Total Pageviews

Friday 2 December 2011

DONT TURN GERMAN BAKERY INVESTIGATIONS IN MALEGAON EDITORIAL IN SAMANA


कॉंगे्रसचे मुस्लिमप्रेम पाहता जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपींच्या नशिबातही मालेगावप्रमाणे कॉंगे्रजीकृपेचा ‘चांदतारा’ उगवणारच नाही कशावरून?

जर्मन बेकरीचे ‘मालेगाव’ करू नका!
जर्मन बेकरी स्फोटासंबंधी अखेर सहा अतिरेक्यांचा शोध पोलिसांना लागला आहे. त्यात एक पाकिस्तानी नागरिक असून पाच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने ही कारवाई केली असून या अतिरेक्यांना दिल्ली, बिहार आणि चेन्नई अशा तीन ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. या स्फोटाचे सूत्रधार रियाज आणि इक्बाल भटकळ हेच असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि आजवरच्या शिरस्त्यानुसार अतिरेकी सापडले असले तरी त्यांचे मास्टर माइंड मोकाटच आहेत. सहा अतिरेकी जेरबंद झाले आहेत, पण भटकळ बंधूंपर्यंत अद्यापि हिंदुस्थानी ‘कानून के लंबे हाथ’ पोहोचू शकलेले नाहीत. महाराष्ट्र आणि देशात आजवर झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांचे मास्टर माइंड तपासाच्या रडारवर असले तरी तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. तेव्हा भटकळ बंधूदेखील फक्त ‘रडार’वरच असतील आणि त्यांची टोळी जेरबंद झाली असेल तर त्यात आश्‍चर्यकारक काहीच नाही. मुळात जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी दोन वर्षांनी का होईना सहा अतिरेकी पोलिसांना सापडले हेदेखील कमी कुठे आहे? कारण अनेक बॉम्बस्फोटांच्या तपासाचे धागेदोरे, सुईदोरे पोलिसांना आजपर्यंत ओवता आलेले नाहीत. अफजलगुरू आणि अजमल कसाब हेच काय ते अपवाद. अर्थात कसाबमियांदेखील हाती लागला तो आमच्या तुकाराम ओंबळे या बहादूर पोलिसाने हौतात्म्य पत्करून त्याला पकडून दिले म्हणून. ‘२६/११’च्या हल्ल्यातील इतर दहशतवादी कमांडो कारवाईत ठार झाले आणि फाशी झालेला कसाब बिर्याणी झोडत सध्या तुरुंगात मजेत जगतो आहे. तिकडे तिहारमध्ये त्या अफजल गुरूचेही असेच मजेत चालले आहे. आपल्या देशात
बॉम्बस्फोटांचे धागेदोरे 
सापडले तरी ते रीळ आरोपींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच संपते. आरोपी पकडले तरी अनेकांचे खटले उभे राहत नाहीत. खटले उभे राहून निकाल लागला तो फक्त संसदेवरील हल्ला आणि ‘२६/११’चा हल्ला याच प्रकरणांचा. मात्र या दोन्ही प्रकरणांतील अतिरेकी फाशी होऊनही सरकारी कृपेनेच आरामात आहेत. शेवटी प्रश्‍न मुस्लिम भावनांचा आहे. कॉंगे्रसच्या मुस्लिम मतपेटीचा आहे. बेगडी मानवतावादाचा, खोट्या धर्मनिरपेक्षतेचा आहे. कॉंगे्रसच्या या मुस्लिमप्रेमाच्या पुळक्यानेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली. २००६ मध्ये हा स्फोट झाला होता. त्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, सीबीआय वगैरेंनी तपास करूनच या सात जणांना अटक केली होती. मात्र घोटाळेबाज कॉंगे्रसवाल्यांनी या तपासातही घोटाळा केला. पाच वर्षांनी हा तपास नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुन्हा केला आणि या आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा साक्षात्कार सरकारला झाला. त्याच आधारावर न्यायालयाने सशर्त जामिनावर या सर्वांची सुटका केली. अर्थात हे ‘भाग्य’ याचप्रकरणी ‘हिंदू अतिरेकी’ ठरविले गेलेल्या साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, स्वामी दयानंद वगैरेंच्या नशिबी आलेले नाही. कारण ते हिंदू आहेत. आता फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचे सहा अतिरेकी गजाआड झाले आहेत. चांगली गोष्ट आहे, पण कॉंगे्रसवाल्यांच्या मुस्लिमप्रेमाचा इतिहास पाहता उद्या या सहा आरोपींच्या नशिबातही मालेगावप्रमाणे कॉंगे्रजीकृपेचा ‘चांदतारा’ उगवणारच नाही कशावरून? जर्मन बेकरी प्रकरणाचेही ‘मालेगाव’ केले जाणार नाही याची काय खात्री? आधीच दोन वर्षांनी पोलिसांच्या हाती हे सहा अतिरेकी लागले आहेत. शिवाय दिल्लीच्या जामा मशिदीतील गोळीबार आणि बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील स्फोटाशीही याच अतिरेक्यांचा संबंध आहे, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. पोलिसांच्या या दाव्यामागे त्यांचे तपासाचे काही धागेदोरे असतीलही. मात्र महाराष्ट्र एटीएस जर्मन बेकरी स्फोटामागे ‘लश्कर-ए-तोयबा’चाच हात असल्याबद्दल आजही ठाम आहे. पुण्याच्या न्यायालयात एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात याच संघटनेचा उल्लेख केला आहे. म्हणजे दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या दाव्यांत आताच भिन्नता आहे. उद्या याच
संभ्रमाच्या तव्यावर 
कॉंगे्रसवाले आपल्या मुस्लिमप्रेमाची पोळी भाजून घेऊ शकतात. जमियत-ए-उलेमाचा एखादा राष्ट्रीय अध्यक्ष उद्या मालेगाव प्रकरणातील सात आरोपींप्रमाणेच या सहा आरोपींच्या सुटकेसाठीही सत्ताधार्‍यांवर दबाव टाकून धाग्यादोर्‍यांचे रीळ गुंडाळून टाकायला लावू शकतो. या सहा आरोपींना फक्त अटकच झाली आहे, त्यांच्यावरील आरोप न्यायालयात अद्यापि सिद्ध व्हायचे आहेत हे खरेच आहे. मात्र बॉम्बस्फोटातील मुस्लिम आरोपींबाबत कॉंगे्रसवाल्यांनी सुटकेचा ‘मालेगाव मार्ग’ दाखवून दिला आहे हीदेखील वस्तुस्थितीच आहे. त्याच मार्गावरून मोकळे झालेले सात आरोपी ‘सीमी’ या बंदी घातलेल्या इस्लामी संघटनेचेच सदस्य होते. सीमी आणि इंडियन मुजाहिदीन या तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरे म्हणजे प्रश्‍न सीमी, इंडियन मुजाहिदीन किंवा लश्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनांचा नाहीच, प्रश्‍न आहे तो कॉंग्रेसच्या धोरणाचा. आता जर्मन बेकरी स्फोटाचा कटदेखील पाकिस्तानातच शिजला असे दिल्ली पोलीस पकडलेल्या सात आरोपींचा हवाला देत सांगत आहेत. हिंदुस्थानातील बहुतेक बॉम्बस्फोटांचे धागेदोरे पाकिस्तानातच पोहोचले आहेत, पण उपयोग काय? आमचे सत्ताधारी या धाग्यादोर्‍यांवरून पाकिस्तानात पोहोचू शकत नाहीत आणि एखाददुसर्‍या प्रकरणात पोलीस आरोपींपर्यंत पोहोचलेच तर तपास घोटाळ्याचा नवा ‘मालेगाव पॅटर्न’ अमलात आणून मुस्लिमप्रेमाचा कोलदांडा घातला जातो. आम्हाला म्हणायचे आहे ते इतकेच की, कॉंग्रेसवाल्यांनी जर्मन बेकरीचेही उद्या ‘मालेगाव’ करू नये!

No comments:

Post a Comment