Total Pageviews

Sunday 18 December 2011

कराची ते बिहार अतिरेक्यांचा नवा अड्डा
दिल्ली पोलिसांनी दिल्ली, चेन्नई आणि बिहारमधून इंडियन मुजाहिदीनच्या सहा अतिरेक्यांना नोव्हेंबर अखेरीस अटक केली त्यात मोहम्मद आदिल ऊर्फ अजमल (४०) या पाकिस्तानी अतिरेक्याचाही समावेश आहे. मूळचा कराचीचा अजमल हा जैश मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा सदस्य असून तो जेहादी आहे. कुर्ल्याचे रियाज भटकळ इकबाल भटकळ हे सध्या कराचीत असून तेथूनच ते मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडवून आणतात. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ गिलानी यांनीच अजमल यास भटकळ बंधूंच्या ताब्यात दिले. भटकळ बंधूनी मोहम्मद आदिल ऊर्फ अजमलला नेपाळमार्गे बिहारमध्ये पाठविले. बिहारमध्येबेस बनविल्यानंतर गपूर अहमद जमाली (२१) मोहम्मद कातील सिद्दिकी (२७) या बिहारच्या मधुबनी दरभंगाच्या तरुणांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठविण्याची तयारी सुरू केली. बनावट नावाने पासपोर्टही तयार केले. परंतु तत्पूर्वीच पाकिस्तानी अजमल त्याच्या बिहारच्या मधुबनी दरभंगाच्या अन्य पाच साथीदारांना दिल्लीच्या टास्कफोर्सने अटक करून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पाडला आहे. दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद बॉम्बस्फोटात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा समावेश आहे. त्यातील मोहम्मद कातील सिद्दिकी याच्या पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात समावेश असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध देवस्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही मोहम्मद कातील १३ फेब्रुवारी रोजी बॉम्ब ठेवण्यासाठी गेला होता. परंतु मंदिराजवळील फूल विक्रेत्यानेआयईडी असलेली बॅग ठेवण्यास विरोध केल्याने मोहम्मद कातीलचा प्रयत्न फसला. नाहीतर १३ फेब्रुवारी रोजी पुण्यात आणखी हाहाकार माजला असता! दगडूशेठ मंदिरातील घातपाताचा प्रयत्न फसल्यानंतर कातील मुंबईत आला. त्याने सिद्धिविनायक मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तेथील कडक सुरक्षा पाहून त्याने निर्धार बदलला आणि आपल्याकडील स्फोटकं वरळीच्या समुद्रात फेकून दिली. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षाव्यवस्था आता अधिक कडक करण्याची गरज आहे.एका पाकिस्तानी अतिरेक्यासह बिहारच्या मधुबनी दरभंगा भागातील पाच जणांना अटक करण्यात दिल्लीच्या टास्क फोर्सना यश आले, तर या बिहारी गटाचे सूत्रसंचालन करणारा यासीन भटकळ ऊर्फ यासीन अहमद सिद्दिबाप्पा ऊर्फ शाहरूख ऊर्फ इमरान हा फरारी आहे. यासीन भटकळ त्याचे साथीदार मोहसीन चौधरी, फय्याज कागजी, जब्बी अन्सारी यांचा पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात सहभाग असून याच गटाने मुंबईतील ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार दादर येथील बॉम्बस्फोटात सहभाग घेतला असावा असा पोलिसांचा संशय आहे. जर्मन बेकरीत भाग घेणारा यासीन भटकळ त्याचे अन्य बिहारी साथीदार सापडल्यास मुंबईच्या १३ जुलै रोजीच्या बॉम्बस्फोट मालिकेवर प्रकाश पडेल असे सांगण्यात येत आहे.यासीन भटकळ, रियाज भटकळ इकबाल भटकळ यांची माहिती देणार्‍यास २५ लाख रुपयांचे बक्षीस केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे यासीन भटकळने बिहार सोडले असून तो कराचीत पळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इंडियन मुजाहिदीनच्या या बिहारी गटाला जरी आता तडा गेला असला तरी पाकिस्तानी अतिरेक्यांना बिहारचे मधुबनी दरभंगा हे जिल्हे आपल्या साथिदारांची जुळवाजुळव करण्यासाठी अधिक सुरक्षित वाटत आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी हल्ला करणार्‍या पाकिस्तानी अतिरेक्यांना मधुबनीच्या सबाउद्दीन शेखनेच मदत केली होती. ताज, ओबेरॉय, नरीमन हाऊस, सीएसटी, लियोपोल्ड या ठिकाणांची पाहणी करून त्याची माहिती पाकिस्तानी अतिरेक्यांना दिली होती. यानंतरच मुंबईवर हल्ला करण्यात आला होता. १९९२-९३ साली मुंबईत जातीय दंगल उसळल्यानंतर मुस्लिम तरुणांना अडकवून त्यांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठविले जात होते; परंतु आता मुंबईतून कुणीही तरुण पाकिस्तानात जाण्यास तयार होत नसल्याने अतिरेक्यांनी आता आपला मोर्चा बिहारकडे वळविला असून तेथील मुस्लिम तरुणांना जेहादसाठी पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेण्यासाठी तयार केले जात आहे आणि त्यात भटकळ बंधूंचा सहभाग आहे. भटकळ बंधू यासीन भटकळचे संकट कधी दूर होणार याकडेच सार्‍या पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.- प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment