Total Pageviews

Monday, 20 June 2011

UNREST IN ARAB COUNTRIS

कुवेतमध्ये विदेशी मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध
मुस्लिम देशांमध्ये अतिशय अस्थिरतेचे वारे वाहत आहे. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांचे युग संपले आहे. त्यांना अटक झालेली असून, त्यांना आता विचारले जात आहे की, आपल्या प्रदीर्घ शासनकाळात त्यांनी कोणकोणत्या विदेशी बँकांमध्ये पैसे ठेवलेले आहेत? त्यांची विदेशी पत्नी अद्यापही संशयाच्या भोवर्‍यात आहे. उत्तर आफ्रिकी देश ट्युनेशिया, मोरक्को आणि अल्जेरियामधील परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. तेथे हिंसाचार उसळलेला नाही हे खरे आहे, पण राखेखाली विस्तव पेटलेला आहेच. भूमध्य सागराच्या काठावर वसलेल्या या देशांतील जनतेच्या असंतोषाची सुनामी जाणो केव्हा या देशाच्या सत्ताधार्‍यांच्या राजमहालात शिरेल हे सांगता येणार नाही. येमेनबाबत तर स्पष्टच झाले आहे की, राष्ट्रपती अब्दुल्ला ज्या क्षणी गादी सोडतील, तेथें तालिबानी सरकार स्थापित होईल. ज्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये मोठा गडबड गोंधळ सुरू आहे, त्यात येमेनचे चलन सर्वाधिक प्रभावित झालेले आहे. येमेनचा विदेश व्यापार तर संपल्यातच जमा आहे. मुंबईच्या एका सुरमा व्यापार्‍याला येमेनच्या आर्थिक स्थितीबाबत विचारल्यानंतर त्याने सांगितले की, आम्ही येमेनशी व्यापारच बंद करून टाकला आहे. त्यांच्या चलनाचे भाव इतके कोसळले आहेत की, कुणी त्याला स्पर्श करायलाही तयार नाही.ज्या राष्ट्रांमध्ये परिवर्तनाची लाट येऊ घातली आहे, तेथे तालिबानी आपले साम्राज्य उभे केल्याशिवाय राहणार नाहीत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये लोकशाहीची बिजे कधीच रुजलेली नव्हती. त्यामुळे अशा राष्ट्रांमध्ये परिवर्तनाचे परिणाम काय होतील हे सांगणे कठीण आहे. एखादा धूर्त तालिबानी नेता सत्तेत आल्यास जनतेचे आणखीच वाईट हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत.लिबियाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. कर्नल गद्दाफी कोणत्याही परिस्थितीत सत्ता सोडायला तयार नाहीत. अमेरिका आणि इंग्लंड या देशांनी गद्दाफींना स्पष्टच सुनावले आहे की, त्यांची कोणतीही मागणी मान्य केली जाणार नाही. परिणामी लिबियाच्या फाळणीचे विधिलिखित लिहिले गेले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.खाडी देशांमध्ये बहरीन एक असे राष्ट्र आहे जेथे पंथाच्या आधारावर परिवर्तनाची चळवळ सुरू झालेली आहे. बहरीन हे राष्ट्र सौदी अरब या देशाच्या सीमेशी जोडलेले आहे. त्यामुळेच अमेरिकेला चिंता आहे. अमेरिकेच्या सल्ल्यावरून सौदी अरब राष्ट्राने आपल्या बहरीन या राष्ट्रासोबतच्या सीमा सील केल्या आहेत. सौदी अरब आणि बहरीन या राष्ट्रांमध्ये सर्वात मोठा वाद शिया आणि सुन्नी यांच्याबाबतचा आहे. सौदी अरब यामागे इराणचा हात आहे, असे मानतो. लिबिया हे तेल उत्पादक राष्ट्र आहे. त्यामुळे या देशात मोठ्या संख्येने विदेशी मुस्लिम राहत असत. लिबिया युद्धग्रस्त झालेले असल्यामुळे आता लिबियातील विदेशी मुस्लिमांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे की, यापुढे त्यांनी जायचे कुठे? कारण स्वत:च्या देशात जायचे म्हणजे बेकारी भोगावी लागणार आहे. परिणामी सर्वांचे लक्ष्य आता अन्य अरब राष्ट्रे आहेत. लिबियातील जवळपास सवर्र्च विदेशी मुस्लिमांनी आपली दिशा या अरब राष्ट्रांकडे वळवली आहे.त्यातल्या त्यात त्यांना सर्वाधिक संधी कुवेतमध्ये दिसून येत आहे. परिणामी कुवेतमध्ये जाणार्‍यांची रांगच लागली आहे. कुवेत एक पेट्रोल उत्पादक राष्ट्र आहे खरे, पण ते इतके लहान राष्ट्र आहे की, देशात येत असलेल्या विदेशी मुस्लिमांच्या लोंढ्याचे ओझे तो सांभाळू शकणार नाही. त्यामुळेच कुवेतला विदेशी मुस्लिमांबाबत कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. जवळपास २० वर्षांपूर्वी कुवेतवर इराकने हल्ला केला होता. दोन्ही देशांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ युद्ध झाले. इराकपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कुवेतने अमेरिकेची मदत घेतली होती. परिणामी आजही मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैन्य कुवेतमध्ये तळ ठोकून आहे. हे सैन्य तेथे राहून कुवेतच्या संरक्षणाच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करीत असते. अमेरिकेची आर्थिक स्थिती आज चांगली नाही. त्यामुळे अमेरिका कुवेत आणि सौदी अरब या राष्ट्रांमधून बाहेर पडायला तयार नाही. अमेरिकेने कुवेतला सल्ला दिला आहे की, कुवेतने आपल्या देशातील संभाव्य विद्रोहापासून सावध राहावे. आपल्या देशाच्या संरक्षणाची काळजी घ्यावी. परिणामी कुवेतनेही आपल्या देशात येणार्‍या विदेशी मुस्लिमांवर प्रतिबंध लावलेला आहे. कुवेतने अनेक देशांतून येणार्‍या मुस्लिमांवर प्रतिबंध लावलेला आहे खरा. त्यातल्या त्यात या सर्व देशांच्या तुलनेत पाकिस्तानी मुस्लिमांवर त्याने अधिक कठोर प्रतिबंध लावलेले आहेत. कुवेत सरकारने अध्यादेश जारी केला असून, त्याआधारे त्यांनी कुवेती जनतेला असे आदेशित केले आहे की, पाकिस्तानी मुस्लिमांना आपल्या देशात येण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारे मदत करू नये, त्यांना कुवेतमध्ये प्रवेश मिळवून देऊ नये. कुवेतमध्ये आधीपासूनच आलेले पाकिस्तानी मोठ्या संख्येने आहेत, जे आपल्या पाकिस्तानी नातलग मित्र परिवारास टुरिस्ट व्हिसावर आमंत्रित करीत असतात. त्याशिवाय व्यापाराच्या निमित्ताने अनेक पाकिस्तानी कुवेतमध्ये येत असतात. कुवेती सरकारला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की, त्यांच्या देशात अवैधरीतीने राहात असलेल्या नागरिकांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या इतर देशांमधून आलेल्या नागरिकांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तानात अल कायदासारख्या असंख्य दहशतवादी संघटना सक्रिय आहेतअमेरिकेचे अरब राष्ट्रांपैकी सर्वात घनिष्ठ आर्थिक संबंध सौदी अरेंबिया आणि कुवेतशी आहेत. त्यामुळे अमेरिकेला असे वाटते की, ओसामाच्या मृत्यूचे निमित्त करून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कार्यरत दहशतवादी संघटना कोणत्याही क्षणी कुवेतवर हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेकडूनही मिळालेला आहे आणि आपल्या गुप्तहेर संघटनेकडूनही कुवेतला मिळालेला आहे. परिणामी कुवेत सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. कुवेतमध्ये सरकार सुन्नी आहे आणि कुवेतमध्ये मोठ्या प्रमाणात शिया समुदाय राहतो. अरबी राष्ट्रांच्या या परिसरात इराण मोठी शक्ती आहे, जी शियाबहुल राष्ट्र आहे. अमेरिकेने कुवेतला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचा बदला घेण्यासाठी कुवेत आणि सौदी अरब या राष्ट्रांवर कोणत्याही क्षणी दहशतवादी हल्ला करू शकतात. सौदी अरब या राष्ट्राकडे स्वत:चा बचाव करण्याचे अनेक मार्ग आणि यंत्रणा आहे, पण कुवेत मात्र याबाबतीत दुबळा ठरतो. कुवेत हे एक असे अरबी राष्ट्र आहे ज्या राष्ट्रात थोडेबहुत खुलेपणाचे वारे वाहते. एक तर कुवेतमधील महिलांमध्ये राजकीय समज विकसित झालेली आहे आणि त्या राजकारणात सक्रियही आहेत. काही दिवसांपूर्वीच कुवेती शासक शेख यांच्याकडे अशी मागणी करण्यात आली आहे की, त्यांनी देशातील महिलांना निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी. त्याकरिता त्यांनी त्यांच्या घटनेत दुरुस्ती करावी. ही मागणी मान्य झाल्यास कुवेत हे पहिले मुस्लिम राष्ट्र ठरेल जेथे महिला निवडणुकीत उभ्या राहतील. तूर्तास ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. तथापि कुवेती शेख अल जाबिर यांनी काही प्रतिभाशाली महिलांना कुवेतच्या संसदेत आमंत्रित केलेे आहे. कुवेत सौदीसारखा कट्टर देश नाही. कुवेतमध्ये स्त्री-पुरुष एकत्रित फिरताना दिसून आले तर त्याचे आश्‍चर्य वाटायला नको. तेथील इमाम आणि मुफ्तींना फतवे जारी करण्याचा अधिकार नाही. कुवेतचे सर्वोच्चाधिकारी शेख आणि संसदेचे स्पीकर यांनी परवानगी दिलीच तरच तेथे फतवा जारी करता येतो. सौदी अरब हे राष्ट्र पहिल्यापासूनच विदेशी नागरिकांना आपल्या देशात येऊ देण्याबाबत संकुचित वृत्ती बाळगतो. कुवेत खुलेपणासाठी आतापर्यंत प्रसिध्द होते. आता मात्र कुवेतला भीती वाटू लागली आहे की जाणो आपल्या देशात विद्रोह झाला तर? त्यामुळेच त्यांनीही विदेशी मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. - मुजफ्फर हुसेन

No comments:

Post a Comment