर्चा उत्तरार्धात करण्यात येईल.

No comments:

Post a Comment